Kanyakumari to Pune Cycling Expedition 2023 – Devdatta Tembhekar

I am sharing excerpts of the daily little write-ups that my dad writes during his expeditions. Whatsapp has its limitations and since a lot of people requested access to his write-ups, I am consolidating it here on this blog link so it can be shared with all well-wishers. He inspires a lot of people and we wish to take along all of you with us on this incredible journey. Please feel free to comment below as he will be reading all your kind words! Thank you!


From the Vivekanand Memorial to Shaniwarwada, Dad will be travelling 1612 kms, 4 states on bicycle with his buddies! After Pune- Kanyakumari, Manali- Leh-Khardungla, now comes this feat which none other has achieved!
Please shower your blessings on this group and keep them coming all along!Love you and proud of you Baba! 🥺♥️💜

Quick-links

Day -1
Day 0
Day 1
Day 2
Day 3
Day 4
Day 5
Day 6
Day 7
Day 8
Day 9
Day 10
Day 11
Day 12
Day 13
Day 14
Day 15

Introduction

विवेकानंद शिला स्मारक कन्याकुमारी ते शनिवार वाडा पुणे सायकल यात्रा

२४ डिसेंबर

लांब पल्ल्याची सायकल मोहीम म्हणजे आम्ही ठरवलं आणि निघालो इतकं सोपं नसतं ते.. त्यासाठी भरपूर पूर्वतयारी लागते.
त्याबद्दल थोडं सांगायलाच हवं, नाही कां?

मागच्या वर्षी आमच्या कोटेश्वर ते किबिथु या महत्वाकांक्षी सायकल मोहिमेत गोहाटी पासून डॉ. दीपक कुलकर्णी, डॉ. अनघा, विनायक आणि सोनाली ओगले आम्हाला जॉईन झालेत. आसाम आणि अरूणाचल प्रदेशातील विवेकानंद केंद्र विद्यालयात (व्हिकेव्ही) आमची निवास व्यवस्था होती. त्यांचे आदरातिथ्य आणि त्या भागातील त्यांचे कार्य बघून आम्ही सर्वजण खूप भारावून गेलो होतो. तेव्हापासून डॉ. दीपक कुलकर्णींच्या मनांत कन्याकुमारीला जाण्याचे विचार घोळू लागले. माझी कन्याकुमारी सायकल वारी २०२०-२१ मधे झाली असल्याने व कुटुंबीयांसह दोन वेळा तिथे जाऊन आलो असल्याने मी पुन्हा जाण्यासाठी विशेष उत्सुक नव्हतो.

डॉक्टरांनी मात्र खूपच मनावर घेतलं. त्यांनी मेढेकर, आगाशे आणि दत्ताभाऊंची मदत घेऊन तीन चार महिन्यांपासून सर्व प्लॅनिंग केले. सोबत कोण कोण जाणार ते निश्चित झाले. त्यांच्या मीटिंग्ज ला मी अर्थातच जात नसे. मेढेकर, आगाशे आणि दत्ताभाऊंचं प्लॅनिंग असल्याने अतिशय विचारपूर्वक सर्व नियोजन झाले होते. डॉक्टर मधून मधून माझी चेष्टा करायचे आणि मी तो विषय टाळायचो.
एक दिवस सकाळची राईड करून घरी आरामात बसलो असताना अचानक व्हॉट्सॲप वर नोटिफिकेशन आलं म्हणून बघितलं तर मला माझं कन्याकुमारीचं रेल्वे तिकीट जोगांनी पाठवलं. मी ताबडतोब जोगांना फोन केला आणि विचारलं की चुकून माझं तिकीट काढल्या गेलं का? तर ते म्हणाले नाही. मग डॉक्टरांना फोन केला तर ते म्हणाले की कन्याकुमारी पुणे अशी वेगळ्या मार्गावरून मोहीम आखली आहे आणि मी यायलाच हवं.
कदाचित ते लोक पुण्याला नसताना मी पुण्यातल्या लोकांना त्रास देईल अशी भिती त्यांना वाटत असावी… कारण काहीही असलं तरी माझी अवस्था बिकट झाली होती.
आता घरून परवानगी कशी मिळणार या विवंचनेत असताना ते म्हणाले की ते आमच्या घरी बोलतील. (नंतर ते बोलले नाही हा भाग वेगळा.)
मी हिम्मत करून घरी विषय काढला. साधना आधी तयार होत नव्हती. परंतु काही दिवस सतत पाठपुरावा केल्यावर नाईलाजाने तयार झाली. त्यात टीममधे मेढेकर, आगाशे आणि डॉक्टर असल्याने तिचा विरोध मावळला..(त्यांची इमेज कामाला आली.)
नेहेमीच्या शिरस्त्याप्रमाणे टीममधील सर्वांना कामं वाटून दिली होती.
रेल्वे रिझर्व्हेशन ची जबाबदारी जोगांकडे, निवास व्यवस्था आगाशे, मेढेकर, विनायक आणि सावंतांनी सांभाळली. सपोर्ट वेहिकलची व्यवस्था माझ्याकडे, खाण्याच्या पदार्थांची जबाबदारी अश्विनी आणि रोहिणीकडे.
काल सायकली आणि आमचं सामान पिकअप मधून कन्याकुमारीकडे रवाना झालं .
आज रात्री कन्याकुमारी एक्स्प्रेसने आम्ही निघत आहोत. सर्व थोरामोठ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असताना आमचं काम सोपं झालं आहे. फक्त सायकल चालवायची आणि वाटेवरील गावांत स्वामी विवेकानंदांच्या Unity in Diverity संदेशाचा प्रसार करायचा.
प्रत्यक्ष सायकलिंग २७ डिसेंबरपासून सुरू होईल. तो पर्यंत जय हिंद!!

क्रमशः

Day -1

२५ डिसेंबर
काल रात्री घरून निघण्यापूर्वी रात्रीच्या जेवणासाठी साधनानी मला काय हवं असं विचारल्यावर क्षणाचाही विलंब न करता साधं वरण, इंद्रायणी तांदळाचा वाफाळलेला भात, लोणकढं तूप आणि लिंबाची फोड हे माझं उत्तर तिला अपेक्षित असणार. प्रवासात बाहेर काहीही मिळेल पण हे मिळणार नाही हे ती जाणून आहे. रात्री १०:३० वाजता सोसायटीच्या गेटवर विनायक -मेधा, रोहिणी, अश्विनी आणि जोग आले होते. मी आणि विनायक Ola रिक्षा करून निघालो. देवेंद्र जोगनी बाकीच्यांना स्टेशनवर सोडलं. फलाटावर गाडी लागली होती. मी, भवाळकर आणि ओक बी१ कोच मधे आणि बाकी सर्व बी५ मधे. डॉक्टर दीपक कुलकर्णी आणि सुनील भावे आम्हाला निरोप द्यायला स्टेशनवर आले होते. येताना आमच्यासाठी मसाला पान घेऊन आले. गाडी राईट टाईम म्हणजे रात्री ११:५० ला सुटली..‌
सकाळी उठल्यापासून आमची खादाडी सुरू झाली. भवाळकरांनी आणलेले थालीपीठं, अश्विनीने आणलेल्या खाऱ्या पुऱ्यांचा नाश्ता झाला. त्यासाठी आम्हाला बी ५ मधे जावे लागले.
आमच्या डब्यातले लोक खूप स्पोर्टिंग होते.
नाश्ता आणि जेवणाच्या मधल्या वेळात एक संगीत मैफिल जमली. ओकांचे माउथ ऑर्गन वादन, मेढेकरांनी बाबूजींची गाणी गायली. मी पण एक गाणं म्हटलं.(गंमत म्हणजे कोणीच कानावर हात ठेवले नाहीत!!) नेहा आणि शुभम नरवडे ही २४-२५ वयोगटातील भावंड आमच्या मैफिलीत सामील झाली. नेहाचा आवाज छान आहे. खूप मजा आली.
दुपारच्या जेवणात खाऱ्या पुऱ्या, थेपले ( thanks to Pranay),लोणचं, चटणी, दहीभात (thanks to Ashwini) आणि रोहिणीनी आणलेला शिरा असा साग्रसंगीत बेत होता. जेवण झाल्यावर सर्वांना स्वीट लागतं हे लक्षात घेऊन तानाजींनी आणलेली Almond Honey वडी आणि मी आणलेला रवा नारळाचा लाडू खाल्ला.पोट तुडुंब भरल्यानंतर आटोपतं घेतलं..
मेढेकर सोबत असल्याने अन लिमीटेड चहा कॉफीचा रतीब दिवसभर सुरू होता. दुपारी हाय टी साठी गाठीया शेव आणि मेढेकर स्पेशल खारे दाणे होते.
रात्रीची झोप कमी झाली असल्याने नंतर ढेपाळलो.
आज दत्तजयंती आणि डॉक्टर दीपक कुलकर्णींची Wedding Anniversary. त्यांना फोन करून सर्वजण बोललो. त्यांच्या बोलण्यातून त्यांना FOMO झाल्याचं जाणवलं. ते उद्या सकाळच्या विमानाने आमच्या आधी कन्याकुमारीला पोहोचतील.
आमचं सपोर्ट वेहिकल वेळापत्रकानुसार उद्या सकाळी आमच्या सायकल्स घेऊन पोहोचेल अशी आशा आहे.
रात्री आम्ही फक्त पुऱ्या खाल्ल्या. पोट जड असल्यामुळे अल्पाहार केला.
गाडी सध्या राईट टाईम जात आहे. उद्या वेळेत पोहोचेल अशी आशा करतो.
गाडीत बसून २१ तास झालेत. अजून १४ तास काढायचे आहेत. त्यातले ८ तास झोपेत जातील. मग फक्त ६ तास उरतील.
हिवाळा असूनही ही रात्र लवकर संपावी अशी इच्छा आहे..

क्रमशः

Day 0

२६ डिसेंबर

कालची रात्र खरोखरच लवकर संपली. छान ९ तास झोप झाली. सकाळी खूप फ्रेश वाटत होतं. जशी ट्रेन केरळ राज्यातून जायला लागली तसे आमचे मोबाईल फोन खिडकीतून दिसणारं निसर्ग सौंदर्य टिपू लागले. आमच्या ग्रूपमधील अनिल ओक, विनायक सारखे एक्स्पर्ट मंडळी फोटो काढून ग्रूप वर शेयर करत असल्याने मी मात्र ती दृष्य डोळ्यांच्या माध्यमातून मनांत साठवत गेलो.

आज आमच्या सहप्रवासी स्नेहा चा (काल तिचा उल्लेख आला आहे.) वाढदिवस असल्याचं कळल्यावर सर्वांनी तिला विश केलं. सर्वांचा उत्साह बघून ती फारच भारावून गेली. हा वाढदिवस कायम स्मरणात राहील असं म्हणाली. (गेल्या वर्षी विवेकानंद केंद्र शाळेत विनायकचा वाढदिवस साजरा झाल्याची आठवण झाली. आणि माझा एका धाब्यावर त्याची पण.) वाढदिवस अशाप्रकारे साजरा होणं हे विशेषच असतं.
आमची ट्रेन वेळेत कन्याकुमारीला पोहोचली. ट्रेन मधून उतरल्यावर स्नेहा आणि शुभम सोबत ग्रूप फोटो काढला.

दरम्यान डॉक्टर दीपक विवेकानंद केंद्रात पोहोचले होते आणि आमची वाट बघत होते. एका टम टम मधे ६ अशा दोन टम टम मधून आम्ही विवेकानंद केंद्रात पोहोचलो. आमची निवास व्यवस्था तिथेच आहे.
याच दिवसांत स्वदेशी जागरण मंचाचे एक कार्यकर्ता शिबीर केंद्रात सुरू आहे. त्यासाठी पुण्यातून माझे सेवावर्धिनीचे सहकारी श्री अरविंद डोरवट आले आहेत त्यांची भेट घेतली.
केंद्रातच हॉटेल चित्रा मधे स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊन लगेचच शिला स्मारक बघण्यासाठी प्रस्थान केले.
दीपक कुलकर्णींनी श्री भानुदासजी धाक्रस, अखिल भारतीय सचिव, विवेकानंद केंद्र यांच्या माध्यमातून आमची शिला स्मारक बघण्याची व्यवस्था केल्यामुळे प्रचंड गर्दी असूनही आमचं व्यवस्थित सर्व बघून झालं.
महासागरांचा त्रिवेणी संगम बघून नतमस्तक झालो. ध्यान मंदिरात जाऊन आल्यावर खूप शांत शांत वाटतं..
स्मारक परिसरात आमचे मनसोक्त फोटोसेशन झाले. परत येताना वाटेत “गोटी सोडा” बघून खूप छान वाटलं. अर्थात त्याचा आस्वाद घेतल्याशिवाय तिथून हलणं शक्य नव्हतं.
निवास परिसरात परतल्यानंतर स्वदेशी जागरण मंचच्या तरूण तडफदार कार्यकर्त्यांची भेट झाली.
जसवंतसिंह (हिमाचल), गुरूसेवकसिंग (पंजाब), कपिल मदन (कुरुक्षेत्र) यांच्यासोबत गप्पा झाल्या. त्यांनी आम्हाला काही नारे सांगितले. उद्या सकाळी फ्लॅग ऑफ साठी ते येणार आहे.
आमचं सपोर्ट वेहिकल सुखरूपपणे आमच्या निवासस्थानी पोहोचले होते. सर्वांनी आपापल्या सायकली चेक करून घेतल्या.
१८९२ साली २५, २६, २७ डिसेंबर या कालावधीत स्वामी विवेकानंदांनी समुद्रातील ज्या शिळेवर ध्यान केले त्याच्या स्मृती प्रित्यर्थ विवेकानंद केंद्रात संध्याकाळी वंदे मातरम्, भारत मातेची आरती वगैरे करतात.
आमचे भाग्य की आम्हाला त्या कार्यक्रमात सहभागी होता आले. भानुदासजी त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. आरती झाल्यानंतर भानुदासजींनी आम्हाला एका कॉन्फरन्स हॉल मध्ये केंद्राचा इतिहास आणि इतर माहिती दिली. त्यानंतर एकनाथजी रानडेंवरची एक डॉक्युमेंट्री दाखवली.
अशा रितीने आम्हाला एकदम व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली.
उद्यापासून आमची सायकल यात्रा सुरू होणार म्हणून आज लवकर जेवण करून लवकर झोपणार.
The journey begins tomorrow!!

क्रमशः

Day 1

२७ डिसेंबर
कन्याकुमारी ते हॉटेल अल साज, त्रिवेंद्रम (१०७.६३ किमी)

आज सायकल यात्रेचा पहिला दिवस असल्याने सर्वजण खूप एक्साईट झाले होते. गजर वाजण्याच्या आधी आपोआप जाग आली म्हणजे बॉडी सेटिंग झालं म्हणायला हरकत नाही.
दिवसाची सुरुवात भवाळकर वहिनींनी दिलेल्या भोपळ्याच्या घारग्यांनी झाली. त्यांची अप्रतिम चव जिभेवर रेंगाळत असताना रोहिणीनी खजूर आणि पौष्टिक लाडू दिले.
ठरल्याप्रमाणे सगळेजण पहाटे ५:३० वाजता खाली आलेत. फ्लॅग ऑफ अपेक्षेपेक्षा दणदणीत झाला. भानुदासजी जातीने हजर होते. विशेष म्हणजे स्वदेशी जागरण मंचाचे अखिल भारतीय समन्वयक श्री सतीशजी आणि त्यांचे सहकारी सुद्धा उपस्थित होते. भानुदासजींनी खास उपरणे देऊन सर्व सायकलस्वारांना सन्मानित केले. सतीशजींनी फ्लॅग ऑफ साठी घोषणा दिल्यामुळे फ्लॅग ऑफ संस्मरणीय झाला.
सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी आम्ही प्रस्थान केले. समुद्राच्या जवळ असल्याने प्रचंड वारं होतं. थंडी अजिबात नाही. दमटपणा खूप. अशा वातावरणात सायकलिंग करणं हे आव्हानात्मक असते.
पहिला स्टॉप सुचिंद्रम मंदिर!! त्याची आख्यायिका खूप गमतीशीर आहे.
पार्वतीने शंकराला प्रसन्न करण्यासाठी एका पायावर उभं राहून तपश्चर्या केली. पार्वतीच्या हातून बाणासुराचा वध व्हावा आणि शंकराला कैलास पर्वतावरून कन्याकुमारीपर्यंत येता येऊ नये म्हणून नारदांनी कोंबडा आरवण्याचा आवाज काढला म्हणून शंकर त्यांच्या नियमाप्रमाणे जिथवर पोहोचले होते तिथेच थांबले. त्या जागी हे मंदिर आहे!! (शंकर सूर्यास्त ते सूर्योदय या काळातच भ्रमण करीत असत)
म्हणून लग्न न झालेल्या कुमारिका पार्वतीने बाणासुराचा वध केला. (कन्याकुमारी)
हुश्श….
Nagarcoil Road वरून त्रिवेंद्रम कडे जाणारा रस्ता अप्रतिम आहे. वाटेत नारळ, सुपारीच्या बागा, कमळांनी आच्छादलेले तलाव, दूरवर दिसणारे डोंगर बघता बघता पद्मनाभ palace गाठला. संपूर्ण लाकडाचा बनवलेला राजवाडा. याच राजवाड्यात जगप्रसिद्ध चित्रकार राजा रविवर्मा होते. इथलं म्युझियम अप्रतिम आहे.
सर्व बघून झाल्यावर जवळच नाश्ता केला.
जवळंच वीर सावरकर लायब्ररी बघून गदगद झालं. आपल्या राजकारण्यांना सावरकरांची ॲलर्जी असूनही केरळ सारख्या कम्युनिस्ट रूल्ड स्टेटमधे उजळ माथ्याने सावरकरांच्या नावाची लायब्ररी चालवायची म्हणजे खेळ नाही!!

या भागातील कुत्र्यांची भुंकण्याची स्टाईल खूप वेगळी वाटली. बहुतेक तमिळ/ मल्ल्याळम भाषेत भुंकत असावे म्हणून कळत नव्हतं.
तामिळनाडू मधून केरळमध्ये प्रवेश करताना भरपूर चर्चेस दिसल्या. अक्षरशः दर २००-३०० फुटांवर एक तरी चर्च दिसत होती. अशा वातावरणात जे धर्मांतर विरोधात काम करतात त्यांची परिस्थिती काय असेल, आपण कल्पनाही करू शकत नाही.
केरळमध्ये रस्त्याच्या आजूबाजूला एक मेकांना चिकटून घरं असतात. रस्त्यावर दुहेरी वाहतूक. त्यामुळे सायकल चालवताना खूप काळजी घ्यावी लागते.
आज पहिलाच दिवस खूप इव्हेंट फुल झाला. काही सहकाऱ्यांचा रस्ता चुकल्यामुळे गंतव्य स्थान गाठायला विलंब झाला.
आजपासून मंडळाने “Fair Play Award” जाहीर करण्याचे योजिले आहे. कमीत कमी पेनाल्टी पॉइंट्स, निर्णय प्रक्रियेत सहभाग आणि राईट टेंपरामेंट हे निकष लावून प्रत्येक दिवसाचा विजयी सायकलस्वार घोषित करण्यात येणार आहे.
पहिल्या दिवसाची मानकरी, डॉक्टर अश्विनी कुलकर्णी. अवघड परिस्थितीत मानसिक संतुलन ढळू न देता स्वतःचे व्यावसायिक कौशल्य वापरून निर्णय प्रक्रियेत मोलाची कामगिरी करून अश्विनीने हा बहुमान पटकावला आहे. एकूण तीन नॉमिनेशनस् होते. त्यातून तिची निवड झाली ही विशेष उल्लेखनीय बाब आहे.
आजचा मुक्काम hotel अल साज येथे आहे. निवास व्यवस्था उत्तम आहे. तानाजी सावंतांचे मन:पूर्वक आभार.

क्रमशः

Day 2

२८ डिसेंबर

सकाळी पौष्टिक लाडू, खजूर आणि भोपळ्याचे घारगे असा खुराक करून बरोबर ५:४५ वाजता स्ट्रेचिंग एक्सरसाईझ केलेत आणि ठरल्याप्रमाणे निघालो.
इथे थंडी अजिबात नाही. सकाळी सकाळी चक्क घाम येत होता. त्यात ढगाळ वातावरण.
काल कॅप्टन अविनाश मेढेकरांनी बौद्धिक दिल्यानं आज टीममध्ये फरक जाणवला. आज कोणीही रस्ता चुकले नाही आणि शिस्तबद्ध पद्धतीने राईड केली. सर्व टीम मेंबर्सचं कौतुक करावं तेवढं कमीच.
पहिला टप्पा जटायू पार्क. यासाठी ४५ किमी जायचे होते. वाटेत एका ठिकाणी होलसेल रेटमधे फळं (संत्री, केळी, नारळपाणी) घेतली.
आज सधन मुस्लिम बहुल भागातून प्रवास होता. गल्फ मधून पैसा कमवून मोठ्ठाले बंगले बांधले आहेत. (पुण्यातल्या अभिमानश्री सोसायटीतील बंगल्यांपेक्षा भारी!) रस्ते अरुंद पण गुळगुळीत..
जटायू पार्क हे डोंगराळ भागात असल्याने रस्त्यावर प्रचंड चढ उतार होते.
जटायू अर्थ सेंटरची एंट्री सकाळी १० पासून सुरू होते. तिथे गेल्यावर कळलं की काही तांत्रिक कारणांमुळे रोप वे बंद आहे!! वर जाण्यासाठी ८२६ पायऱ्या आहेत.
येवढ्या लांब आलो तर वर जाऊन बघायला हवं असा विचार करून आम्ही ६ जणांनी वर जाण्याचा निर्णय घेतला. बाकी ६ जणं खाली थांबले. आमच्या सोबत सपोर्ट वेहिकलचा चालक मालक अशोक पण आला.
ऊन असूनही उन्हाचा त्रास झाला नाही कारण वाटेत अनेक ठिकाणी वेलींची कमान केली आहे. शिवाय काही अंतरावर कव्हर्ड शेल्टर आणि पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. संपूर्ण परिसर अत्यंत स्वच्छ ठेवला आहे. वर जाताना खाद्यपदार्थ नेण्याची बंदी आहे.
वर गेल्यावर अप्रतिम दृश्य दिसते. महाकाय जटायूचे शिल्प बघून आपण अचंबित होतो त्याचबरोबर नतमस्तक ही!! या ठिकाणी जटायू आणि रावणाचं युद्ध झालं होतं अशी लोकांची श्रद्धा आहे.
वर प्रचंड वेगाने वारे वाहत असताना आपण अक्षरशः ढकलल्या जातो.
वरून खालचं दृश्य खूपच सुंदर दिसतं. आपण विमानात बसलो आहोत असा फील येतो. तिथे मनसोक्त फोटोसेशन केलं.
योगायोगाची गोष्ट म्हणजे ट्रेनमध्ये ओळख झालेली स्नेहा आणि तिचा भाऊ आम्ही खाली येत असताना भेटले. ते कन्याकुमारीला बाईक रेंट करून भटकत आहेत.

खाली उतरल्यावर जेवण केलं. हॉटेलचा अनुभव विशेष चांगला नव्हता.
उन्हाची तीव्रता वाढू लागली. त्यात प्रचंड रोलिंगचा रस्ता दमछाक करत होता.
कोल्लम येथील निवासाची व्यवस्था हॉटेल सी पार्क येथे आहे. पद्माकर आगाशेंनी बुकिंग केले आहे. हॉटेल च्या वाटेवर खाडी आहे. ४ ठिकाणी मोठ्ठे पूल आहेत. कोल्लम शहर छान आहे.
आज फेयर प्ले अवॉर्ड देताना ज्युरींची खूप पंचाईत झाली असल्याने आज सर्व टीम मेंबर्स त्याला पात्र आहे असा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला आहे.
यावेळी ट्रीपचा खर्च करण्याची अभिनव योजना कॅप्टन अविनाश मेढेकरांनी आखली आहे. “Today’s Daddy” जो असेल त्याने त्या दिवसाचा पूर्ण खर्च करायचा. म्हणजे एका व्यक्तीवर ताण पडत नाही.
पहिले तीन दिवस पुरुषोत्तम जोग Daddy होते. आजचे आमचे डॅडी पद्माकर आगाशे आहेत. डॅडींनी आजची व्यवस्था चोख केली याबद्दल त्यांचे आभार.
झालेल्या खर्चाची नोंद स्प्लिट वाईज ॲप वर केली जाते. त्यावरून प्रत्येक एंट्री नंतर कोण कोणाला किती ओन करतो ते कळू शकतं. बरोबर सीए असण्याचे अनेक फायदे असतात त्यातला हा महत्त्वाचा फायदा.
रात्री ज्युरींची मीटिंग आहे त्यासाठी जायचे आहे. तेव्हा आता थांबतो.

क्रमशः

Day 3

२९ डिसेंबर, शुक्रवार
सी पार्क कोल्लम ते YMCA कोची ( १३४.८६ किमी)

कालच्या अत्यंत अवघड चढावर बहुतेक जण हातात सायकल घेऊन चालले परंतु तुलनेने कमी अनुभवी डॉक्टर दीपक कुलकर्णी ह्यांनी सायकलवरून न उतरता यशस्वीपणे सर्व चढ चढले हे विशेष!!

आमचे यात्रेचे ब्रीदवाक्य “Pedaling to Unite, Celebrating Diversity” असं आहे. देशाचं जाऊ द्या, बारा जणांच्या ग्रूपमध्ये किती diversity आहे!! काही शांत, काही बडबडे, काही स्वतंत्र विचारांचे, काही ग्रूप जसं ठरवेल त्याला स्वीकारणारे, काही आत्ममग्न, काही प्रतिमा जपणारे वगैरे वगैरे…. इतक्या भिन्न प्रवृत्तीच्या लोकांची मोट १५ दिवस सांभाळची म्हणजे कसरतंच आहे. कॅप्टन अविनाश मेढेकरांपेक्षा सक्षम लीडर आमच्या ग्रूपमधे नाही. त्यामुळे आजचा फेयर प्ले अवॉर्ड हा त्यांनाच. “आज के डॅडी” पण तेच आहे.
आजचा दिवस खूप टफ होता. सकाळी आरामशीर ६:३० वाजता निघालो. आज फ्लॅट terrain असल्याने लिबर्टी घेतली आणि घात झाला.
दुपारच्या सत्रात उष्णता आणि आर्द्रतेमुळे वाट लागली. अक्षरशः केमिकल लोच्या झाला. काहीजण रस्ता चुकले.
सकाळचा नाश्ता ४० किमी नंतर घेतला. मसाला डोसा इतका मोठा होता की चौघात एक पुरला असता.
एपींच्या सायकलचं टायर खराब झालं होतं. काल कुठेच मिळालं नाही. ते तशीच सायकल चालवत होते.आज Atlas Cycle Trading सायकल स्टोअर येथे वाटेत मिळालं. त्याच दुकानात बसवून मिळालं.
आज खरा कोस्टल रूटचा अनुभव घेता आला. आधी थोतापल्ली बॅक वॉटर, पुढे अलेप्पी बीच. एका बाजूला समुद्र आणि बाजूला प्रचंड मोठा flyover. भुपेन हजारिका ब्रीज ची आठवण झाली.
आज वाटेत अनेक लोकांशी बोलणं झालं. भाषेची अडचण असूनही संवाद साधल्या जात होता. आमचं बोलणं ऐकून घेतल्यावर त्यांच्या नजरेत कौतुक दिसून येत होतं.
एक पोलिस Vinil नावाचे इन्स्पेक्टर भेटले. ते तर खूप भारावून गेले होते. आमच्या सोबत फोटो काढून घेतला आणि कुठलीही मदत लागल्यास अवश्य फोन करा असा आग्रह केला.
आमची ही यात्रा un supported सुरू आहे .म्हणजे कोणी कितीही आग्रह केला तरी खाणे, पिणे आणि निवास व्यवस्था आमची आम्हीच करणार!!
आपली हौस भागवण्यासाठी इतरांनी भुर्दंड का सोसावा??
रस्त्याची कामं सुरू असल्याने ट्रॅफिकचा खूप त्रास झाला. मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायला संध्याकाळचे ७:३० वाजले.
आज तानाजी सावंत शेवटचे काही अंतर गाडीत बसले. बाकी सर्वांनी राईड पूर्ण केली.
केरळमध्ये मल्याळम भाषा वापरतात हे सर्वांना माहीत आहे. परंतु त्यांची बाराखडी जोडाक्षरांची असावी अशी शंका आहे. ल्ल, ळ्ळ, ट्ट, न्न चा मुबलक वापर केला जातो. त्यामुळे गावांची नांव लक्षात राहत नाही.

देवदत्त टेंभेकर
कोथरूड, पुणे
क्रमशः

Day 4

दिवस ४ था
३० डिसेंबर २०२३
YMCA International Centre कोचीन ते हॉटेल इंद्रप्रस्थ पलक्कड (१२८.९१ किमी)

कोचीन शहर म्हणजे कुबेराची नगरी. सर्वत्र झगमगाट. सराफांची मोठ्ठाली दुकानं, Lu Lu Hyper Market (सिंगापूरच्या मुस्तफाची आठवण करून देणारा), अनेक बेकरीज, गुळगुळीत रस्ते, ट्रॅफिक सिग्नल पाळणारे लोक आणि बरंच काही… फक्त हवामान अतिशय गरम आणि दमट. पुण्यासारखं वेदर नाही.
काल रात्री खूप दमल्यामुळे zomato वरून जेवण मागवायची सूचना अश्विनीने केली आणि अंमलात आणली. आम्हाला बसल्या जागी पिझ्झा आणि व्हेज बिर्याणी खायला मिळाली. सध्या आमच्या सर्वांसाठी अश्विनी म्हणजे साक्षात अन्नपूर्णा देवीच!! मेढेकर आणि ती, मॅप बघून सर्वांना हॉटेलचा रूट समजावून सांगतात .नंतर रोज ती सर्वात पहिले जाऊन हॉटेलचं चेकीन करून ठेवते. आम्ही डुलत डुलत पोहोचल्यावर डायरेक्ट रूममधे जातो. तिला बघून आमच्या वेस्ट टू ईस्ट यात्रेच्या वेळी अनघा जशी आमच्या सर्वांच्या जेवणाची काळजी घ्यायची त्याची आठवण झाली. या पुढच्या सगळ्या ट्रीप मधे दोघींपैकी कमीत कमी एक यायलाच हवी असे सगळ्यांचे मत आहे. Hats off to you Ashwini!!
सकाळी ६:१५ वाजता प्रस्थान केले. ढगाळ हवामानामुळे हवेत थोडा गारवा होता. २५ किमी वरच्या अंगमल्ली गावात चहा , ४५ किमी नंतर आनंदभुवन मधे नाश्ता केला. तिथे विचित्र अनुभव आला. Menu कार्ड नाही. ठराविक ४ पदार्थ मिळतील हे जवळजवळ अर्ध्या तासाने कळले. ऑर्डर करताना त्यातले तीन संपले असे सांगण्यात आले. “तुम्हाला काय हवे याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. आम्ही हेच देणार ” असा भाव वेटरच्या चेहेऱ्यावर होता. थोडाफार असाच अनुभव आधीही आला होता.
६० किमी वर अशोकने आग्रहाने संत्री खायला घातली.
रस्ता गुळगुळीत, चांगलं हवामान पण जबरदस्त हेडविंड मुळे (विरूद्ध दिशेने वाहणारे वारे) पेडलिंग एफोर्ट्स खूप जास्त लागत होते. उतारावर पण अजिबात स्पीड मिळत नव्हती.
८५ किमी वर कुथिरन गावात हॉटेल हॉटेल मेक्काट्टील येथे लंचसाठी थांबलो. हा एक ऑरगॅनिक फार्म आहे. अप्रतिम सर्व्हिस आणि जेवण मिळालं. जेवण झाल्यावर फणसाचा ज्यूस तर एक नंबर होता. भाषेची अडचण असूनही अश्विनीने हॉटेल मालकिणीशी संवाद साधून जेवण ऑर्डर केले होते.
पुण्यातल्या कात्रज ट्वीन टनेल सारखा टनेल लागला. टनेल ओल्यांडल्यावर हॉट चिप्स ची अनेक दुकानं दिसली. आजकाल महाराष्ट्रातल्या अनेक शहरांत या भागातील लोकांनी हा व्यवसाय सुरू केला आहे.
कोचीन सोडल्यानंतर वस्ती विरळ होत गेली. अनेक ठिकाणी रस्त्यालगत भातशेती दिसून आली
थोडं पुढे गेल्यावर अशोकने अननस खायला घातले.
ईशानने दिलेल्या कॅमेल बॅक चा खूप उपयोग होतो आहे. सायकल चालवताना पाणी पीता येत असल्याने खूप छान सोय झाली.
संध्याकाळी ७ वाजता पलक्कड गाठले. हॉटेल इंद्रप्रस्थ येथे आजचा मुक्काम आहे. आजपर्यंतच्या हॉटेल मधलं बेस्ट हॉटेल आहे. विनायकचे मनापासून आभार.
अंजली चिपलकट्टींचं “माणूस असा का वागतो?” या पुस्तकाच्या प्रभावामुळे “माणसं रस्ता का चुकतात?” या विषयावर मी संशोधनाला सुरुवात केली आहे.
माझी काही निरीक्षणे उद्यापासून शेयर करणार आहे. आता जेवायची वेळ झाली म्हणून इथेच थांबतो.

क्रमशः

देवदत्त टेंभेकर
कोथरूड, पुणे

Day 5

दिवस ५ वा
३१ डिसेंबर, रविवार (९५ किमी)
कालच्या दिवसाचा फेअर प्ले award जाहीर करता आला नाही याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. परंतु मी तरी काय करणार रात्री उशिरापर्यंत ज्युरींचा निर्णय झालाच नाही त्यामुळे कालच्या निवेदनामध्ये तो जाहीर करता आला नाही. कालचे विजेते आहेत सर्वांचे लाडके प्रदीप भवाळकर!!
भवाळकर काल प्रचंड फॉर्ममध्ये होते. सकाळी सायकलिंग सुरू करताना सलमान खानच्या वेशात अवतरले. सत्तरीतील तरुण आपले बायसेफ्स दाखवत सायकलिंग करताना बघून येणारे जाणारे सगळेजण त्यांच्याकडे बघत होते. आमची ट्रीप सुरू झाल्यापासून त्यांना आमच्यापैकी कोणीही रागावताना बघितले नाही. मग हा बहुमान त्यांनाच मिळायला नको का?
काल रात्री जेवताना आमच्या ग्रुप मध्ये एक शाळकरी मुलगी येऊन बसली आणि आम्ही सगळे चक्राऊन गेलो. असं वाटत होतं की या मुलीला कुठेतरी बघितले आहे. तर ती होती आमच्या ग्रुप मधली रोहिणी टिळक!!
तिला ३१ डिसेंबर साठी “आज के डॅडी” व्हायचे होते.
तर आज आमच्या ग्रुपला डॅडी नसून मम्मी होती… हे म्हणजे आलिया भटनी जॅकी श्रॉफ च्या आईचा रोल करण्यासारखं आहे..
सकाळी नेहेमीच्या वेळेवर प्रस्थान करून १६ किमी अंतरावर चहासाठी थांबलो.
वाटेत bio diversity rich zone लागला. खूप वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष दिसत होते.
अश्विनी केळकर जर आमच्या सोबत असत्या तर त्या झाडांची माहिती मिळू शकली असती.
यानंतर पुढचे जवळजवळ २२ किलोमीटर आम्हाला हेडविंडचा सामना करायला लागला. रस्त्यावर काही ठिकाणी उतार असूनही पेडल मारल्याशिवाय सायकल चालतच नव्हती. एका तासात जेमतेम सात किलोमीटर अंतर गाठता आले. 23 किलोमीटर वर वलयार नावाच्या गावात hydration break घेतला.

वलयार चेक पोस्ट नंतर केरळची हद्द संपून तामिळनाडू राज्यात आम्ही पुन्हा प्रवेश केला. या भागातील लोकांना लॉटरी तिकिटांचे प्रचंड वेड दिसून आले. अक्षरशः प्रत्येक पंचवीस फुटांवरती एक तरी लॉटरी तिकीट व्हेंडर दिसत होता.
३८ किमी वर मलपारम गावांत अल बारी रेस्टॉरंट मधे ब्रंच घेतला. इथली सर्व्हिस आणि पदार्थ उत्तम होते. पोटभरीचा नाश्ता घेऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात करताना सुखद धक्का बसला. हवेत थोडा गारवा जाणवत होता आणि हेडविंडचा प्रभाव बराच कमी झाल्यामुळे चांगली स्पीड गाठता आली. ओक, एपी, अश्विनी, मी आणि सावंत पुढे जाऊन ६० किमी वरील सर्वनाभवला थांबलो. भूक नसल्याने फक्त टेंडर कोकोनट पुडिंग आणि कसाटा ऑर्डर केलं. येवढी क्विक सर्व्हिस इतर कुठेही अनुभवायला मिळाली नाही.
दुसरी टीम आल्यावर पुन्हा एकत्र प्रवास सुरू झाला आणि दुपारी ५ वाजता अन्नूर गावातल्या सर्वना भवन लॉज मधे सर्वजण सुखरूप पोहोचलो.
आजची निवास व्यवस्था आगाशेंनी केली आहे.
आज 31 डिसेंबर. सर्वजण विचारतात आज काय सेलिब्रेशन करणार?
आगाशेंच्या कृपेमुळे त्यांच्या मित्राने सर्व व्यवस्था चोख केली आहे.
यावर्षीचा लेखाजोखा करत असताना लक्षात आले की मधल्या अडीच महिन्यांचा काळ सायकलिंग बंद असूनही माझे वर्षाअखेरीस अकरा हजार आठशे किलोमीटर सायकलिंग strava वर रेकॉर्ड झाले याचा आनंद आहे.
दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे आज कोणीही रस्ता चुकला नाही.
माणूस रस्ता का चुकतो या विषयावर चिंतन केल्यामुळे त्यातून मार्ग सापडला.
पहिली गोष्ट म्हणजे टीम साइज विभागल्यामुळे कम्युनिकेशन जास्त इफेक्टिव्ह झाले.
बाकी निष्कर्ष पुढील भागात.
सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

क्रमशः

देवदत्त टेंभेकर
कोथरूड, पुणे

Day 6

दिवस ६ वा
१ जानेवारी, सोमवार (१०७.९)
सर्वना भवन लॉज अन्नूर ते हॉटेल नीजगुना चामराज नगर

आज २०२४ ची सुरुवात अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात झाली. हवेत गारवा जाणवायला लागला आहे. तामिळनाडू राज्यातून आमचा कर्नाटक राज्याकडे प्रवास नेहेमीच्या वेळेवर सुरू झाला.
आजचा रूट लहान गावातून जात असल्याने सर्वत्र हिरवळ दिसत होती. गुळगुळीत रस्ते आणि रस्त्याच्या दुतर्फा केळीच्या बागा बघून वाटेत थांबून फोटो काढण्याचा मोह आवरत नव्हता. शेवटी फोटो काढून दमल्यावर निसर्ग सौंदर्य नजरेत साठवत गेलो.
आज रस्त्यावर टिपीकल बाभळी सारखी गावाकडची झाडं पहिल्यांदा दिसून आलीत.
नॅशनल हायवे कितीही छान असले तरीही अशी मजा तिथे नसते.
शेक्सपिअर म्हणतो “नांवात काय?” मला हे पटत नाही. काही व्यक्ती त्यांच्या आई वडिलांनी ठेवलेले नांव सार्थ ठरवतात. उदाहरणार्थ आमच्या ग्रूप मधल्या अनिल नावाच्या व्यक्ती वाऱ्याच्या वेगाने सायकल चालवतात.
आज पद्मभूषण डॉ. माशेलकरांचा वाढदिवस. डॉ.दीपक कुलकर्णींनी त्यांना व्हिडिओ कॉल केला तेव्हा आम्ही सर्वांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांना बघून आणि त्यांच्याशी बोलून खूप आनंद झाला. मी तर त्यांना living legend मानतो.

थोडं पुढे गेल्यावर फॉरेस्ट एरिया सुरू झाला. त्यामुळे भरपूर bio diversity दिसून येते. या जंगलात हत्ती, हरीण, बिबट, वाघ, गवा आणि इतर जंगली श्वापदांचा वावर असतो. तशा सूचना जागोजागी दिसून आल्या.
४५ किमी वरील बन्नेरी गांवात नाश्ता केला. या गावात देवीचे भव्य मंदिर असल्याने भाविकांची गर्दी होती. शबरीमला यात्रा अनवाणी पायांनी करणारे अनेक श्रद्धाळू दिसले. आज पहिल्यांदाच उत्तम इडली खायला मिळाली.
थोड्याच अंतरावर प्रसिद्ध सत्यमंगलम घाट सुरू झाला. मी आणि विनायक आमच्या १२ डब्यांच्या गाडीचे गार्ड बनून सर्वात शेवटी होतो. विनायकनी amazon music वर किशोर कुमारची गाणी लावल्यामुळे गप्पा मारत मारत घाट कधी आला ते कळलेच नाही.
घाटात सत्यमंगलम टायगर रिझर्व आहे. या घाटावर २७ हेयर पिन बेंडस् असल्याने अतिशय आव्हानात्मक आहे. १-१ गियर कॉम्बिनेशन ठेवून सर्वात शेवटी घाट चढायला सुरुवात केली.
आगाशेंच्या सायकलचा डीरेलर तुटल्याने ते आणि गुडघ्यांच्या त्रासामुळे इतर चौघे सायकल गाडीत टाकून गाडीत बसले.
इतर ५ जण आमच्या बरेच पुढे निघाले होते.
पहिला बेंड यशस्वी पार केल्यामुळे आत्मविश्वास वाढला आणि मान खाली घालून चढायला सुरुवात केली. २२ व्या बेंडवर रोहिणी भेटली. २४ वर अश्विनी. शेवटच्या २७ व्या बेंडवर एक फोटोसेशन केले. खूप भारी वाटत होतं. त्याच्या पुढे ४ किमी अंतरावर गाडी थांबली होती. तिथे पोहोचल्यावर सर्वांनी जल्लोष केला. जणूकाही एव्हरेस्ट सर केले!!
पुढे काही अंतरावर अर्जुन प्रकाश आणि सदा शिवम नावाचे दोन एक्स्पर्ट सायक्लिस्ट भेटले. ते विरूद्ध दिशेकडून गाडीने जात होते. आम्हाला बघून थांबले. त्यांना आमचे खूप कौतुक वाटत होते.
दरम्यान आम्ही कर्नाटक राज्यात प्रवेश केला होता.
त्याच्यापुढे एका धाब्यावर सर्वांनी ब्रेड ऑमलेट आणि चहा घेतला. तिथल्या निसर्गरम्य परिसरात विनायकने खूप सुंदर क्रिएटिव्ह फोटोग्राफी केली. तिथून कोणाचा पाय निघत नव्हता. जवळजवळ दीड तास तिथे रमल्यानंतर कॅप्टन मेढेकरांनी सर्वांना अक्षरशः पिटाळले.
आजचा दिवस रोहिणीने गाजवला. धाब्यावर असताना एका मल्याळी माणसाशी बोलताना तिनी आम्हाला खूप हसवलं..
मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायला संध्याकाळचे सात वाजले. इथून पुढे वेदर अशीच साथ देईल अशी आशा आहे.

क्रमशः

देवदत्त टेंभेकर
कोथरूड पुणे

Day 7

दिवस ७ वा
जानेवारी २, मंगळवार
हॉटेल निजगुणा चामराजनगर ते M M Residency मद्दुर (९३.३ किमी)

आपल्या देशात क्रिकेट हा सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. सिनेतारकांपेक्षा जास्त चर्चा होते ती भारतीय क्रिकेटपटूंची आणि विशेष करून भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारांची. कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीला जास्त पसंतीचे कारण की त्याचा मैदानावरचा वावर, शांत डोकं, आणि सर्वात चांगला फिनिशर. रोहित शर्मा हा एक धडाकेबाज फलंदाज असूनही अतिशय संवेदनशील व्यक्ती समजला जातो. हे दोघेही कर्णधार आपल्या वैयक्तिक कामगिरीपेक्षा सांघिक कामगिरीवर जास्त फोकस करतात म्हणून ते श्रेष्ठ कर्णधार मानले जातात.
महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांचं कॉम्बिनेशन म्हणजे आमच्या यंग सिनियर्स चे कॅप्टन अविनाश मेढेकर!!
सकाळी नेहमीच्या वेळेवर प्रस्थान केले आजची विशेष बाब म्हणजे कॅप्टन अविनाश मेढेकरांच्या शिष्टाईमुळे सकाळचा नाश्ता हॉटेलमधूनच पॅक करून घेतला होता. त्यामुळे वाटेत थांबून नाश्ता करायला लागणाऱ्या वेळेत बचत झाली.
आजचा रस्ता पण खूप छान आणि लहान गावातून जाणार होता त्यामुळे हायवे वरची वर्दळ अजिबात नव्हती. वातावरण सुद्धा आल्हाददायक होते.
चामराज नगर सोडल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा उसाची लागवड दिसून आली. मातीचा रंग बदलला काळी माती आणि कावेरीचे पाणी उपलब्ध असल्यामुळे ऊसाची लागवड होत असावी. सकाळच्या वेळी पक्षांचा चिवचिवाट ऐकू येत होता आणि काही पक्षी जोडीने संवाद साधताना दिसत होते. कदाचित दुर्बिणीतून निरीक्षण करून कुठे चांगली शिकार मिळेल याबद्दल चर्चा करीत असावे.
आमच्या आघाडीच्या चमूने नाश्त्यासाठी 30 किलोमीटर अंतरावरची घर वजा टपरी निवडली. घराच्या मागेच त्यांचे शेत होते. घरात एक आजी रत्नम्मा तिचा मुलगा रवि ,सुनबाई विजया, नातवंड (अमृता , रावी) जावई असे सगळे होते. मुलींची शाळेत जायची वेळ झाली असावी.त्यांची न्याहारी सुरू होती त्याच वेळेस आमचा नाश्ता (इडली, चटणी, उपीट, शिरा) खायला सुरुवात करणार इतक्यात विजया बाईंनी रागी चे थालिपीठ, चटणी, लोणचं, केशरीभात, जो त्यांनी मुलींच्या न्याहारीसाठी केला असावा, आम्हाला आग्रहाने खायला दिला. रत्नम्मा आजी तर खूपच गोड होत्या. प्रत्येकाच्या जवळ जाऊन मायेनी सर्वांशी संवाद साधत होत्या. त्यांची भाषा आम्हाला कळत नव्हती ना आमची त्यांना. तरीही संवाद साधल्या जात होता. एक दुजे के लिए सिनेमातील प्रसिद्ध वाक्य या निमित्ताने आठवलं..”Language no barrier for love sublime”
कोण कुठलं ते कुटुंब आणि त्यांना आम्ही आयुष्यात पुन्हा भेटू किंवा नाही याची कल्पना नाही, पूर्वीची कुठलीही ओळख नाही आणि तरी ज्या प्रेमाने आणि मायेने त्यांनी आमचे आदरातिथ्य केले ते शब्दातीत आहे. भाषेचा अडसर असूनही आम्हाला कळले की त्या छोट्या मुलींची आई एका अपघातात चार वर्षांपूर्वी स्वर्गवासी झाली असल्यामुळे त्या मुली मामा-मामींसोबत आणि त्यांच्या आजी सोबत राहत होत्या.
येवढ्याशा या भेटीतूनही ते कुटुंब आमच्याशी जोडलं गेलं…(दोन ओंडक्यांची होते, सागरात भेट)
त्यांचा निरोप घेताना रोहिणी आणि रत्नमांनी घट्ट मिठी मारली तेव्हा सर्वांनाच अश्रू अनावर झालेत. जणू काही त्यांची मुलगी सासरला जायला निघाली..(एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाही गाठ)
पुढे गेल्यावर प्रातःस्मरणीय कावेरी नदीचं दर्शन झालं.
मळवल्ली गावात लंच ब्रेक घेण्यापूर्वी काही अंतर आधी नारळ पाणी पिण्यासाठी थांबलो.
सविरूची हॉटेलमध्ये अप्रतिम साउथ इंडियन थाळी मिळाली. आजचे आमचे डॅडी प्रदीप भवाळकर यांनी खुश होऊन जेवणानंतर सर्वांना गुलाबजाम दिले.
पुढचा रस्ता उत्तम होता आणि वातावरण ही विशेष गरम नसल्यामुळे फक्त एक थांबा घेऊन आम्ही आमच्या नियोजित निवासस्थानावर दुपारी चार वाजता सुखरूप पोहोचलो.
आज आमचे एकूण ७६३ किमी झालेत.
उद्या टुमकुर ला प्रस्थान करणार.
लवकर पोहोचल्यामुळे आज भरपूर कपडे धुवायचे असल्याने इथे थांबतो

क्रमशः

देवदत्त टेंभेकर
कोथरूड, पुणे

Day 8

दिवस ८ वा
जानेवारी ३, बुधवार
MM Residency मद्दुर चे श्रीनिवास लॉज टुमकुर (९५.१५ किमी, एकूण ८५८ किमी)

शाळेत आणि कॉलेजमध्ये असताना बऱ्यापैकी मार्क्स मिळायचे किंवा मॉनिटर तरी असायचो म्हणून कायम पहिल्या दुसऱ्या बाकावर बसावे लागायचे त्यामुळे मागील बाकांवर बसलेल्या मुलांसारखी दंगामस्ती, इच्छा असूनही करता येत नसे. ती कसर वयाच्या या टप्प्यावर भरून काढत आहे. डॉ. दीपक कुलकर्णी तर कायम मला ” हा फार खट्याळपणा करतो” असं म्हणतात. सध्या राईड सुरू असताना विनायक आणि मी सर्वात शेवटी असल्यामुळे खूप धमाल करतो. शाळेतल्या बॅक बेंचर्स सारखी. आज जगाच्या भवितव्याबद्दल आणि पर्यावरण या विषयावर गहन चर्चा केली. त्यात इतके दंग झालो की तहान भूक विसरलो.
अविनाश मेढेकरांचं नियोजन आणि दूरदृष्टी वाखाणण्याजोगी आहे. दोन दिवसांपूर्वी आगाशेंच्या सायकलचं डीरेलर तुटल्याने त्यांना गाडीत बसून पुढचा प्रवास करावा लागला असता. कारण मधल्या लहान गावात तो पार्ट मिळण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. मेढेकरांनी स्वतःची एक्स्ट्रा सायकल गाडीत ठेवलेली असल्याने आगाशेंना सायकलिंग करता येत आहे. (माणसं १२, सायकल १३)
विनायक मेढेकर म्हणजे “परोपकारी गंपू”. कोणालाही कुठली अडचण आली की लगेच धावून जाणारा हरहुन्नरी सहकारी. कधी कधी मी त्याला म्हणतोही की त्याने इतकं चांगलं वागू नये…
तर झालं असं की आगाशे मेढेकरांची एक्स्ट्रा सायकल चालवत असताना त्या सायकलच्या सीटचा त्यांना त्रास होऊ लागल्याचं विनायकला कळताच, क्षणाचाही विलंब न लावता त्याने स्वतःची सायकल आगाशेंना दिली. असे सहकारी असताना कुठलाही संघ विजयी होणारच!!
आमची अशोकला धरून ( आमच्या सपोर्ट व्हेहिकल चा चालक) १३ जणांची टीम आहे. प्लेईंग एलेव्हन साठी खूप चुरस असते. कॅप्टन मेढेकरां व्यतिरीक्त अश्विनी आणि विनायकची जागा पक्की आहे. रोहिणी सध्या प्रोबेशनवर असल्याने आम्ही ८ जणं संघात आहोत. त्यामुळे रोहिणीला संघात स्थान मिळवण्यासाठी सर्वांशी सौजन्यानेच वागावे लागते..( अशी चर्चा आमच्या ब्रेक मधे होत असते आणि सर्वजण त्यात सहभागी होतात. असा आमचा टाईम पास सुरू असतो.)
असो…
आज सुद्धा कालचीच पुनरावृत्ती झाली. नाश्ता ३० किलोमीटर वरील रस्त्यावरील हुल्लीयुरुदुर्गा गावातल्या एका छोट्या धाब्यावर घेतला. हनु आणि मधु नावाचं तरूण जोडपं तो चालवतात. दोघेही फारच गोड होते. नाश्त्याला अप्रतिम इडली, सांबार, डाळवडा, ऑमलेट दोसा खाल्ला. खूप छान चवदार पदार्थ होते. त्यांच्यासोबत फोटो सेशन केले.
पुढे जाताना वाटेत एका शाळेत काही मुलं, मुली शाळेच्या परिसरात झाडू घेऊन सफाई करताना दिसली. त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि त्यांच्यासोबत फोटोसेशन केले.
४० किमी वरील Tippayannapalya गावात हायड्रेशन ब्रेक घेतला. (गावाचं नांव जाणूनबुजून इंग्रजीत लिहिलं आहे. जो कोणी पहिल्या झटक्यात न अडखळता योग्य उच्चार करून दाखवेल त्याला/ तिला एक अप्सरा (पेन्सिल ✏️)माझ्याकडून भेट…
या स्पॉट वर मसूर डाळी सारख्या कडधान्याच्या शेंगांतून दाणे काढल्यावर शिल्लक असलेल्या चोथ्याच्या राशीवर बसून एक अप्रतिम फोटोसेशन विनायकने केले. त्याच्यावर बसल्यावर बीन बॅग वर बसल्याचा फील येत होता. सर्वांनी तिथे फोटो काढून घेतले. (अर्थात विनायकने आग्रह करून सर्वांचे फोटो काढले.)
५५ किमी वर कुनीगल गावात नारळपाणी घेतले.
पुढे ५७ किमी वर कोट्टिगेरे लेक दिसला. त्याच्या सभोवतालचा परिसर खूप छान डेव्हलप केला आहे.
७० किलोमीटरवर हेब्बुर गावात अन्नपूर्णा हॉटेल मधे जेवायला थांबलो. हॉटेल मालक नागराज किचनमधे तर मालकीण राणी गल्ल्यावर होती. ऑर्डर पण तीच घेत होती. दोघेही अतिशय गोड होती. त्यांची आठवण म्हणून त्यांच्यासोबत फोटो काढले.
या भागात लाल, रेताळ माती आहे. पाम, नारळ, सुपारी, ताडीची लागवड ठिकठिकाणी दिसून येते. त्याच्या जोडीला टोमॅटोची लागवड पण.
दुपारी ४ च्या सुमारास हॉटेल श्रीनिवास लॉज ला सर्वजण सुखरूप पोहोचलो. हवेत किंचित गारवा आणि ढगाळ वातावरणामुळे खूप छान राईड होत आहे…

क्रमशः

देवदत्त टेंभेकर
कोथरूड, पुणे

Day 9

दिवस ९ वा
जानेवारी ४ , गुरुवार
श्रीनिवास लॉज टुमकुरु ते हॉटेल साई पॅलेस चित्रदुर्ग (१३३ किमी, एकूण ९९० किमी)

काल एक समस्या झाली. प्रत्येक क्रिकेट खेळाडूंचं स्वप्न असतं की प्रत्येक डावात त्याने शतक झळकवावे. आम्ही श्रीनिवास लॉजला पोहोचलो तेव्हा ९५ किमी झाले होते. भवाळकर मला म्हणाले अजून ५ किमी मारायचे का? तोपर्यंत राईड क्लोज केलेली होती.. त्यामुळे नाईलाज झाला.
प्रश्नाचं उत्तर येत असूनही उत्तर पत्रिका काढून घेतल्यासारखं वाटलं.
२०२१ साली आम्ही पुणे कन्याकुमारी सायकल राईड केली तेव्हा टुमकुरुला श्रीपाद कुलकर्णी नांवाचे मराठी गृहस्थ भेटले होते. त्यांनी आम्हाला कॉफी पाजली होती. त्यांचा नंबर दत्ताभाऊंकडे होता.
जेव्हा त्यांना आमच्या या ट्रीप बद्दल कळलं तेव्हा त्यांनी आम्हा सर्वांना (१३ जण) प्रेमाने आणि आदराने त्यांच्या घरी आग्रहाने बोलवलं. स्वतः दोन खेपा करून हॉटेल पासून त्यांच्या घरापर्यंत घेऊन गेलेत. घरी त्यांच्या कुटुंबीयांनी आमचं सहर्ष स्वागत केलं. पत्नी सविता, मुलगा निखिल आणि मुलगी श्वेता पूर्ण वेळ आमच्यासोबत होते. खूप गप्पा मारल्या. निखिल मेकॅनिकल इंजिनिअर, मुलगी अमेझॉन बंगलोरला जॉब करते. नुकतीच तिची एंगेजमेंट झाल्यामुळे ती टुमकुरुला होती. मुलगा आणि पत्नी श्री कुलकर्णींच्या व्यवसायात त्यांना मदत करतात.
जेवणाचा बेत तर झकासच होता. घडीच्या पोळ्या, भाजी, कोशिंबीर, आमटी, भात, लोणचं, पापड आणि घरी बनवलेलं श्रीखंड. आम्ही सर्वजण भारावून गेलो. कुलकर्णी कुटुंबीयांना पुण्याला येण्याचं आग्रहाचे निमंत्रण देऊन आम्ही आमच्या निवासस्थानी परतलो. असे अनुभव मनात कायमचं घर करून जातात.
आज सकाळी नेहमीच्या वेळेवर निघालो. ढगाळ वातावरण, गार हवा, सिक्स लेन हायवे आणि गुळगुळीत रस्ता, याहून अधिक एखाद्या सायकलिस्ट ला काय हवं? सगळे एकदम सुसाट सुटले.
पन्नास किलोमीटर वरील ‘ कामत ‘उपहारगृहात साउथ इंडियन नाश्ता घेतला आणि शंभर किलोमीटर वरील पुरोहित हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलो.
वाटेमध्ये गणेश नावाचे बाईक रायडर भेटले त्यांच्याशी खूप गप्पा झाल्या त्यांनी आमच्या सर्वांसोबत फोटोसेशन तर केलेच शिवाय त्यांच्या बायकोशी व्हिडिओ कॉल करून सर्वांची बोलणं करून दिलं.
हॉटेल पुरोहित मध्ये जे मालक आहेत ते रोहिणी च्या गावचे म्हणजे खोपोलीचे निघाले आणि चक्क आमच्याशी मराठीत गप्पा मारत होते. तिथे उत्तम व्हेज जेवण मिळाले. पुरोहितांनी जाताना आमच्या सोबत चाळीस पाण्याच्या बाटल्या कॉम्प्लिमेंटरी दिल्या. इथेच शौर्य आणि अभिमन्यू नांवाचे स्पीड रेसिंग करणारे सायकल रायडर्स भेटले. ते विजापूरला होणाऱ्या नॅशनल चॅम्पियनशिपमधे भाग घेण्यासाठी निघाले होते. त्यांच्याशी खूप गप्पा रंगल्या. त्यांना ग्रूप तर्फे शुभेच्छा दिल्या.
आमच्या टीममधे कामाची व्यवस्थित विभागणी केली आहे. त्यातले काही तपशील आले आहेतच.(मेढेकर कॅप्टन, अश्विनी administration, विनायक DOP) आमचे official spokes person श्री पद्माकर आगाशे आहेत. ग्रूप बद्दल, राईड बद्दल , पुढील योजनांबद्दल विविध भाषांमधून तपशीलवार माहिती देण्याचे महत्त्वाचे काम त्यांचे आहे. त्यांच्या मदतीला सर्वश्री तानाजी सावंत, डॉ ए पी कुलकर्णी, पुरुषोत्तम जोग जबाबदारी सांभाळतात. रोहिणी टिळक प्रोबेशनर असल्याने सावज हेरून त्यांना बोलतं करण्याची जबाबदारी उत्साहाने सांभाळते.

आज पहिल्यांदाच पन्नास किलोमीटरवर नाष्टा आणि शंभर किलोमीटरवर लंच करण्याचं आमचं स्वप्न साकारल्या गेलं.
चित्रदुर्ग गावाच्या हद्दीत डोंगरावर अनेक ठिकाणी पवनचक्की दिसून येतात. इथे बघण्यासारखा म्हणजे इथला प्रेक्षणीय दुर्ग.
कर्नाटकातली गंमत म्हणजे इथल्या गावांची नावे. संत ज्ञानेश्वर रचित भक्ती गीतांना पंडित हृदयनाथांनी दिलेल्या चाली आणि लता/ आशाच्या आवाजातली गाणी आपल्याला गोड वाटतात ते त्यांच्या चालींमुळे आणि त्यातल्या शब्दरचनेमुळे. जसे की “फुले माझी अळुमाळु”, “फुले वेचिता बहरु” , पैल तो गे काऊ ” इथल्या गावांची उकारांती नांव तशीच गोड वाटतात. (टुमकुरु, म्हैसुरु, बंगळुरू)
अंतर जास्त असूनही आम्ही ४:३० वाजताच चित्रदुर्गच्या साई पॅलेस हॉटेल ला सुखरूप पोहोचलो.
एक टीम लगेच चित्रदुर्ग फोर्ट बघायला गेली. गेल्या ट्रीपमधे बघितला असल्याने मी आणि इतर जण हॉटेल मधेच थांबलो.
हायवेवर पुण्याचं अंतर दर्शवणारे माईल स्टोन बघून पुणे टप्प्यात आल्यासारखं वाटलं तरी ६३५ किमी अंतरावर आहे.
असे रस्ते आणि वातावरण मिळालं तर…

क्रमशः

देवदत्त टेंभेकर
कोथरूड, पुणे

Day 10

दिवस १० वा
जानेवारी ५, शुक्रवार
साई कम्फर्टस् चित्रदुर्ग ते श्री नंदिनी लॉज राणेबेन्नूर (१०३ किमी, एकूण १०९३ किमी)

एखाद्या अनोळखी ठिकाणी अपेक्षा नसताना काही सुखद अनुभव येतात. तसंच काहीसं काल झालं.
हॉटेल साई पॅलेस मधली सर्व्हिस उत्तम होती. रात्री उपद्या व्हेज रेस्टॉरंट मधलं जेवण उत्कृष्ट होतं. आईस्क्रीम तर खूपच छान होतं. खाण्याची जागा जवळ जवळ २ किलोमीटर अंतरावर असल्याने सपोर्ट वेहिकलमधे उभे राहून रेस्टॉरंटला गेलो. आमच्या गाडीला सुरक्षिततेसाठी मागे ग्रीलचा दरवाजा आहे. सायकल, माणसं आत बसल्यावर दरवाजा बाहेरून बंद करून कुलुप लावावं लागतं. रेस्टॉरंटला पोहोचल्यावर अशोकने कुलुप उघडल्यावर सगळे जण एक एक करून पिंजऱ्यातून बाहेर पडलो. ते दृश्य बघायला अलोट गर्दी लोटली. आमची हसून हसून पुरेवाट झाली.
Packed breafast देण्याचं रेस्टॉरंट manager ने कबूल केल्यामुळे निश्चिंत मनाने आम्ही आमच्या हॉटेलला परतलो.

सकाळी राईड सुरू करण्या पूर्वी रोहिणीची सायकल पंक्चर झाल्याचं कळलं. रोहिणी प्रोबेशनवर असल्याने तिच्यासाठी पंक्चर रिपेअर शिकण्याची उत्तम संधी निर्माण झाली. आमची सेना त्वरीत action mode मधे आली आणि पंक्चर ट्यूब बदलून टाकली. ही आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे.
राईड सुरू करण्यापूर्वी कॅप्टन एक ग्रूप सेल्फी घेतात नंतर “गणपती बाप्पा मोरया” अशी घोषणा देऊन राईडला सुरुवात होते.
आज हॉटेल च्या व्यवस्थापकांपैकी एकाने आमच्या सोबत फोटो काढला आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. त्याचे नांव श्रीनाथ. तो स्वतः महान athlet आहे. त्याने १०० किमी चालण्याची इव्हेंट विक्रमी वेळेत पूर्ण केली आहे. म्हणून त्याला आमचं कौतुक वाटत असावं.
आजही आम्हाला छान वातावरण आणि ६ लेन हायवे मिळाला. थोडं पुढे गेल्यावर पुरुषोत्तम जोगांची सायकल पंक्चर झाली.
आज गार्ड साठी नवीन भरती झाल्यामुळे मी गार्डच्याही मागे होतो त्यामुळे मला जोगांची धडपड दिसली. दोघांनी मिळून ट्यूब रिप्लेस केली. तोपर्यंत सपोर्ट वेहिकल आले आणि जोग त्यात बसून पुढच्या असेंब्ली पॉइंट ला गेले.
७ किमी अंतर मी सोलो अन सपोर्टेड राईड केली. असेंब्ली पॉईंट ला इतर सहकाऱ्यांनी packed breakfast घेतला. मला प्रतिक्षा होती ती दावणगिरीची.. तिथला बेन्ने डोसा जगप्रसिद्ध आहे असे ऐकले होते. दावणगिरी ६० किमी वर असल्याने मी ब्रंच करण्याचे ठरवले.
डॉक्टर अब्दुल कलामांनी म्हटल्याप्रमाणे मी दावणगिरी बेन्ने डोसा खाण्याचे स्वप्न बघितले आणि त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी सज्ज झालो. रस्त्याला लागूनच अपूर्व रिसॉर्ट मधे जाण्याचा निर्णय कॅप्टन मेढेकरांनी घेतला आणि सर्वांना दावणीला बांधून दावणगिरीला दावणगिरी बेन्ने डोसा खिलवला. Benne Dosa at Davangere is best in the world at Apurva resort.. हा असाच इंग्लिश मधून णका लिहितो असा प्रश्न पडू शकतो. जसं दारू चढल्यावर लोकं इंग्लिश झोडतात तसं बेन्ने डोसा मला चढला होता म्हणून इंग्लिशमधे लिहिलं. अशा रीतीने माझी स्वप्नपूर्ती झाली!!
अपूर्व रिसॉर्ट चा परिसर अतिशय सुंदर आहे. डोसा खाताना सवयीप्रमाणे रोहिणीने एक सावज हेरले आणि आम्ही पोट धरून हसलो.
रिसॉर्टच्या हिरवळीवर एक डुलकी घेऊन झाल्यावर पुढे प्रस्थान केले.
ढगाळ वातावरण असूनही नाटक सुरू होण्यापूर्वी ज्याप्रमाणे रंगमंचावरील कलाकार पडद्याच्या फटीतून किती प्रेक्षक आले ते बघतात त्याप्रमाणे सूर्यदेव मधून मधून आम्ही बरोबर रस्त्यावर आहोत की नाही हे बघत होते. आज रोलिंग चा रस्ता असल्याने उतारावर स्पीड तर चढावावर फुस्स असं मिश्र गतीने सायकल चालवत होतो.
दुपारी ४ वाजता राणेबेन्नूरच्या श्री नंदिनी लॉजला सुखरूप पोहोचलो. या गावाचं नांव माझा जन्म झाल्यापासून पहिल्यांदा ऐकले.
छोटं गांव असूनही निवास व्यवस्था छान आहे. सलग सेंच्युरी राईड असूनही सर्वजण उत्साहात आहेत. दिवसागणिक stamina वाढतो याचा अनुभव आम्ही घेत आहोत.
सरासरी प्रतिदिनी ११० किमी अंतर आम्ही कव्हर करत आहोत.
मला आज काय स्वप्न पडतं याची सर्वजण प्रतिक्षा करत असावेत.

क्रमशः

देवदत्त टेंभेकर
कोथरूड, पुणे

Day 11

दिवस ११ वा
जानेवारी ६, शनिवार
श्री नंदी लॉज राणेबेन्नूर ते मंत्रा रिसॉर्ट्स हुबळी (११२ किमी, एकूण १२०५ किमी)

राणी बेंदूर गावाबद्दल माझं अज्ञान मी कालच जाहीर केलं होतं. परंतु आज सकाळी आमच्या लॉजच्या मॅनेजरने त्याच्याबद्दल दिलेली माहिती ऐकून मी स्तंभित झालो. या गावांमध्ये खूप लॉजेस दिसले. म्हणून मी त्याला प्रश्न विचारला की इथे काही इंडस्ट्री आहे का? तेव्हा त्याने सांगितले की या गावात खूप मोठं हायब्रीड सीड्स प्रोडक्शन हब आहे आणि भारतभरातून लोक इथे येऊन बियाणं खरेदी करतात. पुढची माहिती ऐकून तर मी चाटच पडलो. त्याच्या म्हणण्याप्रमाणे या गावातील जास्तीत जास्त दोन टक्के लोक हे नोकरीनिमित्ताने बाहेरगावी जातात उरलेले सर्व लोक व्यवसाय करतात. तसेच याची ओळख कॉटन कॅपिटल ऑफ कर्नाटका अशीही आहे. याच्या परिसरात चिंकारा रिझर्व आहे (सलमान खानने मारलेला प्राणी). जवळच्या बेडगी गावातील लाल मिरची जगप्रसिद्ध आहे.
सकाळी सायकलिंग करताना पहिला एक तास हा चिंतनाचा असतो.मला नेहमी प्रश्न पडतो की दूरवर असलेली थांबलेली गाडी आपण तिच्याजवळ जाऊन ओव्हरटेक करण्याच्या बेतात असतानाच सुरू कशी होते? असाच अनुभव माझ्या अनेक सहकाऱ्यांना सुद्धा आला आहे. या विषयावर संशोधनाची गरज आहे असे मला मनापासून वाटते.
काल आमच्यासाठी बॅटिंग पीच होती त्यामुळे ॲव्हरेज स्पीड सर्वांचीच खूप जास्त होती. या ग्रुपमध्ये परफॉर्मन्स पेक्षा आनंदाला जास्त महत्त्व देत असल्यामुळे कोणीच कोणाशी स्पर्धा करत नाही. जो तो आपल्या गतीने राइडचा मनमुराद आनंद लुटत पुढे जात असतो. आम्हाला कोणताही वैयक्तिक किंवा सांघिक रेकॉर्ड करायचा नसल्यामुळे आम्ही सर्व अतिशय मोकळ्या मनाने आणि कुठलेही दडपण न घेता सायकलींगचा आनंद घेत असतो.
बहुदा काल रात्री थोडा पाऊस पडला असावा आज सकाळी बाहेर पडलो तेव्हा सर्व रस्ते सडा टाकल्याप्रमाणे ओले होते.
हायवेवर लागल्यानंतर दुतर्फा कपाशी आणि ज्वारीची हिरवीगार पिके मनाला भुरळ घालत होती. एका ठिकाणी सूर्यफुलाचं शेत बघून आम्ही मंत्रमुग्ध झालो. फोटो काढण्याला पण मर्यादा असतात. कारण फोटो काढण्यासाठी थांबलो तर ग्रुप मधील बाकीचे सहकारी बरेच अंतर पुढे गेलेले असतात.त्यामुळे फोटोग्राफी आटोपती घ्यावे लागते आणि ती दृश्य मनात साठवून पुढे जावे लागते.
हिरवीगार शेतं आणि दाण्याने भरलेले जोंधळ्याचे कणीस बघून बहिणाबाई चौधरींची आठवण नाही आली तरच नवल.
आज नाश्ता चौपन किलोमीटर अंतरावरील रॉयल डीडी हॉटेल अँड लॉजिंग येथे घेतला.
पुढे टोल नाका क्रॉस केल्यावर ती एका ठिकाणी खूप छान स्वीटस मिळाले .
चारच्या सुमाराला आम्ही हुबळी गावात पोहोचलो नियोजित लॉजची व्यवस्था चांगली नसल्यामुळे दुसऱ्या हॉटेलच्या शोधात असताना हुबळी पोलिसांनी खूप मदत केली. त्यांनी प्रेमाने आणि आदराने आम्हाला सर्वांना फ्रेश ज्यूस पाजला. शिवाय हॉटेल मिळवून देण्यासाठी खूप मदत केली. “तुमच्या सुरक्षेची जबाबदारी आमची “असं म्हणून आमचा धीर सुद्धा वाढवला
मधल्या काळामध्ये अश्विनी अविनाश मेढेकर आणि विनायकनी सुद्धा हॉटेल शोधण्याचे भरपूर प्रयत्न केले. या सगळ्या प्रयत्नातून आता ज्या ठिकाणी आमचा मुक्काम आहे ते हॉटेल अतिशय उत्तम आहे .आज संध्याकाळी आम्ही इथल्या रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म बघायला जाणार आहोत. त्याबद्दल विशेष म्हणजे हा जगातला सर्वात जास्त लांबी असलेला रेल्वेचा प्लॅटफॉर्म आहे.कोणाला शंका असल्यास गुगल वरती चेक करू शकता.
लहानपणी एखादा मुलगा विचित्र वागायला लागला तर “तुझा मेंदू गुडघ्यात आहे काय रे?” असे आम्ही म्हणायचचो. पण माझ्या लक्षात आले की माझा मेंदू खरोखरच गुडघ्यात आहे. कारण सायकल चालवताना जेव्हा चढावावर जायचे असते तेव्हा आपोआप गिअर बदलल्या जातात. कारण तसे केले नाही तर गुडघ्यावर जास्त दाब पडू शकतो. त्यामुळे मला असे वाटते की माझा मेंदू गुडघ्यात आहे. तुम्हालाही असंच वाटतं का?

Day 12

दिवस १२ वा
जानेवारी ७, रविवार
मंत्रा रिसॉर्ट्स , हुबळी ते रामदेव रेसिडेन्सी बेळगांव..(१०१ किमी , एकूण १३०६ किमी)
आम्ही मंत्रा रिसॉर्ट मधे मुक्काम केला. खूप छान आणि आरामदायी स्टे झाला. साधना म्हणते ते खरं आहे..” जे होतं ते चांगल्यासाठीच” याचा प्रत्यय आला.

काल सांगितल्याप्रमाणे रात्री आम्ही हुबळीच्या रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म बघण्यासाठी म्हणून गेलो. बाहेर धो धो पाऊस पडत होता. या प्लॅटफॉर्मची लांबी एक पूर्णांक अठ्ठावन किलोमीटर इतकी आहे. प्लॅटफॉर्मच्या मध्यभागी उभे राहिले असता एका बाजूला सरळ तर दुसऱ्या बाजूला मरीन ड्राईव्ह सारखा वळणदार. हा जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म आहे. हुबळी स्टेशन अतिशय सुबक आणि स्वच्छ आहे. त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. आपल्या देशातील एक जागतिक दर्जाचे रेल्वे स्टेशन बघता आले याचा आनंद आहे.
सकाळी उठल्यावर आमच्याकडे खूप धमाल असते माझं आवरून झाल्यावर डॉक्टर दीपक कुलकर्णी आवरतात आणि त्यांनी आणलेल्या किटलीमध्ये चहा बनवतात. खरंतर मला सकाळी उठून चहा प्यायची अजिबात सवय नाही. परंतु उठल्या उठल्या वाफाळलेला गरमागरम चहा पिणे या सारखा आनंद या भूतलावर नाही.
नंतर एकेक जण ग्लास आणि पाण्याची बाटली घेऊन आमच्या रूममध्ये येतो आणि डॉक्टर दीपक कुलकर्णी स्वतः त्यांना चहा बनवून देतात. कॅप्टन अविनाश मेढेकरांचा चहा पिऊन झाला की आमचं चहाचं काउंटर बंद होतं आणि आम्ही तयार होऊन प्रस्थानासाठी बाहेर पडतो.
खाली गेल्यावर अशोक आम्हाला आग्रहाने केळी आणि चिक्की खायला घालतो. आम्ही पाण्याच्या बाटल्या भरून ठेवतो त्याचबरोबर आमच्या सायकलस् चेक करतो. (हवा पाणी हेडलाईट आणि सफाई)
आमच्यातले काही जण सकाळी स्ट्रेचिंग एक्सरसाइज केल्याशिवाय राईडला सुरुवात करत नाहीत. सर्वांची तयारी पूर्ण झाल्यानंतर कॅप्टन अविनाश मेढेकर ग्रुपचा सेल्फी काढून आम्ही दिमाखात पुढील मुक्कामाकडे प्रस्थान करतो.
आजचे हायलाईटस म्हणजे सकाळचा नाश्ता आमच्या हॉटेल मधूनच पॅक करून घेतल्यामुळे टेंशन नव्हतं.
हुबळी सायकलिंग क्लबचा एक उत्साही तरुण, शेट्टप्पा,आम्हाला धारवाडला भेटायला आला होता. अश्विनीशी त्याचा संपर्क झाला होता. हा तरुण महान आहे. ५ वेळा SR* आणि फ्रान्स ची प्रतिष्ठित समजली जाणारी सायकल रेस यशस्वीपणे पूर्ण करणारा…
(* SR म्हणजे Super Randonneur. म्हणजे एका वर्षात ६००, ४००, ३००, २०० किमी सायकलिंगची स्पर्धा निर्धारित वेळेत पूर्ण केलेल्या सायकलपटूला हा किताब मिळतो. SR कितीही वेळा करता येतं.Super Randonneur (rahn doe ner) – A special medal awarded to those randonneurs who successfully complete a challenging series of brevets (200, 300, 400, and 600-kilometers in a year.)
त्याने प्रेमाने आणि आग्रहाने सर्वांना चहा पाजला. त्याच्यासोबत फोटोसेशन झाल्यावर आम्ही पुढे निघालो.
आज स्पीड अजिबात मिळत नव्हता. धारवाड सोडल्यावर प्रचंड अवघड घाट आहे. सर्वांचा कस निघाला.
२५ किमी झाल्यावर एका छान जागी थांबून सोबत घेतलेला नाश्ता केला.
धारवाड ओलांडताना टाटा मोटर्स धारवाड, हायकोर्ट, टाटा हिताची, आय. आय. टी. धारवाड हायवेवर दिसले. धारवाडला आय आय टी असल्याचं माहीत नव्हतं.
७९ किमी वरील साईप्रिया धाब्यावर जेवणासाठी थांबलो. पदार्थ चांगले होते. जेवण झाल्यावर ताणून दिली.
हळूहळू महाराष्ट्राच्या पाऊलखुणा दिसू लागल्या. जसे की काल नाश्त्यासाठी पोहे मिळाले, शिवाजी महारांजांचा अश्वारूढ पुतळा, ध्वनीक्षेपकावरील मराठी गाणी, मराठी समजणारी, बोलणारी माणसं वगैरे वगैरे..
बेळगांवला कानडीमधे बेळगावी म्हणतात हे आपल्या गावीही नसते.
दुपारी ५ वाजता रामदेव रेसिडेन्सी या मुक्कामाच्या जागेवर सुखरूप पोहोचलो.
बेळगांवला अनेक मोठमोठ्या शैक्षणिक संस्था दिसल्या. भव्य मेडिकल कॉलेज आणि डेंटल कॉलेज आमच्या रस्त्यावर आहे. ICMR ची इमारत सुद्धा दिसली. बहुतेक या वास्तूत Vaccin War सिनेमाचं शूटिंग झाल्यासारखं वाटतं.
आता शनिवारवाडा दूर नाही. उद्या आम्ही महाराष्ट्रात प्रवेश करणार म्हणून खूप एक्साईट झालो आहोत.
आजची रात्र महाराष्ट्राबाहेरील शेवटची रात्र..

क्रमशः

देवदत्त टेंभेकर
कोथरूड, पुणे

Day 13

दिवस १३ वा
जानेवारी ८, सोमवार
हॉटेल रामदेव बेळगांव ते हॉटेल ग्रँड इंदू थ्री स्टार, कोल्हापूर (११८ किमी, एकूण १४२४ किमी)

काल लिहीत असताना माझ्याकडून एक चूक झाली. हुबळी स्टेशन ऐवजी बेळगाव स्टेशन असा उल्लेख झाला होता तो नंतर मी दुरुस्त केला. परंतु ज्यांनी दुरुस्त करण्यापूर्वी माझी पोस्ट वाचली असेल त्यांच्यासाठी मुद्दाम ही सूचना आहे.
काल गडबडीत अजून एक गोष्ट सांगायची राहिली. बेळगाव गाठण्यापूर्वी आम्हाला कित्तूर गाव लागलं. त्या कित्तूर गावाचा इतिहास फारच रंजक आहे. कित्तूरची राणी चेन्नम्मा अतिशय पराक्रमी स्त्री. तिने जवळ जवळ 50 वर्षे राज्यकारभार केला .तिच्या काळामध्ये तिने ब्रिटिशांना आपल्या राज्यामध्ये शिरकाव करू दिला नाही.
किंबहुना एका लढाईत तिने ब्रिटिश जनरल ला यमसदनास धाडले. टिपू सुलतान सुद्धा तिच्याविरुद्ध काहीही करू शकला नाही. अशा या पराक्रमी स्त्रीला मानाचा मुजरा!! चित्तूर किल्ला हमरस्त्यापासून आत असल्यामुळे इच्छा असूनही आम्ही तो बघू शकलो नाही. रस्त्यावरूनच तिला मुजरा केला.
सकाळी हॉटेलमधून बाहेर पडताना एका पत्रकाराने आम्हाला गाठले. त्यांनी आमच्या काही सहकाऱ्यांकडून आमच्या मोहिमेविषयी माहिती घेतली आणि आमच्याबरोबर फोटो आणि व्हिडिओ सेशन केले. त्याचवेळी एक तेजस्वी स्त्री आमचे फोटो काढत होती. आम्ही जेव्हा विचारले तेव्हा पत्रकाराने सांगितले की त्या हॉटेलच्या मालकीण बाई आहेत. त्यांनी शुभेच्छा दिल्यानंतर आम्ही प्रस्थान केले.

२५ किमी वर चहासाठी थांबलो असताना अमर नावाच्या एका गोड मुलाची ओळख झाली. त्याच्याकडे ब्रॉड टायर ची मोठी सायकल होती. तो कुतुहलाने आमच्या सायकली न्याहाळत होता.
48 किलोमीटरवर निपाणीच्या आधी साई नाष्टा सेंटर मध्ये नाष्टा केला तिथे तर्री पोहे आणि मिसळ असे पर्याय होते. मी अर्थातच तर्री पोहे खाल्ले. कारण मिसळ मी कोल्हापूर साठी राखून ठेवली आहे.

आज रस्ता चांगला असूनही अनेक ठिकाणी रस्त्याची कामं सुरू असल्याने बरीच diversions होती. बहुतांश रस्ता उताराचा होता. काही ठिकाणी तीव्र चढण होती.
दुपारी ऊन तापलेलं असताना संकेश्वरच्या आधी एक नदी झोकदार वळण घेऊन दुथडी भरून वाहत होती. तिच्यात डुंबायची इच्छा अनावर होऊनही तो मोह टाळला.
वाटेत विनायकने घेतलेला बेळगावचा कुंदा सोनाली माळवणकरची आठवण काढत खाल्ला.
६३ किमी वर गोवा वेसच्या आधी कॅप्टन अविनाश मेडेकरांची सायकल पंचर झाली. लगेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पंक्चर दुरुस्त करून मस्तपैकी पेरू खाल्ले. काल अनिल ओक आणि अश्विनी कुलकर्णी ची सायकल पंक्चर झाली होती. यावरून असे निदर्शनास येते की ए अद्याक्षर असणाऱ्या लोकांच्या सायकली पंक्चर झाल्यात.

आज का ज्ञान
“क्रिकेट मॅच मध्ये एखाद्या बॉलर ने जर राईट एरियामध्ये बॉल टाकले नाही तर त्याची धुलाई होते. तसंच सायकल चालवताना जर राईट एरिया मधून आपल्या सायकलचं चाक गेलं नाही तर सायकल पंक्चर होते”
ज्ञान समाप्त.

लंच ब्रेक साठी 83 किलोमीटर अंतरावरच्या आप्पाची वाडी गावातल्या हॉटेल सह्याद्री मध्ये थांबलो. या ठिकाणी अतिशय उत्तम जेवण आणि सर्व्हिस मिळाली शिवाय आराम करायला जागा सुद्धा चिक्कार होती.
जेवणापूर्वी डॉक्टर दीपक कुलकर्णी यांनी श्रीखंड खाण्याची इच्छा प्रदर्शित केली होती आणि आम्ही जेव्हा हॉटेलमधे विचारणा केली तेव्हा आम्हाला चक्क आम्रखंड मिळालं!! डॉक्टरांची विल पावर strong दिसते. याहून कळस म्हणजे जेवण झाल्यानंतर विश्रांती घेण्यापूर्वी आम्हाला चक्क मसाला पान खायला मिळालं. आता बोला!!

९० किलोमीटरवर महाराष्ट्राची बॉर्डर आली आणि शरीरावर रोमांच उठले. प्रिय अमुचा देश महाराष्ट्र देश हा… आज तेराव्या दिवशी महाराष्ट्रात आम्ही प्रवेश करत आहोत.
मजल दरमजल करत आम्ही संध्याकाळी सहा वाजता कोल्हापूरला आमच्या निवासाच्या जागेवर पोहोचलो.
पुण्यावरून सुधीर भावे आणि कॅप्टन संजय जोशी कोल्हापूरला आले आहेत. त्यांनीच हॉटेलच्या दारात आमचं स्वागत केलं. ते आल्यामुळे आमच्या टीमचा उत्साह शतपटीने वाढला.
आमच्या ग्रुप मध्ये बहुतांश लोक ज्येष्ठ नागरिक आहेत हे आपण जाणताच. निज शैशवास जपावे ही उक्ती ते सार्थ करतात. लहान मुलं जसे निरागस त्याचबरोबर हट्टी असतात तसेच आमच्यातले काहीजण फार हट्ट करतात बुवा… ” लाडू गोड असतात. सर्वच गोड लाडू नसतात” या तर्कानुसार सर्व ज्येष्ठ नागरिक हट्टी नसतात. हट्टी मुलांची नावं सांगण्याची आमच्यात पद्धत नाही . मी ते आपल्यावर सोपवतो.

क्रमशः

देवदत्त टेंभेकर
कोथरूड, पुणे

day 14

दिवस १४ वा
जानेवारी ९, मंगळवार
ग्रँड इंदू थ्री स्टार कोल्हापूर ते मानसी प्राईड सातारा (११३ किमी, एकूण १५३७ किमी)

काल रात्री संजय जोशी आणि सुनील भावे यांनी भरपूर पाहुणचार केला. काही अपवाद वगळता त्या आनंदसोहळ्यात इतर सर्वजण सहभागी झाले होते.
अमोल खोत देवदूतासारखा मदतीला धावून आला. माझ्या सायकलमधून विशिष्ट आवाज येत असल्याने त्याला रिक्वेस्ट केली होती की एखाद्या मेकॅनिकची व्यवस्था होऊ शकली तर बघावे. तर पठ्ठ्या मेकॅनिक आणि paddles घेऊनच आला. सायकलचा प्रॉब्लेम सिरीयस नसल्याचे मेकॅनिक ने सांगितल्यावर माझा जीव भांड्यात पडला. Paddles बदलून घेतले.
रात्री डिनरला अमोल आणि संजय आमच्या सोबत सहभागी झाल्याने खूप छान वाटले.
हॉटेलचा चॉईस खूपच छान होता.
आज सकाळी फ्लॅग ऑफ साठी अमोल, मीनाक्षी आणि अमोलचे वडील आले होते. त्यांच्या सोबत फोटो काढून आणि त्यांच्या शुभेच्छा घेऊन आम्ही जरा उशीराने प्रस्थान केले. “कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे?”
Amol we cant thank you enough for your hospitality!!
२५ किमी अंतरावर पहिला हायड्रेशन ब्रेक घेतला. १९९६ साली भारतीय सेनेतून सेवानिवृत्त झालेले ७४ वर्षीय कांबळे आम्हाला भेटले. खूप गप्पा मारल्या.
आज गार्डचा डबा यायला २५ मिनिटे विलंब झाला.

आज मस्त वेदर होतं. ढगाळ वातावरण आणि हवेतला गारवा सुखावह होता.
३५ किमी वरील पेठ नाका येथील हॉटेल मणिकंदन येथे नाश्ता केला.
कराडला अविनाश मेढेकरांचे नातेवाईक भेटले .(सौ. गौरी आणि श्री विवेक गोवेकर) त्यांनी मिरिंडा ऑफर केला. त्यावेळी काहीतरी गार पिण्याची आवश्यकता आणि इच्छा होती.
८२ किमी तासवडे टोल नाक्यावर आमचा कलेक्शन पॉइंट होता. तिथे महामार्ग PSI श्री हेमंत मुळीक भेटले. ते स्वतः Open Water Swimmer आहेत. अनेक राष्ट्रीय स्पर्धा त्यांनी गाजवलेल्या आहेत. जवळच्याच एका धाब्यावर त्यांनी आम्हाला चहा पिण्याचा आग्रह केला. चहा पिऊन झाला आणि बाहेर पडलो तर धो धो पाऊस सुरू झाला. नंतर त्याच टपरीवर आम्ही जेवायचा निर्णय घेतला. चविष्ट ऑमलेट पोळीचं सेवन केलं. पाऊस थांबल्यावर पुढे प्रस्थान केले. पाऊस पडून गेल्यामुळे ओले रस्ते आणि रस्त्यांची कामं सुरू असल्याने वाहतुकीचा त्रास होत होता. कसेबसे साताऱ्याच्या वेशीवर पोहोचलो.
डॉक्टर दीपक कुलकर्णींचे शिष्य कम मित्र डॉ. अविनाश पोळ यांनी निवास व्यवस्था केली होती आणि आमच्या स्वागतासाठी ते जातीने हजर होते.
सर्व आवरल्यानंतर हॉटेलच्या कॉन्फरन्स रूमध्ये डॉ. पोळांकडून त्यांनी केलेल्या सामाजिक कामाबद्दल माहिती दिली. ते ऐकताना आम्ही मंत्रमुग्ध झालो. त्यांच्या जडणघडणीत ज्या गुरूंच्या मार्गदर्शनाचा त्यांनी उल्लेख केला त्यात डॉ दीपक कुलकर्णींचा समावेश होता. आम्हाला डॉ दीपक कुलकर्णी आमचे मित्र आहे याचा अभिमान वाटतो!!
एक माणूस इच्छाशक्तीच्या जोरावर काय परिवर्तन करू शकतो याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे डॉ पोळ.
डॉ पोळांच्या कार्याबद्दल अधिक माहिती पुढील भागात…

क्रमशः

देवदत्त टेंभेकर
कोथरूड, पुणे

day 15

दिवस १५ वा
जानेवारी १०, बुधवार
हॉटेल मानसी प्राइड कोल्हापूर ते सारसबाग पुणे. (११२ किमी, एकूण १६४९ किमी)

काल रात्रभर डॉक्टर अविनाश पोळांचे विचार माझ्या मनामध्ये येत होते.
रामकृष्ण मिशनचं काम करणारे त्यांचे शाळेचे शिक्षक आगटे सर हे डॉक्टर पोळांचे पहिले गुरु असं ते म्हणतात. त्यांनी डॉक्टर पोळांना एक होता कार्व्हर पुस्तक वाचून दाखवलं. कार्व्हरच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव बालवयातच डॉक्टर पोळांवरती पडला.
त्यांचे दुसरे गुरु म्हणजे डॉक्टर दीपक कुलकर्णी. दीपक कुलकर्णींचा वक्तशीर पणा आणि काम करण्याची पद्धत यामुळे ते खूप प्रभावित झाले आणि त्या गुरु शिष्यांचं नातं एका वेगळ्या उंचीवर गेलं.
डेंटल सर्जन झाल्यानंतर प्रॅक्टिसच्या अगदी सुरुवातीला एका घटनेमुळे त्यांच्यात अमुलाग्र बदल झाला. त्यांचे पाय गावाकडे वळले आणि गावकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन गावकऱ्यांच्या सहकार्याने समस्या निराकरण करण्याची त्यांना आवड निर्माण झाली. कालांतराने ते अमीर खानच्या पाणी फाउंडेशनचे सल्लागार म्हणून काम बघायला लागले.
वैद्यकीय डॉक्टर असूनही पाणी विषयावर काम करताना सर्व अडचणींवर त्यांनी मात करून त्या विषयाचे ज्ञान प्राप्त केले. अनेक शासकीय अधिकारी, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री यांच्याशी त्यांचा कामाच्या निमित्ताने संपर्क येत असतो. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पुरस्कार डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते मिळाला आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि संभाषण कौशल्य जबरदस्त आहे. अशा व्यक्तींना प्रत्यक्ष भेटता येणं हे भाग्याचं लक्षण आहे.
अजून मनात खूप आहे. पण आवरतं घेतो.

सकाळी ६:४५ वाजता निघून ३८ किमी वरील अभिरुची मधे कोथिंबीर वडी, थालीपीठ आणि खरवस घेतलं.
पुढे ६० किमी वर शिरवळला अविनाश मेढेकरांचे फॅमिली फ्रेंड डॉक्टर देशमुख यांच्याकडे कोल्ड्रिंक्स, वडापाव आणि चहा घेतंला. डॉ. देशमुखांना अश्विनी
आणि रोहिणी ओळखत होत्या. (अश्विनी व्यवसायामुळे तर रोहिणीचं प्रबोधिनी कनेक्शन) डॉ देशमुखांनी पुढाकार घेऊन शिरवळ सारख्या लहान गावात तरूणांमधे सायकलिंगची आवड निर्माण केली. सध्या तिथे त्यांच्या पुढाकारातून सायकलिंग क्लब स्थापन केला. त्या क्लबचे काही सदस्य आम्हाला भेटायला आले होते.
खेड शिवापूर टोल नाका आणि कात्रज टॉप येथे पुढील कलेक्शन point होते.
कात्रज टॉप ला मॉडेलिंग ची हौस असणाऱ्या सर्वांनी शेवटलं फोटोसेशन करून घेतलं. उद्यापासून कोण विचारणार?

दुपारी ४:१५ वाजता आम्ही पुण्याच्या सारसबाग गणपती समोर सुखरूप पोहोचलो तेव्हा आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला. आमचे यंग सिनियर्सचे मित्र (दत्ताभाऊ, यतिन,अनिरुद्ध, रेश्मा,माधव, श्री शिदोरे इत्यादी) आणि सर्वांचे कुटुंबीय आले होते. हार आणि गुलाब पुष्प देऊन आमचं स्वागत केलं. भरपूर गर्दी झाल्याने रस्त्यावरून जाणारे आश्चर्यचकित नजरेने बघत होते.
एक जाणवलं की आम्ही सायकलने रस्त्यावरून जाताना कोल्हापूर पर्यंत रस्त्यावरील अनोळखी लोक, विशेषतः मुलं आमची विचारपूस करायचे, अभिवादन करायचे. कोल्हापूर सोडल्यानंतर त्याचं प्रमाण बरंच कमी झालं. पुणे जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश केल्यावर ते पूर्णपणे बंद झालं. पुणे जवळ आल्याची खात्री पटली. त्या बॅकग्राऊंड वर सारसबागला जमलेली गर्दी बघून आम्ही गलबलून गेलो.
या राईडचं रूट प्लॅनिंग कॅप्टन अविनाश मेढेकरांनी केले होते. ज्या रूटनी आम्ही कन्याकुमारी ते पुणे राईड केली त्या रूटनी इतर कोणी केल्याचं ऐकिवात नाही.
आमच्या टीमचं नेतृत्व करणारे अविनाश हे सार्वमताने man of the series जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे.
तसेच tour manager डॉ. अश्विनी कुलकर्णी यांना विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल “Outstanding Perfomance” साठी A+ मानांकन देऊन भविष्यातील मोहिमांसाठी कायम सदस्य म्हणून मान्यता देण्यात येत आहे.
विनायक माढेकरांना त्यांच्या फोटोग्राफी कौशल्यासाठी विशेष पारितोषिक आणि अंतिम संघात कायम स्थान बहाल करण्यात येत आहे.
सत्तरीतल्या सदस्यांना यंग सिनियर्स क्लबची लाईफ मेंबरशीप आणि सन्माननीय डी लिट देण्याचे मंडळाने जाहीर केले आहे.
या मधे डॉ एपी कुलकर्णी, अनिल ओक, तानाजी सावंत, डॉ दीपक कुलकर्णी, पद्माकर आगाशे हे आहेत.
पुरुषोत्तम जोग यांनी खजिनदार या पदाला गौरव प्राप्त करून दिला आहे. या कामाची मंडळाने दखल घेतली आहे त्याच बरोबर आगाशेंच्या अनुपस्थितीत स्पोक्स पर्सन म्हणूनसुद्धा त्यांनी असाधारण योगदान दिले आहे.
फेयर प्ले अवॉर्ड चे १५ दिवसांचे मानकरी प्रदीप भवाळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन!!
या १५ दिवसांत ते एकदाही चिडले किंवा रागवले नाहीत किंवा कोणालाही दुखवले नाही हे लक्षात घेऊन ज्युरींकडे त्यांच्या नावाची शिफारस अनेकांनी केली होती.
महाभारत धर्मयुद्ध झाल्यानंतर सारथ्य करणाऱ्याचे गुणगान कोणी केले नाही. आमच्या टीमचा चक्रधर हा अतिशय श्रेष्ठ दर्जाचा सारथी आहे. त्याने प्रसंगी कठोर वागून लोकांचे लक्ष उद्दीष्टांपासून ढळू दिले नाही म्हणून मंडळाने त्यांच्या विशेष नैपुण्याची दखल घेतली आहे.
पदार्पणातच शतकांवर नाबाद शतक झळकवणाऱ्या रोहिणीला नवोदित स्टार चा किताब जाहीर करताना मंडळाला आनंद होत आहे. २५ डिसेंबर ते १० जानेवारी या कालावधीत घेतल्या गेलेल्या अनेक चाचण्या त्यांनी यशस्वीपणे दिल्या होत्या. त्याचं मूल्यांकन करण्याचं काम सुरू असल्याने
संघातील स्थान पक्के होण्यासाठी त्यांनी अजून प्रयत्न करणे गरजेचे आहे.
शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात टीममधील सदस्यांचे विचारस्वातंत्र्य अबाधित राहील याची अहोरात्र काळजी घेणाऱ्या डॉ. दीपक कुलकर्णी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. असो.
आमच्या टीममध्ये अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात दिवस गेले. दंगा, मस्ती, मस्करी आणि त्याला रुसव्या फुगव्यांची फोडणी देऊन हे मंतरलेले दिवस आज संपणार म्हणून वाईट वाटत आहे. त्याच बरोबर आपल्या घरी जाण्यासाठी सर्वजण आतुर झाले आहेत.
एकदा काही विशिष्ट हेतूने एपी कुलकर्णींनी लंच स्किप केला. आम्ही अशा टपरीवर जेवण केले की जिथे पोळी आणि ऑमलेट वर भागवले. जेवण करून बाहेर आलो तर एपींनी मला जवळ बोलावले आणि म्हणाले ” प्रकाश, तुला जेवण झाल्यावर गोड खायला आवडतं नं?” त्यांच्या प्रश्नावर मी होकारार्थी मान हलवली. आम्ही ज्या टपरीवर जेवलो तिथे एखादा गोड पदार्थ मिळू शकेल याची शाश्वती नव्हती. एपींनी आपल्या पोतडीतून सोनपापडीचा सील्ड डबा काढून मला एक पीस भरवला. हे असं bonding होतं आमच्या टीमचं!! मी तर भारावून गेलो… धन्यवाद एपी.

कुटुंबियांच्या पाठिंब्याशिवाय इतके दिवस घराबाहेर जाणे शक्य नाही. आमची मजा सुरू असताना त्यांना सजा होते ही वस्तुस्थिती आहे. सकाळी मेसेजची वाट बघणे, अधेमधे फोनकडे बघणे, unknown नंबर वाजला असता धडधड होणे, मुक्कामी पोहोचल्याचा मेसेज येईस्तोवर अस्वस्थ असणे. घरी कोणी आल्यावर काही चांगलं चुंगलं खायला केलं तर आमची आठवण येऊन घशात घास अडकणे अशा अनेक गोष्टी त्यांच्या दैनंदिन जीवनात घडत असतील याची जाणीव आहे. आम्हालाही रोज घरची आठवण येत होती. (ज्यांना येत नव्हती त्यांनी आम्हाला ऐवजी प्रकाशला असे वाचावे) त्यांनाही कधी तरी उचकी लागत असणार… आज त्या थरार नाट्यावर पडदा पडून शेवट गोड होत आहे.
डॉक्टर दीपक कुलकर्णी आणि डॉक्टर एक पी कुलकर्णी यांनी या राईडचे स्वप्न पाहिले त्यात आम्हाला सहभागी करून घेतले त्यामुळे आम्हाला हा आनंद अनुभवता आला.
बघता बघता १६००+ किलोमीटर अंतर सर्वांनी पार केले, कसे केले ते कळलंही नाही. वैयक्तिक रेकॉर्ड पेक्षा सांघिक यश खूप सुखावून गेलं.
हे वृत्त संपवताना राईडच्या वेळी सुचलेल्या काही ओळी….

नकोत आम्हा हारतुरे
अन् नको मान सन्मान
प्रेम जिव्हाळा आप्त जनांचा
हाच खरा बहुमान

झाले बहु होतीलही बहु
दिग्गज असती थोर
चरण धूळ मस्तकी तयांची
आम्ही असू पामर

आपण सर्वांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मी लिहीत गेलो. माझे बोबडे बोल तुम्ही गोड मानले. तुमच्या या ऋणात रहाणेच मला आवडेल…

समाप्त

देवदत्त टेंभेकर
कोथरूड, पुणे

Responses

  1.  Avatar

    सर्व सहभागी सायकल मित्रांना व supportटीम यांना मनापासून शुभेच्छा

  2.  Avatar

    मस्त वर्णन. डोळ्या समोर तरळत असल्याचे वाटते 👌

  3.  Avatar

    सर,
    खुपचं सुंदर शब्दांकन,
    सदर लेख वाचतांना आम्हीसुद्धा आपल्या समवेत प्रवासात आहोत असा भास होतो….
    -किशोर विघे

  4. Reshma Avatar

    खुप मज्जा येते आहे वाचायला, किती छान ओघवतं लिहिता तुम्ही 👏🏼👏🏼👌👌 आम्ही मात्र इथे FOMO चे शिकार होतोय .. ☺️☺️ .
    आज सगळे भाग परत वाचले .. your writing skills are learning for me 🙏🙏
    असेच छान आनंदी आणि सुखरूप होऊ देत पुढचे रायडींग चे दिवस पण 👌👍🏻👍🏻

  5.  Avatar

    अतिशय सुंदर लिहिले आहे. पुस्तक रुपाने पुढे पब्लिश करायचा विचार करावा..

  6.  Avatar

    अप्रतिम.. 👏👌💐

  7. A K Avatar

    रोजचा वृत्तान्त वाचत होते. तुमचा प्रवास घरबसल्या अनुभवताना मजा आली. आणखी अशाच सायकल सफरींसाठी खूप खूप शुभेच्छा!!

Leave a Reply

Discover more from Saee Tembhekar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading