West to East India Cycling Expedition 2022 – Devdatta Tembhekar

I am sharing excerpts of the daily little write-ups that my dad writes during his expeditions. Whatsapp has its limitations and since a lot of people requested access to his write-ups, I am consolidating it here on this blog link so it can be shared with all well-wishers. He inspires a lot of people and we wish to take along all of you with us on this incredible journey. Please feel free to comment below as he will be reading all your kind words! Thank you!


From the last sunset of India to the first sunrise, Dad will be travelling 3800 kms on bicycle with his buddies! After Pune- Kanyakumari, Manali- Leh-Khardungla, now comes this feat which none other has achieved!
Please shower your blessings on this group and keep them coming all along!Love you and proud of you Baba! 🥺♥️💜

Quick-links

Day-1 and Day 0
Day 1
Day 2
Day 3
Day 4
Day 5
Day 6
Day 7
Day 8
Day 9
Day 10
Day 11
Day 12
Day 13
Day 14
Day 15
Day 16
Day 17
Day 18
Day 19
Day 20
Day 21
Day 22
Day 23
Day 24
Day 25
Day 26
Day 27
Day 28
Day 29
Day 30
Day 31
Day 32
Day 33
Day 34
Day 35
Day 36
Day 37
Day 38
उपसंहार

Day -1 and Day 0

7/11/2022

सकाळी शनिवार वाड्यावर क्रीडा क्षेत्रातील नामवंत, यंग सिनियर्स चे सहकारी आणि कुटुंबीय फ्लॅग ऑफ करण्यासाठी एकत्र जमले होते.
अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात हा समारंभ पार पडला. यावेळी यंग सिनियर्सच्या सदस्यांव्यतिरिक्त इतर सायकल प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोहिमेसाठी कुटुंबीयांचे सहकार्य आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद लाभावे यासाठी मोहिमेचे कर्णधार श्री संजय कट्टी ह्यांनी गिनीज बुक रेकॉर्ड होल्डर आशिष कासोदेकर, उमेश झिरपे, पहिला भारतीय एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण, किशोर धनकुडे, यशोधन बाळ, पीएमसी चे परदेशी साहेब, कॅप्टन महेश जोग, मैथिली जोग आदि क्रीडा क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केले होते.
त्याच बरोबर पुणे विद्यार्थी गृहाचे अध्यक्ष श्री रेडेकर, आनंदघन चे श्री कदम, रीसर्च पार्क फाऊंडेशन एसपीपीयु चे डॉ शाळीग्राम, ब्ल्यू प्लानेट स्मार्ट कुकीज चे अविनाश कुलकर्णी आणि रॉकी पंडिता , युवा शक्ती फाऊंडेशन चे सतिश पवार, स्प्रे डिजिटल चे अक्षय पासलकर आदी शुभेच्छुकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

परदेशी साहेबांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर डॉ अपर्णा कुलकर्णींनी मोहीम करणाऱ्या सदस्यांचा अतिशय खुमासदार शैलीत परीचय करून दिला.
क्रीडा क्षेत्रातील वरील सर्व मान्यवरांनी अतिशय प्रेरणादायी शुभेच्छा दिल्या. शेवटी राष्ट्रध्वज हातात घेऊन सामुहिक राष्ट्रगीत गायनाने छोटेखानी समारंभाची सांगता झाली.
या सदिच्छांची शिदोरी घेऊन आम्ही आज संध्याकाळी भुज एक्स्प्रेसने मोहिमेसाठी रवाना होणार आहोत.

संध्याकाळी ७ वाजता

भुज एक्स्प्रेस फलाटावर लागण्यापूर्वी एक एक करून सर्वजण जमले. अनिल ओक, दत्ताभाऊ गोखले, सुप्रिया, अनुराग, सोनाली, अनघा आणि विनायक निरोप देण्यासाठी आवर्जून स्टेशनवर आले होते.
अजिबात जागा नसतांनाही अनघा आणि सोनालीने आग्रहाने आमच्यासाठी खाऊ दिला. गाडी सुटण्यापूर्वी जंगी फोटोसेशन झाले.

उदयपूर पर्यंत आमच्या सोबत राईड करणारे अविनाश मेढेकर, प्रणय गुजर, पद्माकर आगाशे, डॉ कोकणे, सुनील भावे, तानाजी सावंत आणि गौतमजी वेळेत पोहोचलेत. गौतमजी सोडून सर्वांना एकाच कोचमधे जागा मिळाली. गौतमजी आमच्याच कोचमधे बसले. सर्वजण एका ठिकाणी आल्यावर आमची दंगा मस्ती सुरू झाली.
थेपले, दहीभात, भाजीपोळी, चिकन रोल वर सर्वांनी यथेच्छ ताव मारला…
इतर सहप्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून सर्वजण शहाण्या मुलांसारखे झोपी गेले…

०८/११/२०२२ मंगळवार
सकाळी झोपेतून उठल्यानंतर दंगामस्ती फेज २ सुरू झाली. नाश्त्याला मेथीचे थेपले, खाऱ्या पुऱ्या, दाण्याची चटणी, दही, चहा कॉफी होती. चहा कॉफी व्यतिरिक्त सर्व पदार्थ घरून मिळालेलेच होते.
गप्पा, टिंगलटवाळी करताकरता दुपारचा १ वाजल्यावर पुन्हा भूक लागली. घरून आणलेले सर्व पदार्थ फस्त करून झाल्यावर मसाला ताक, फलाहार केला. शिवाय जोडीला आगाशेंनी आणलेल्या चकल्यांचा फडशा पाडला… ट्रेन ४० मिनिटे लेट झाली.
आमचं नशीब खूप छान म्हणून फक्त ४० मिनिटे लेट. मागील आठवड्यात १२ तास लेट झाली होती असे कळले!!!
म्हणजे सर्वांच्या सदिच्छा पाठीशी असल्याने नशीब पण आमच्या बाजूने होते.
भूज ला उदयपूर टीमचे सपोर्ट व्हेइकल आणि एक ट्रॅक्स गाडी तयार होती. स्टेशन समोर फोटो सेशन झाल्यानंतर कोटेश्वरकडे प्रस्थान केले. कोटेश्वर कडे जाताना मधल्या एका गावात संजय कट्टींचे मित्र मोहनभाई पटेल भेटले. मला तर कमालच वाटली. ट्रेकिंग आणि सायकलिंगमुळे भारतात सर्वत्र त्यांचा मोठा मित्रपरिवार आणि चाहते आहेत. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी त्याची प्रचिती आली. मनांत आलं ही खरी “भारत जोडो” यात्रा!!!
संध्याकाळी ७ वाजता नारायण सरोवराच्या एका धर्मशाळेत पोहोचलो. खूप सुंदर परिसर आहे.
मुक्कामाच्या जवळच अप्रतिम विनामुल्य जेवणाची सोय होती. इतक्या दुर्गम ठिकाणी इतकी छान सोय तेही विनामुल्य!!
आपल्या देशात अनेक संस्था उत्तम अन्नछत्र चालवतात .

Day 1

९/११/२०२२ बुधवार
दिवस पहिला.

पहाटे ५:३० सर्वजण तयार झाले. महेश, सपोर्ट व्हेइकलचा चक्रधर, सर्वांसाठी चहा घेऊन आला. त्यासोबत सोनालीने दिलेल्या केकचा आस्वाद घेतला. Sonali, cake was too good.

Pannier लावून सायकल चालवायची पहिलीच वेळ असल्याने खूप एक्साईट झालो होतो.
आधी वाहनाने लखपत फोर्टवर भेट दिली. अतिशय सुंदर भुईकोट किल्ला आहे.
आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य आहे.
खाडीच्या पलिकडे पाकिस्तान बॉर्डर आहे.
आम्ही भारताच्या पश्चिम टोकावर आहोत.
फोटोसेशन करून झाल्यावर मुक्कामाच्या जागी येवून जवळच गरमागरम फाफडा, जिलबी आणि भजी हादडली…
आजपासून राईडला सुरुवात होत असल्याने सर्वजण खूप एक्साईट झाले होते.
अनसपोर्टेड राईड करणार्या चौघांनी Pannier सायकलवर चढवले आणि कोटेश्वर मंदिराकडे प्रस्थान केले. वाटेत पोलीस चेक नाक्यावर पहिले फ्लॅग ऑफ आणि मंदिर परिसरात ऑफिशियल फ्लॅग ऑफ केले.
मंदिर अतिशय अप्रतिम आहे. तीन बाजूंनी समुद्राची खाडी आणि सिंधू नदीचे डेल्टा आहे. किती फोटो काढू आणि किती नको असे झाले होते.
सकाळी साडे अकरा वाजता ऑफिशियल फ्लॅग ऑफ करून मोहिमेला सुरुवात झाली. शामजीभाई जातीने हजर होते.
वातावरण चांगले होते. रस्ता पण उत्तम म्हणावा असा होता.
वर्मा नगर येथे जेवण्यासाठी थांबलो. अतिशय रुचकर आणि authentic गुजराती जेवणाची सोय शामजी भाईंनी केली.
दयापर येथे चहा पिण्यासाठी थांबलो.
दुपारी साडेचार वाजता माताना मन या आजच्या मुक्कामावर पोहोचलो. या आशापुरी हॉटेल येथे मुक्काम आहे.
फ्रेश झाल्यावर देवीचे दर्शन घेतले. खूप सुंदर मंदिर आहे. इथे सुद्धा महाप्रसाद म्हणजे पूर्ण जेवण मिळतं. तिथे महाप्रसाद घेऊन विश्रांती साठी मुक्कामाच्या ठिकाणी आलो.
माझ्यासाठी आजचा दिवस विशेष उल्लेखनीय आहे. ५४ दिवसांच्या गॅप नंतर आज १२ किलोची pannier घेऊन सायकल चालवायची होती. हे माझ्यासाठी आव्हानात्मक होते. दमछाक होऊनही आजची ५९ किमी ची राईड पूर्ण केली!!
कमी अंतर शिल्लक असताना गौतमजींची सायकल पंक्चर झाली एवढी एक गोष्ट सोडली तर आजचा दिवस सर्वांसाठी उत्तम ठरला.
उद्या पहाटे लवकर निघून भुज गाठायचे आहे.
Body needs rest now….
Good night.

क्रमशः
हा तीन दिवसांचा बॅकलॉग आहे.
उद्यापासून रोजचं वर्णन दिवसाप्रमाणे लिहिण्याचा मनसुबा आहे. बघुया कसं जमतं ते.

Day 2

10/11/22 दिवस २ माताना मध ते भुज

आज भारत इंग्लंड सेमीफायनल मॅच असल्याने सकाळी लवकर निघायचं ठरलं.
मातान मध लहान गाव. सायकल सुरक्षित रहाव्या म्हणून एका प्रायव्हेट पार्किंग मधे सायकली लावल्या होत्या. पहाटे लवकर निघायचे आहे असं सांगितलं होतं..
सकाळी बघतो तर पार्किंग फुल्ल होतं आणि त्याच्या प्रवेशासाठी जी जागा होती तिला भलीमोठी लाकडाची फळी लावून प्रवेश बंद केला होता. आता काय करावे असा विचार सुरू असताना आम्ही कसरत करून फळी काढण्याचा निर्णय घेतला…
या सर्व भानगडीत निघायला थोडा उशीरच झाला. जेमतेम निघालो तर संजय कट्टींच्या सायकलचा स्पोक कट्टकन तुटला. इतक्या पहाटे अंधारात काही दिसत पण नव्हतं.
शेवटी त्यांची सायकल गाडीत टाकावी लागली. डॉ. कोकणेंनी दिलदार मनाने कट्टींना सायकल चालवायला दिली.
निघालो तेव्हा प्रचंड काळोख होता. नुकतीच पौर्णिमा होऊन गेल्याने चंद्र प्रकाशात सायकल चालवण्याचा अलौकिक आनंद लुटला.
मोहनभाई अक्षरशः सावली सारखे त्यांची कार घेऊन आमच्या सोबत होते. त्यांच्या रूपाने देव आमच्या पाठीशी आहे अशी माझी खात्रीच पटली.
१८ किमी नंतर उघाडणी गावात चहासाठी थांबलो. खारी आणि टोस्ट मुळे चहा अंमळ जास्तच घेतला गेला.
रस्ता छान होता. विशेष चढ उतार नसल्याने डायरेक्ट ४५ किमी वर नखत्राणा गावात नाश्त्याला थांबलो. मोहनभाईंच्या मित्राच्या कार्यालयात व्यवस्था केली होती.
फाफडा, जिलबी आणि सा़ंभारा आदी अस्सल गुजराती पदार्थ नाश्त्याला होते. मोहनभाई आमच्या सोबत असताना नाश्ता, जेवणाचे पैसे देऊ देत नाहीत…
याच्यापुढे मी थोडा ढेपाळायला लागलो. आमच्या टीमचा Lastman…
७१ किमी वरील देसलपर गांवात सर्वजण माझी वाट बघत थांबलेले होते. तिथे प्रत्येकाने किमान अर्धा लिटर ताक प्राशन केले.
दुपारी २ वाजता नीलकंठ भवन या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो.
आज भारत विरुद्ध इंग्लंड सामना असल्याने
रूममध्ये गेलो आणि टीव्ही सुरू केला….

क्रमशः

day 3

11/11/2022
दिवस तिसरा भुज ते समख्याली १०० किमी

सायकलिंग केल्यानंतर रोजचं वार्तांकन करण्याचं सर्वांना आश्चर्य वाटतं. पण खरं सांगायचं तर त्यात विशेष काही नाही.
आम्ही हॉटेल मधे रूम शेअर करतो.
एक पार्टनर आवरत असताना बराच वेळ मिळतो. तेवढ्या वेळात लिहून होतं. तसेच दुपारच्या जेवणानंतर विश्रांती घेताना वेळ मिळतो… असो..
कालची आमची मुक्कामाची जागा अतिशय छान होती. स्वामीनारायण संस्थानची असल्याने अतिशय स्वच्छ आणि प्रशस्त होती. तिथून जवळच पायी अंतरावर भुज palace आणि हमीरसार लेक आम्ही बघितला. Palace परिसरात लगान पिक्चर शूटिंग झाल्याचं आम्हाला कळलं.
लेकला भेट दिली तेव्हा सुर्यास्त नुकताच होऊन गेल्याने आभाळातल्या लालीचं प्रतिबिंब डोळ्याचं पारणं फेडणारं होतं. तिथून हलावसं वाटत नव्हतं… रात्रीचं जेवण मुक्कामाच्या ठिकाणीच होतं. वांगी बटाट्याची भाजी, आमटी, खिचडी फुलके असा अत्यंत चवदार मेनू होता.

आज पहाटे ६ वाजता आम्ही समख्याली कडे प्रस्थान केले.
जवळच्या टपरीवर चहा घेऊन राईड सुरू केली.
रस्ता आणि वातावरण चांगले होते. सुरुवातीला केलं विंड असल्याने सर्वांनी सायकल “हापसली” (हा खास कॅप्टन मेढेकरांचा शब्द)
वाटेत Suzlon, BKT (बाळकृष्ण टायर), AMW (Asia Motor Works) असे मोठे कारखाने दिसले.
या भागात मोकळी आणि नापिक जमीन बरीच आढळली. भविष्यात या भागात मोठे उद्योग येतील असे वाटते.
रस्त्याच्या समतल रस्त्याला लागून वाळू बघून आपण वाळवंटात असल्याची जाणीव झाली. दोन्ही बाजूला मीठागरे दिसत होते.

३० किमीवर धनेती गावातल्या हॉटेल भगवतीला नाश्ता केला. आज पहिल्यांदा फाफडा जलेबी व्यतिरिक्त नाश्ता मिळाला. (चवदार पोहे)
सकाळी ९ नंतर वार्याची दिशा बदलली. हेड विंड मुळे स्पीड कमी झाली.
साधारण ५० किमी वर नवागाव पाटिया गांवात एका धाब्यावर हायड्रेशन ब्रेक दरम्यान पेरू खाल्ले.
दुपारी १ वाजता ८० किमी वर बच्चाव गावात Honest हॉटेल मधे अप्रतिम गुजराती थाळीचा आस्वाद घेतला. थाळीत असलेले पदार्थ बघून किंमतीचा अंदाज आला नाही. केवळ १६० रुपयांत इतकी छान थाळी मिळू शकते असे पुण्यातील लोकांना स्वप्नातही येणार नाही.
भोजन उपरांत विश्रांती आवश्यकच असते. (तसंही पुण्याचे असल्याने १ ते ४ काम करायची सवयच नाही!!)
निघण्यापूर्वी हीना मोदी नावाच्या महिलेने तिच्या Insta Story साठी आमच्या ग्रूप सोबत फोटो काढून घेतल्यामुळे आम्हाला सिलिब्रिटी स्टेटस असल्याची जाणीव झाली 😅
आजचा मुक्काम समख्याली गावात आहे. हे गाव East to West Corridor NH 27 वर आहे.
विशेष म्हणजे या मोहिमेतील सर्वांची पहिली सेंच्युरी राईड झाली. त्यामुळे सगळे आनंदात आहोत.
आता यापुढे रोजच सेंच्युरी राईड होणार..
अजून एक गोष्ट म्हणजे आजपासून माझे ग्रहमान बदलले आहेत. माझ्या मागील Jet Lag ची दशा संपुष्टात आली. नॉर्मल होण्यासाठी बरोबर ७ दिवस लागले.
आजच्या दिवसाची कथा इथेच संपवतो.
उद्या संध्याकाळी पुन्हा भेटूया!!!
(फोटो ग्रुप वर वेळोवेळी जात असल्याने मी यासोबत पाठवत नाही. तुमच्या फोनची मेमरी अतिरिक्त मीडिया पासून सुरक्षित रहावी म्हणून…)

क्रमशः

Started from Bhuj

Lunch Break
Hydration Break

Day 4

१२/११/२०२२ शनिवार
समख्याली ते सिधादा १११ किमी..

नमस्कार
एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली… इकडे इतका दंगा मस्ती करतात की सलग विचार करायला जमत नाही…😅
तर ही गोष्ट आहे भुजची. संजय कट्टींच्या सायकलचा स्पोक तुटला तो दुरुस्त करायला तिथला एक कॉन्टॅक्ट कट्टींना मिळाला होता. त्या व्यक्तीचं नांव मिलन धमेचा. मोनिष त्याला आमच्या मुक्कामाच्या जागेवर घेऊन आला. त्यानी स्पोक लाऊन दिला शिवाय काही स्पेयर स्पोक्स पण दिलेत. स्वतः पुढाकार घेऊन आमच्या सर्वांच्या सायकलस् चेक केल्या. माझ्या सायकलला मेजर प्रॉब्लेम होता तो त्याने काही सेकंदात दुरुस्त केला त्यामुळे माझी सायकल पूर्वी पेक्षा स्मूथ चालायला लागली आणि एफर्टस पण कमी झाले.
तो स्वतः एस. आर. (Super Randonneur) सायकलिस्ट आहे. येवढं करून आमच्याकडून पैसे घ्यायला नकार दिला. इतके निस्वार्थी आणि परोपकारी लोक या जगात असतात. देव अशा लोकांच्या माध्यमातून आपल्याला मदत करत असावा…

आज शनिवार. हनुमंताचे स्मरण करून सकाळी सव्वासहाला पूर्व दिशेकडे कूच केले. सकाळच्या काळोखात एक वळण चुकले. वेळीच लक्षात आल्यामुळे फार हेलपाटा पडला नाही.

आजचा आमचा रस्ता होता
लंपेटीलम् बंपेटीबम्
स्वारी आम्ही करत होतो
धडम धुडुम धडाम धुडुम!!

असेच वर्णन आजच्या रस्त्याबद्दल करता येईल. आतापर्यंत इतका खडबडीत रस्ता बघितलाच नाही. एखाद्या कुपोषित जनावरांच्या बरगड्या दिसतात तशी दुर्दशा या रस्त्याची झाली आहे. त्यामुळे स्पीड मिळत नव्हती. पार्श्वभागाच्या पृष्ठभागाची अक्षरशः वाट लागली की हो….
जवळपास ७० किमी अंतर अशा रस्त्यावरून पार केले.
सकाळचा नाश्ता ३२ किमी वरील मेवासा गावातल्या “हायवे इन” येथे केला. पोहे, उसळ शेव (आपल्याकडील मिसळ असते तशी), आणि आलू पराठा. चौघांमधे प्रत्येकी एक प्लेट..
पुढे वाटेत आम्हाला Rann Of Katchha लागले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पावसाचं पाणी साचलेला विस्तिर्ण जलाशय. त्यात निवांतपणे बसलेले स्थलांतरित पक्षी 🐦
बघून फोटो काढण्याचा मोह आवरू शकलो नाही.
दुपारचा चहा पलसवा गावात नवदुर्गा येथे घेतला.
जेवण रोझू गावात कृष्णाई आई माता धाब्यावर घेतले. दाल, रोटी, भात आणि छास… जेवण झाल्यावर तिथे खाटेवर चक्क तासभर विश्रांती घेतली. जागा कोणतीही असली तरी पुणेकर १ ते ४ विश्रांती घेणारच!!😁
आजचा मुक्काम सिधादा येथील हॉटेल सहयोग येथे आहे. निवास व्यवस्था उत्तम आहे.
सेंच्युरी राईड झाल्यामुळे सर्वजण खुष आहेत. आता उद्याची तयारी करायची आहे.

@देवदत्त टेंभेकर
क्रमशः

day 5

दिवस पाचवा
Sidhada to Deesa 116 kms

आज एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे सायकलिंग करताना You are living with the moment..कारण तसं नाही केलं तर…? म्हणजे असं की समोर रस्ता दिसतो आणि दिवसाचं टार्गेट मनात असतांना इतर विचार डोक्यात येतच नाहीत.

नेहेमीप्रमाणे शार्प ६ वाजता चहा पिऊन प्रस्थान केले. आज आमच्या नशिबात कसा रस्ता असेल असा विचार करेपर्यंत “मलई मारके चीज सँडविच” टाईपचा रस्ता समोर ठाकला. वातावरण पण छानच होतं.

३० किमी वरील Honest ला ब्रेकफास्टला थांबलो. आज चक्क साऊथ इंडियन डिशेस मिळाल्या.
नाश्ता झाल्यावर दोन गटात वर्गीकरण करण्यात आले. रानी की वाव ज्यांना बघायची होती ते थार गावापासून पाटण च्या रस्त्यावर वळलेत.
मी, संजय कट्टी, प्रदीप भवाळकर आणि मोनीष सरळ निघलो. आम्ही कुटुंबियांसोबत आधीच बघितले असल्याने पुन्हा तिथे जाण्याचे टाळले.
कच्छ चं रण सोडल्या नंतर आजूबाजूला हिरवाई दिसू लागली. उभी पीकं असलेली शेतं आणि फुलझाडं बघून मन प्रसन्न झालं. या भागात प्रामुख्याने भुईमूग, पाम, मोहरी आदी तेलबिया असलेली पिकं आढळली. शेताचा आकार आपल्या कडील शेतांपेक्षा बराच मोठा आढळून आला. कदाचित या भागात शेतीची वाटणी करत नसावेत.
दुसरी गंमत म्हणजे आम्हाला भेटलेल्या सुखवस्तू वर्गातील स्थानिक लोकांना मराठी बोलता येते कारण त्यांचा व्यवसाय पुणे परिसरात आहे. इतक्या दुरून आपल्या भागात यशस्वी व्यवसाय करण्याचे त्यांचे कसब वाखाणण्याजोगेच आहे.

सुंदर रस्ता असल्याने झपाट्याने अंतर कापत शिहोरी गांवात ताक घेण्यासाठी थांबलो. (७७ किमी) तिथे एका अमुलच्या आउटलेट मधे ताक मिळाले. ती जागा भिकाभाईंच्या मालकीची होती. भिकाभाई शिह़ोरीचे काँग्रेस प्रेसिडेंट आहेत. सीमाताई ची आठवण येऊन आम्ही सीमाताई ची ओळख दिली. कदाचित त्यामुळेच त्यांनी आमच्याकडुन पैसे घेतले नाहीत. (😅)

आठवणीं वरुन आठवलं की आम्हाला यंग सिनियर्स च्या सर्वांची खूप आठवण येते. त्यात काल अश्विनी आणि हिंगे साहेबांनी विक्रम नोंदविले. अश्विनी आता हिंगे साहेब केशव आणि विनायक च्या लायनीत गेली आहे.
तुम्ही लोक जो पराक्रम करता त्याच्यापुढे आम्ही अगदीच लिंबू टिंबू आहोत.
आमच्या सध्याच्या टीम मध्ये डॉ कोकणेंकडे बघून हिंगे साहेबांची आठवण येते. तशीच एनर्जी, तोच उत्साह आणि तसाच जोश.
काल हिंगे साहेबांना नक्की उचकी लागली असणार… असो

आम्ही चौघांनी भिलडी गावात हॉटेल सिलसिला येथे लंच साठी थांबलो.(१०० किमी). जेवण झाल्यावर वामकुक्षी घ्यायचा मोह आवरला नाही..😅

शेवटचे अंतर पार करायला विशेष वेळ आणि कष्ट घ्यावे लागले नाही.
दुपारी ४:३० वाजता हॉटेल झोरबा या मुक्कामाच्या ठिकाणी सुखरूप पोहोचलो.
दुसरी टीम येईपर्यंत वाट बघत आहोत.
आज अशी प्रार्थना करतो की इथून पुढे असेच रस्ते मिळोत.. आज आमचा ५०० किमी चा टप्पा पूर्ण झाला याचा आनंद आहे.
उद्यापासून आम्ही राजस्थानात प्रवेश करू.

क्रमशः
@देवदत्त टेंभेकर

Raring to go
Breakfast time
Reached Hotel Zorba

day 6

नमस्कार.
सर्वप्रथम सर्व बालकांना, त्यांच्या बालकांना आणि बालकांच्या बालकांना बाल दिनाच्या आम्हा सर्वांतर्फे खूप खूप शुभेच्छा.

गुजरात राज्यातून राजस्थान मधे प्रवेश करताना वाटेत लक्षणीय बदल आढळून येतात. एक म्हणजे पेहेराव, दुसरं भाषा, तिसरं म्हणजे खाद्य संस्कृती…
आज पण रस्ता अप्रतिम होता. सकाळी ६ ला बाहेर पडून ३० किमी गावातल्या आतल्या रस्त्याने निघालो. गावातून जाणारे रस्ते पण गुळगुळीत होते.
दुतर्फा सरसू चे शेत, मोठ्ठाले गोठे आणि भरपूर गाई म्हशी, स्प्रींकलर आणि ड्रीप इरीगेशनचा वापर दिसून आले.
आतापर्यंत NH27 ने जात असल्याने ३०-४० किलोमीटर्स चहाची टपरी सुद्धा दिसायची नाही. आज मात्र जवळजवळ लागून गावं दिसली त्यामुळे खूप लाईव्हली वाटत होतं शिवाय ट्रॅफिकचा त्रास सुद्धा कमी झाला.
चहासाठी वीस किलोमीटर अंतरावरच्या वाघरोड या गावी थांबलो. ईश्वर भाई देसाईंनी अप्रतिम चहा बनवून दिला.
पुढे 37 किलोमीटर अंतरावरच्या चित्रासनी गावामध्ये आशीर्वाद हॉटेलमध्ये नाश्ता केला. हे हॉटेल NH 27 या हम रस्त्यावर आहे.
येथून पुढे राजस्थानची चाहूल लागू लागली. सर्वात पहिले दर्शन झाले ते आरवली पर्वतरांगांचे. गुजरात बॉर्डर क्रॉस केल्यानंतर सर्वात पहिले एक बार दिसला. जसं जसं अबू रोड गाव जवळ येऊ लागलं तसतसे ग्रॅनाईट आणि मार्बल कटिंग चे मोठमोठे कारखाने नजरेस पडू लागले.
प्रणय गुजरांच्या ओळखीने प्रजापिता ब्रह्मकुमारी आश्रमाला भेट देण्याचा योग आला. हा आश्रम हमरस्त्यापासून आठ किलोमीटर आत आहे. आश्रमात प्रवेश करताना प्रवेशद्वारावरच आमचे जंगी स्वागत करण्यात आले. आश्रमाच्या प्रमुख दीदी आणि इतर वरिष्ठ मान्यवरांनी आम्हाला लाडू देऊन आमचे तोंड गोड केले शिवाय एक पुस्तक आणि एक रिबीन भेट दिली.
प्रवेशद्वारावरच ध्वनीवर्धकाचा उपयोग करून त्यांनी आम्हाला आश्रमाची माहिती दिली. त्यानंतर आमचे दुपारचे भोजन त्यांच्या आश्रमातच झाले. तिथल्या सेवकांनी अतिशय आग्रहपूर्वक जेवू घातले.
जेवण झाल्यानंतर तिथल्या एका मराठी सेवकाने आम्हाला संपूर्ण परिसरात ची फेरी घडवली आणि निरनिराळे विभाग दाखवले.
सर्वात उल्लेखनीय म्हणजे तिथला सोलर एनर्जीचा भव्य प्रकल्प. हा प्रकल्प जागतिक दर्जाचा म्हणता येऊ शकेल. त्याबद्दल एक माहितीपट आम्हाला त्यांनी दाखवला. आश्रम परिसरात फोटोग्राफी करण्यासाठी खूप काही होतं. हजारो एकर मध्ये पसरलेल्या आश्रमाचा परिसर अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी आहे त्याच्या एका बाजूला अरवली पर्वत तर दुसऱ्या बाजूला बनास नदी आहे. या परिसरात आम्ही आमच्या फोटोग्राफीची हौस भागवून घेतली.

दुपारी चारच्या सुमारास पुन्हा एकदा दोन गटांमध्ये विभागणी करून मी, संजय कट्टी, प्रदीप भवाळकर आणि मोनीष चक्रवर्ती सायकलने मुक्कामाच्या ठिकाणी रवाना झालो.
आजचा आमचा दिवस, प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या आश्रमाला भेट दिल्यामुळे विशेष स्मरणात राहील. त्याबद्दल प्रणय गुजरांचे मनापासून धन्यवाद.
उद्या आम्ही उदयपूर कडे प्रस्थान करू आणि त्याच सोबत आमचा उत्साह वाढवण्यासाठी आमच्या सोबत कोटेश्वर पासून आलेल्या सात जणांना निरोप देऊ.

@देवदत्त टेंभेकर

क्रमशः

Tea break
Captain doing research on Food joint

Day 7

West to East cycling expedition day 7
Pindwara to Udaipur (106 किमी)

नमस्कार

आज सकाळपासून खूप जास्त एक्साईटमेंट होती. आज या मोहिमेचा पहिला टप्पा पिंडवारा ते उदयपूर हा पूर्ण होणार होता. आम्हाला उदयपूर पर्यंत सोबत देणारी यंग सीनियरची आमची टीम ही आज आमच्या सोबत या मोहिमेतली त्यांची शेवटची राईड करणार होते.
सकाळी एक सायकल पंचर झाल्यामुळे निघायला थोडा उशीरच झाला.
पिंडवारा ते उदयपूर हा रस्ता अरवली पर्वतरांगांच्या मधून जात असल्यामुळे घाटांचा रस्ता म्हणता येईल रस्ता खूपच सुंदर आहे परंतु या झोनमध्ये प्रचंड चढाव आणि हेडविंड चा सामना करावा लागला.
माउंट अबू पेक्षाही गंगुडा हे गाव जास्त उंचीवर आहे अशी माहिती आम्हाला कळली त्यामुळे पहिले तीस किलोमीटर हे अतिशय आव्हानात्मक होते. सायकल ला अजिबात स्पीड मिळत नव्हती. पेडल मारायचं थांबवलं तर सायकल जागच्या जागी उभी राहत होती.
लोहारच्या गावामधे आशापुरी धाब्यावर आम्ही नाश्ता करायला थांबलो. एक राजस्थानी कुटुंब हा धाबा चालवतात. नाश्ता झाल्यानंतर त्या कुटुंबासमवेत एक फोटोसेशन आम्ही केले.
या रस्त्याच्या दुतर्फा लहान लहान मुलं आणि मुली सीताफळ विकण्यासाठी बसले होते. शाळेत जाणारी मुलं मुली थांबून अभिवादन करत होती. इथल्या मुलांना “टाटा” शब्द माहीत असल्याचं बघून आश्चर्य वाटलं.
गंगुडा गाव ओलांडल्यानंतर तीव्र उतार सुरू झाला. म्हणजे आपल्या चांदणी चौकातून पौड रोड कडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे तसा. आणि तो जवळ जवळ 22 किलोमीटर पर्यंत होता. (म्हणजे कोथरूड ते वाघोली इतकं अंतर)
रस्त्यांवर माईल स्टोन वर उदयपूर ऐवजी अलाहाबाद 900 समथिंग किलोमीटर अशी माहिती होती. या गोष्टीचा प्रचंड राग आला. रस्ता चांगला असून सुद्धा उदयपूरला मुक्कामाच्या जागेवर पोहोचण्यासाठी दुपारचे साडेचार वाजलेत.
आता संध्याकाळी पहिला टप्पा पूर्ण झाल्याच्या आनंदा प्रित्यर्थ सेलिब्रेशन करण्यात येईल.
मधल्या काळात प्रदीप भवाळकरांच्या ओळखीतून एक सायकल मेकॅनिक आला आणि आमच्या चौघांच्या सायकलचा ट्युनिंग करून गेला…
उद्यापासून रोजच्या वेळेवर आमच्या चौघांचा अरुणाचल प्रदेशच्या दिशेने प्रवास सुरू होईल आणि हा या मोहिमेचा सर्वात मोठा असा दुसरा टप्पा राहील.
आशा करतो की हा दुसरा टप्पा ही आम्ही यशस्वीपणे पार करू.
क्रमशः
@देवदत्त टेंभेकर

Day 8

East to West cycling expedition day 8 (१११ किमी)
6:30 start time

आज पासून आमच्या स्वतंत्र प्रवासाला सुरुवात झाली. सकाळी साडेपाच वाजता आम्ही चौघेही जण हॉटेलच्या लॉबीमध्ये येऊन सायकल आणि त्याच्या ॲक्सेसरीज ची जुळवाजुळव करू लागलो. बघता बघता प्रणय गुजर, कॅप्टन अविनाश मेढेकर, पद्माकर आगाशे इत्यादी सर्व मंडळी आम्हाला सी ऑफ करण्यासाठी खाली जमा झाले. खरंतर आज त्यांचा परतीचा प्रवास असल्याने थोडं उशिरा उठले असते तरीही चाललं असतं.
त्या प्रत्येकाने आम्हाला एक जादूची झप्पी आणि शुभेच्छा दिल्या तो प्रसंग अतिशय हृदयस्पर्शी होता . सर्वांनी जवळच्याच चहा टपरीवर एकत्र चहा घेतला आणि त्यानंतर आम्ही चौघांनी चितोडगड च्या दिशेने कूच केले. निघायला थोडा उशीरच झाला.
आज सुद्धा अत्यंत गुळगुळीत रस्त्याचा लाभ आम्हाला घेता आला. विशेष चढाव तर नव्हते परंतु एक वेगळेच वैशिष्ट्य आजच्या प्रवासादरम्यान जाणवले.
NH48 वर खूप जवळ जवळ गाव आणि वस्ती आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला आहे त्यामुळे गावातून येणारा ट्रॅफिक हायवे वरती येऊ नये म्हणून प्रत्येक गावाच्या जवळ फ्लाय ओव्हर बांधलेले आहेत. त्यामुळे एखाद दोन किलोमीटर झाले की लगेच फ्लाय ओवर लागायचा . म्हणूनच रस्ता गुळगुळीत असूनही अपेक्षित स्पीड आम्हाला गाठता आली नाही.
आत्तापर्यंत आमचा 11 जणांचा ग्रुप होता आणि त्यांच्याबरोबर सपोर्ट व्हॅन असल्यामुळे आम्ही आमचे सामान त्यामध्ये ठेवत होतो. (त्याला अपवाद फक्त पहिल्या दिवसाचा) पण आज मात्र सर्व सामान आमचं आम्हालाच घेऊन जायचं असल्याने हा एक वेगळाच अनुभव होता. पॅरियर लावून लॉंग डिस्टन्स सायकलिंग करण्याचा हा माझा आणि भवाळकरांचा पहिलाच अनुभव होता. आमच्या चौघांचा अंडरस्टँडिंग खूप छान असल्याने प्रवासादरम्यान कुठलीच अडचण आली नाही. असो.
आज आम्ही चौघेच असल्यामुळे नंबर ऑफ स्टॉपेजेस खूप कमी झालेत. पहिला स्टॉप अर्थातच नाश्त्यासाठी भटेवर गावातल्या हॉटेल वासुदेव मध्ये अप्रतिम नाश्ता मिळाला. (आलू पराठा, दही) (३७ किमी)
वाटेतल्या गावांची गमतीशीर नाव वाचताना खूप हसायला येत होतं. उदाहरणार्थ छपरी, नंगावली, भादसोडा इत्यादी.
आमचा सायकल चालवण्याचा एक पॅटर्न आज ठरला म्हणजे मुद्दामून नाही ठरवला परंतु तो तसाच तयार झाला. आमचे इंजिन म्हणजे मोनीश आणि मी होतो गार्ड आणि आमची चार डब्यांची एक्स्प्रेस गाडी अशीच पुढे कुठेही न थांबता सलग दोन तास सुरू होती. 71 किलोमीटर वरील मंगलवाड गावातील बालाजी धाब्यावर ताक घेण्यासाठी आणि थोडी विश्रांती घेण्यासाठी आम्ही थोडावेळ थांबलो.
लंच साठी पुढच्या दोन तासांनी थांबायचं सगळ्यांनी ठरवलं. साधारण 85 किलोमीटर आल्यानंतर मला आणि भावाळकरांना भूक लागल्यामुळे आमची चुळबुळ सुरू झाली. वाटेत एक गमतीशीर हॉटेल दिसलं त्याच्या बोर्डवर लिहिलं होतं “चूक न जाना आर के का खाना”. परंतु आम्ही इथे न थांबता अजून पुढे गेलो याचा कारण सुद्धा योग्यच होतं जेवण झाल्यानंतर मुक्कामावर पोहोचण्यासाठी कमीत कमी सायकलिंग करायला लागावे या उद्देशाने आम्ही पुढे जात राहिलो आणि शेवटी 90 किलोमीटर अंतरावर आमचा शोध थांबला (विजयालक्ष्मी रेस्टॉरंट , बानसेन ).
जसजसं चितोडगड जवळ येऊ लागलं तस तसा आमचा वेग वाढू लागला आणि अचानक आजूबाजूचा परिसर खूप छान दिसायला लागला. वाटेत बेडस नदी ओलांडल्यानंतर घोसुंडा धरणाचं बॅक वॉटर आणि त्याच्या परिसरातील हिरवीगार सरसूची शेती बघतांना सगळा थकवा दूर झाला.
मुक्कामाची जागा जशी जवळ यायला लागली तशी कॅप्टन मेढेकरांची आठवण झाली. आज त्यांचा रोल संजय कट्टींनी निभावला. गुगल मॅप लावून मुक्कामाच्या जागेपर्यंत सर्व सदस्यांना घेऊन जाण्याची जबाबदारी ही कॅप्टन मेढेकर सांभाळत होते. आता त्यांच्या अपरोक्ष संजय कट्टींनी ती जबाबदारी आपल्यावर घेतली आहे.
कॅप्टन मेढेकरांची दुसरी जबाबदारी होती ती म्हणजे चहा नाश्ता आणि जेवणाच्या जागा शोधून काढायच्या. आता मोनीशनी ती जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आहे.
दुसऱ्या टप्प्यातला पहिला दिवस अशा तऱ्हेने यशस्वीपणे पार पडला आणि आम्ही नियोजित मुक्कामावर अगदी वेळेत पोहोचलो.
@देवदत्त टेंभेकर

क्रमशः

Breakfast break
Clicked while leaving

Day 9

East to West cycling expedition
Day 9
Chittorgarh to Dabi (१२९ किमी)

एकूणात नववा आणि आमच्या चौघांच्या टीमचा दुसऱ्या टप्प्यातला दुसरा दिवस.
नेहमीप्रमाणे पहाटे साडेपाच वाजता तयार होऊन चितोडगड रेल्वे स्टेशन समोर चहा पिऊन पावणेसहा वाजता आम्ही डाबी या गावाकडे प्रस्थान केले. आज तुलनेने जास्त अंतर कापायचे असल्याने लवकरात लवकर निघण्याचा आमचा प्रयत्न होता.
पंचवीस किलोमीटरवर चहा, पन्नास किलोमीटरवर नाश्ता आणि शंभर किलो मीटरवर लंच करण्यासाठी थांबायचे ठरले होते.
आज आमच्या गाडीचे इंजिन एकदम बुंगाट सुटलं होतं. त्यामुळे गाडीचे डबे आपोआपच इंजिनाच्या मागे सुसाट वेगाने निघाले.
ठरल्याप्रमाणे 25 किलोमीटरवर चहा घेतला आणि पन्नास किलोमीटर वरती नाश्त्यासाठी थांबलो. नाश्त्यामध्ये आलू पराठा आणि दही घेतलं. पराठा बनवायला जास्त वेळ लागल्यामुळे आमची तेवढीच विश्रांती झाली.
आजचा रस्ता गुळगुळीत असला तरी वेगळाच होता. प्रत्येक चार ते पाच किलोमीटर अंतर सरळ गेल्यानंतर तेवढ्याच अंतराचा चढाव लागायचा. पुण्यातल्या नवले ब्रिज पासून कात्रज च्या नवीन टनेल कडे जाताना असतो तसा. त्यामुळे आमच्या सर्वांचाच कस निघत होता परंतु उत्साह मात्र तसूभरही कमी झाला नाही.
गंमत म्हणजे कट्टी म्हणायचे की जरा भवाळकरांकडे लक्ष द्या आणि भावाळकर म्हणायचे जरा कटिंग कडे लक्ष द्या आणि आम्ही दोघांकडेही लक्ष द्यायचो नाही.😁
कारण प्रत्येक जण व्यवस्थित नियोजन करूनच राईड करत होते.

NH24 हा चांगल्या स्थितीतला रस्ता म्हणून ओळखला जातो. कमीत कमी फोर लेन चा रस्ता (काही ठिकाणी ६ लेन) शिवाय बाजूला टू व्हीलर साठी एक वेगळी लेन आणि अत्यंत चांगला सरफेस. आता इतका चांगला रस्ता बघून त्या रस्त्यावर गाई म्हशींना बसायला का आवडणार नाही?

सरकारच्या रस्ते बांधणी धोरणाचा परिपाक म्हणून काही चांगल्या गोष्टी निदर्शनाला आल्या. पहिली गोष्ट म्हणजे अतिशय लहान गावं जोडले गेले आणि गावांतून रस्ता जात असल्याने त्यांच्या गावात रोजगाराच्या मुबलक संधी निर्माण झाल्यात. रस्त्यांवरून जाताना पारंपारिक वेशातल्या महिला आणि पुरुष हे दर्शवत होते की या आदिवासी लोकांनी आपली संस्कृती अजूनही जपलेली आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रॅक्टर, ट्रक मधुन राजस्थानी लोक संगीत ऐकायला येतं.
आज एक बदल जाणवला. या भागात शिक्षणाचा प्रसार जास्त झाल्यामुळे किंवा कशामुळे तरी रस्त्यावर भेटणारी मुलं मुली “टाटा” च्या ऐवजी “बाय” म्हणत होती.

महाराष्ट्रामध्ये रस्ते बांधणी कमी होत असल्याचे कारण, सरकारला जागा संपादित करण्यासाठी लागणारा विलंब!! गुजरात आणि राजस्थान मध्ये असे दिसून आले की हमरस्त्याच्या दोन्हीही बाजूला शेतजमीन असूनही रस्ता त्या जागेतून गेला आहे. राजकारणामुळे महाराष्ट्राचे किती नुकसान होत आहे हे बघताना वाईट वाटले. आज सुद्धा सरसूची शेतं आणि चेंज म्हणजे काही ठिकाणी कपाशीची लागवड पण दिसून आली.
आमच्या टीम मधल्या मोनीष कडे अत्यंत चांगले संभाषण कौशल्य आहे. रस्त्यावरून जाताना दिसणारी मुलं, माणसं, ट्रॅक्टर वाले या सर्वांशी त्याचा संवाद सुरू असतो.
आज तर गंमतच आली. मोटरसायकल वरून जाणाऱ्या एका माणसाबरोबर मोनीष गप्पा मारत होता. त्यांच्या मागे मी होतो. माझ्याकडे बघून त्यांनी मोनीषला विचारलं “आपका लडका भी आपके साथ आ रहा है क्या?” त्यावर मोनीष म्हणाला “भाईसाहब मेरा लडका नही वो मेरे पापा है पापा”😁
अशा गमतीजमती सुरू असतात..

जेवणासाठी १०६ किलोमीटर वरील बिजोलिया गावात प्रसिद्ध मोदी धाब्यावर थांबलो. इथली कढी कचोरी आणि समोसा जगात भारी आहे. दही तर त्रिखंडात भारी.

आज आम्हाला राजस्थानच्या सुप्रसिद्ध दगडांच्या खाणी बघायला मिळाल्या. भारतात आणि परदेशात इथल्या स्टोन्सला प्रचंड मागणी आहे.
संध्याकाळी ५ वाजता दाबी गावातल्या हॉटेल निखुंज palace ला सुखरूप पोहोचलो.
हॉटेल समोरच ह्युंदाई अर्थ मुव्हिंग डिव्हिजनचा एक इव्हेंट सुरू होता. तिथे पुण्याचे बाणेरवासी श्रेयस जोशी भेटले आणि पृथ्वी गोल असल्याचा प्रत्यय आला.

@देवदत्त टेंभेकर

क्रमशः

Day 10

West to East cycling expedition day 10
Dabi to Baran

नव्या चे ९ दिवस सरून १०वा दिवस सुरू झाला आणि आमची पहिली परीक्षा सुरू झाली. सकाळी हॉटेलमधून सायकल घ्यायला खाली आलो तर एक सायकल पंचर दिसली.मग काय करणार? पंचर दुरुस्त करण्याव्यतिरिक्त पर्यायच नव्हता.
या प्रोसेस मध्ये एक तास कसा गेला ते कळले नाही त्यामुळे आमच्या पुढच्या प्रवासाला निघण्यासाठी उशीर झाला.
संजय कट्टींना माहिती मिळाली होती की या भागात जवळच गुराडिया महादेव मंदिर म्हणून एक प्रसिद्ध जागा आहे. हायवे पासून चार-पाच किलोमीटर आत आहे परंतु अगदी बघायलाच हवी अशी ही जागा आहे असं कळल्यामुळे आम्ही तिथे जायचं ठरवलं. आणि खरोखरच तिथे गेल्यानंतर wow!!! अशी आरोळी आमच्या चौघांच्याही तोंडातून निघालली. ही जागा पुण्याजवळील भोर नेकलेस सारखी आहे परंतु या जागेचं वैशिष्ट्य म्हणजे चंबळ नदी इथे चक्क यु टर्न घेते !! चंबळ नदी बद्दल अजून एक गोष्ट कळली ती अशी, की कदाचित ती एकमेव नदी आहे जी दक्षिणेत उगम पावते आणि उत्तरेकडे यमुना नदीला जाऊन मिळते.
हायवे पासून आत जाण्याचा रस्ता खूपच खडबडीत आहे परंतु ही जागा बघण्यासाठी तेवढे कष्ट घ्यायलाच हवेत, नाही का?
आज आमची गाडी बरीच लेट झाली होती परंतु त्यातही खूप गमतीजमती घडल्या पुढे कोटा शहराकडे जाताना वाटेमध्ये चंबळ नदीवरचा अत्यंत प्रेक्षणीय असा हँगिंग ब्रिज लागला. सेंट फ्रान्सिस को मधल्या गोल्डन गेट ब्रिज ची आठवण व्हावी इतका प्रेक्षणीय हा ब्रिज आहे.
ब्रिज ओलांडल्यानंतर एक पीयूसी चेक करणारी गाडी बघितल्यावर मनामध्ये विचार आला जर सर्व लोकांनी सायकल चालवायचं ठरवलं तर या व्यक्तीची उपजीविका कशी चालणार?
अजून एक गंमत म्हणजे आज पहिल्यांदा सिलचर २५०८ किमी असा माइल स्टोन बघितला आणि खूप भारी वाटलं याच रस्त्यावरून अजून २५०८ किलोमीटर आम्ही जाणार आहोत.
आज लंच ऐवजी आम्ही ब्रँच घेतला कोटा शहराच्या बाहेर एका धाब्यावरती मस्त अंडा करी आणि गरमागरम रोट्या जेवणामध्ये होत्या.
पुढे जाऊन ताथेडला एका रेस्टॉरंट मध्ये थोडी विश्रांती घेतली. तिथे आम्हाला पुण्याचेच विल्यम डिसोजा नावाचे गृहस्थ भेटले. पृथ्वी गोल आहे याचा आज पुन्हा प्रत्यय आला.
काली सिंधू नदी ओलांडा जिल्ह्याची हद्द संपून बारं जिल्हा सुरू झाला. त्या नदीच्या ब्रिजवरच दुसरी सायकल पंचर झाली. मग काय? सकाळचा अनुभव गाठीशी असल्याने केवळ पंधरा मिनिटांमध्ये आम्ही पंचर दुरुस्त केला आणि पुढे मार्गस्थ झालो.
आमच्या मुक्कामाच्या जागेवर पोहोचताना संध्याकाळचे सात वाजून गेलेत.
आज विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे आम्ही सर्वांनी एक हजार किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला आणि उद्या या मोहिमेतल्या सर्वात लांब पल्ल्याच्या सायकलिंग साठी सज्ज होत आहोत.

@देवदत्त टेंभेकर
क्रमशः

Day 11

West to East cycling expedition day 11
Baran (Rajasthan)to Shivpuri (MP)

And, we have done it in style!!!
या मोहिमेतील सर्वात लांब अंतराची राईड आमच्या टीमने यशस्वीपणे पूर्ण केली.(१५४ किमी)

नेहमीप्रमाणे सकाळी वेळेत निघालो.
१५ किमी अंतरावर मोनीषला Baran Cyclists Association चे अध्यक्ष भेटले. त्यांनी आग्रहाने चहा पिऊ घातला. त्यांच्या ग्रूपसोबत फोटोसेशन झाले.
४५ किलोमीटरवर भंवरगड गांवात हायवे पासून आंत जाऊन एका टपरीवर पोहे, जिलबी, समोसा खाल्ला.
रस्ता चांगला असूनही स्पीड मिळत नव्हती. सायकल चालवणं कंटाळवाणे वाटू लागले. कदाचित आजच्या अतिरिक्त अंतरामुळे असेल.
शहाबाद येथे जाताना उतरणारा घाट लागला. आजूबाजूची हिरवाई बघून थकवा निघून गेला. घाट उतरल्या उतरल्या एक अप्रतिम खाण्याची जागा लागली. तिथेच लंच घेतला. एव्हाना दुपारचे अडीच वाजले.
थोडी विश्रांती घेऊन मजल दर मजल करत रात्री साडेआठ वाजता शिवपुरी गावातल्या Krishna Palace ला सुखरूप पोहोचलो.
नाईट राईड ची सवय पण कामाला आली.
आज १५४ किमी राईड with pannier is highest for me.

आज आम्ही मध्यप्रदेश राज्यात प्रवेश केला.
इकडे थोडा ढिल्ला कारभार आहे.

हवेतला गारवा वाढला आहे. उद्यापासून हुडी वापरावी लागेल.

आजच्या रस्त्यावर बर्याच नद्या दिसल्या. परंतू इकडे कुठेच नद्यांची नांवे लिहिण्याची पद्धत नसावी. (पुणेरी पाट्यांना नांव ठेवणार्यांना हे कळणार नाही)
तीनही राज्यात हमरस्त्यालगतच्या गांवात परंपरा जपणारे लोक आढळले. राजस्थानात स्रियांचा चणिया चोरी घागरा आणि पुरुषांच्या झुपकेदार मिशा, राजस्थानी मुंडासे आणि कानांत भिकबाळी ठळकपणे दिसून आली.
राजस्थानच्या सीमावर्ती भागात स्रिया पारंपरिक वेषातून साड्यांमध्ये आणि पुरुष pant shirt मधे दिसू लागलेत.
शेतांमध्ये राजस्थानच्या हद्दीत सरसू सर्वच भागात दिसलं. पूर्वेकडील भागात त्याच्या जोडीला धानाची लागवड दिसून येते.
मिशांवरून आठवलं… शराबी सिनेमातला नथूलाल आठवतो का? काल मोनीष आणि नथूलाल मुळे आम्हाला छान Hotel मिळालं. आधी मालकानी नकार दिला. परंतू नथूलालनी मालकाला पटवले आणि आम्हाला रूम द्यायला भाग पाडलं. नथूलाल हा ex serviceman. तो त्याठिकाणी नोकरी करतो. आमची स्टोरी ऐकून त्याचं ह्रुदय द्रवलं आणि पुढील गोष्टी घडल्या.
त्याची मिशी आणि नांव शराबीतल्या नथूलाल सारखं…
आम्ही सर्वजण एकदम मजेत आहोत. दिवसागणिक सायकलिंग चा stamina वाढतच चालला आहे. तो असाच व्रुद्धिंगत होवो अशी प्रार्थना…
उद्या झांसी कडे प्रयाण करणार. कमी अंतराची (१०५ किमी) राईड असल्याने थोडे रिलॅक्स आहोत…

@देवदत्त टेंभेकर
क्रमशः

Day 12

West to East cycling expedition day 12
Shivpuri to Zhansi

आज आमचा झाशीला जायचा प्लॅन होता. म्हणजे आम्ही मध्य प्रदेश मध्ये एकच दिवस राहिलो आणि आता उत्तर प्रदेश कडे निघालो होतो. झाशीबद्दल तर खूपच ऐकून आहे . पुण्यातल्या बालगंधर्व चौकातील झाशीच्या राणीचा आणि नागपूरच्या झाशी राणी चौकातला पुतळा बघितल्यावर वाटायचं की आपल्याला कधीतरी प्रत्यक्ष झाशीच्या राणीच्या झाशी गावात जाण्याचा योग यायला हवा आणि तो आज जुळून आला.

आज सकाळी थोडं उशिरा म्हणजे सकाळी साडेसहा वाजता आणि झाशीकडे प्रस्थान केलं जेमतेम दहा किलोमीटर अंतर गेलो नाही तर डाव्या हाताला माधव नॅशनल फॉरेस्ट अशी पाटी बघितली म्हणून त्याच्या प्रवेशद्वारासमोर फोटो काढण्यासाठी आम्ही चौघे थांबलो. तिथे एक महिला फॉरेस्ट ऑफिसर ने आमची आस्थेने चौकशी केली व आम्हाला विनामूल्य आत फिरून येण्याची मुभा दिली. एरवी त्या भागात जाण्यासाठी माणशी 75 रुपये तिकीट असतं. परंतु त्या ऑफिसरने आम्हाला अर्ध्या तासात जाऊन येण्याच्या बोलीवर आत सोडलं.
आतला परिसर तर केवळ अप्रतिम आहे. एक मोठा जलाशय असल्याने आजूबाजूचा परिसर अतिशय सिनिक आहे. तिथे आम्ही मनसोक्त फोटोग्राफी करून बरोबर अर्ध्या तासात बाहेर पडलो आणि अर्थातच ऑफिसर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानलेत. त्यांनीच आम्हाला सांगितलं की पुढे जाऊन ज्या जागेत अज्ञातवासात असताना पांडवांचे वास्तव्य होते अशा सुरवयागढीला आम्ही अवश्य भेट द्यावी.
हा परिसर नॅशनल फॉरेस्टचा असल्यामुळे दुतर्फा हिरवळ होती. एक प्रचंड उताराचा रस्ता लागला आणि त्यात आमच्या डाव्या बाजूला मोठा जलाशय दिसला चौकशी केल्यानंतर कळले की मडीकेरी धरणाचं बॅक वॉटर आहे.
पुढे गेल्यावर लगेचच सुरवया गुढीची पाटी दिसली.
ही गढी म्हणजे एक किल्लाच आहे आमरस त्यापासून केवळ पाचशे मीटर अंतरावर आत जाऊन आपल्याला ती बघता येते गढीला तटबंदी आणि बुरुज आहे शिवाय तिथे एक भुयार सुद्धा आहे. आंत एक शिवमंदिर आणि एक शाळा आहे. मोनीषनी आत जाऊन तिथे विद्यार्थी दिन बरोबर फोटोसेशन केले. गढीच्या परिसरात फोटोसेशन करून आम्ही पुढे मार्गस्थ झालो. ही जागा भारतीय पुरातत्व संग्रहालयाने संरक्षित म्हणून घोषित केलेली आहे.
आजचा रस्ता पण सुंदरच होता विशेष त्रास झाला नाही त्यामुळे स्पीड बऱ्यापैकी मिळाला.
झाशी गावात पोहोचायला आम्हाला संध्याकाळचे साडेचार वाजले परंतु इथे रस्त्याचं काम सुरू असल्याने आमच्या मुक्कामाच्या जागी पोहोचायला मात्र आम्हाला साडेपाच वाजलेत. पोहोचता क्षणीच मोनीश आणि मी झाशीचा किल्ला बघण्यासाठी चालत गेलो. हा किल्ला आमच्या हॉटेलपासून वॉकिंग डिस्टन्स वर आहे. परंतु दुर्दैवाने आम्ही जात पर्यंत प्रवेशद्वार बंद झाले होते त्यामुळे किल्ल्याच्या आत प्रवेश करता आला नाही. किल्ल्याच्या परिसरात गेल्यानंतर अंगावर शहारे आले. झाशीच्या राणीने बुरुजावरून घोडा फेकला हे दृश्य डोळ्यासमोर तरळून गेले आणि मनोमन नतमस्तक झालो.
आजचा मुक्काम एका अत्यंत चांगल्या अशा हॉटेलमध्ये आहे. संजय कट्टींचे मर्सिडीज बेंझ मधल्या अधिकाऱ्यांच्या ओळखीने या मुक्कामाची सोय झाली आहे.
दिवसभर सायकल चालवल्यानंतर अशा प्रकारे निवासाची सोय होणे म्हणजे अक्षरशः स्वर्गात गेल्यासारखे वाटले. संजय कट्टी आणि त्यांचे सहकारी यांचे शतशः आभार.
झाशीच्या किल्ल्यावरून आल्याबरोबर आमच्या तीन ट्युब पंक्चर झाल्या होत्या त्या इथे समोरच दुरुस्त करून घेतल्या.
आजची आमची सलग नववी सेंचुरी राईड झाली.
अशा रीतीने आजचा आमचा दिवस संस्मरणीय ठरला.
उद्या आम्ही उत्तर प्रदेश मधल्या ओराई या गावात जाणार आहोत.

क्रमशः
@देवदत्त टेंभेकर

day 13

West to East cycling expedition day 13
Zhansi to Orai (118.52 kms)

लोकहो ऐका हो ऐका. आज मी तुम्हाला काही माझे वैयक्तिक अनुभव सांगणारआहे. वैधानिक इशारा : प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार सुचनांचे पालन करावे. धन्यवाद.
तर मंडळी लॉंग डिस्टन्स सायकलिंग करताना आहाराचे अनन्यसाधारण महत्व असते असे मला माझ्या अनुभवावरून कालच कळले. म्हणून तो आपल्याशी शेअर करावासा वाटतो.
अहो मी तर दूध भात भेंडीची भाजी खाणारा सर्वसामान्य माणूस. माझे इतर सहकारी मात्र सामिष आहार घेत असल्याने त्यांची शारीरिक क्षमता निश्चितच श्रेष्ठ आहे याबद्दल शंकाच नाही.
काल रात्री आमचे प्रेस साठी फोटोसेशन झाल्यावर जेवण करण्यासाठी बाहेर पडलो. तर मला पोटात गडबड असल्याचं सेन्सेशन होतं म्हणून मी फक्त अंडा भुर्जी खाल्ली. रूमवर परत जाताना समोरच चाट सेंटर दिसलं आणि मी पाणीपुरी कडे ओढल्या गेलो. (तो माझा वीक पॉइंट आहे)
रात्री पोटात गुडगुड होत होतं. आज सकाळी उठल्यावर पण फ्रेश वाटत नव्हतं.
सकाळी सहा वाजता नेहमीच्या वेळेवर आम्ही उराई गावाकडे प्रस्थान केलं पण माझ्या मनातली मरगळ काही कमी झाली नव्हती. हे असं का झालं असावं याचा विचार करत करत पायडल मारत होतो आणि माझ्या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले पहिली गोष्ट म्हणजे काल वाटेमध्ये आम्ही माझा मॅंगो हे कोल्ड्रिंक प्यायला वरच मला पोटात वेगळं सेन्सेशन आलं होतं आणि भरीत भर रात्री मी पाणीपुरी खाल्ली. आणि या दोन्ही गोष्टींनी माझ्या पूर्ण सिस्टीमची वाट लावली
गेले बारा दिवस कुठलाही त्रास झाला नाही परंतु केवळ चुकीच्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे असे घडले. तर लोकहो यापुढे मी असा नियम केला आहे की राईड करताना नो कोल्ड्रिंक्स नो आणि चमचमी पदार्थ, नो चाट आयटमस. फक्त कार्बोहायड्रेट्स चं सेवन करायचं जसं की आलू पराठा, वरण भात इत्यादी. आता मी एकदम ठीक आहे
यापुढे ही काळजी मी नक्कीच घेईल परंतु तुम्ही पण लाँग राईड करणार असाल तर हे लक्षात असू द्या.
हॉटेल ला आल्यानंतर माझ्या सौभाग्यवतीने माझ्यासोबत दिलेल्या प्रिस्क्रिप्शन आणि औषधांनी मला आराम मिळाला तिच्या या प्रसंगावधानाबद्दल तिचं कौतुक कसं करावं हेच कळत नाही.
असो.
आज आमच्या टीमने ठरवलं होतं की ब्रेकफास्ट 50 किलोमीटर राईड पूर्ण झाल्याशिवाय करायचा नाही आणि लंच 100 किलोमीटर नंतर ,आणि ते करू शकलो याचा खूप आनंद आहे.
झाशी मधून बाहेर पडता पडता न्यूज पेपर घेतला. कट्टींच्या मित्राने हा योग जुळवून आणला.
उत्तर प्रदेश मध्ये शिरल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. गुजरात आणि राजस्थानमध्ये भर दुपारी ऊन असताना सुद्धा निळ्या भोर आकाश दिसत असल्याने प्रसन्न वाटायचं. परंतु उत्तर प्रदेश मध्ये आल्यावर अतिशय हेजी ऍटमॉस्फियर असल्याने आकाशाचा रंग ग्रे दिसतो.
दुसरी गोष्ट म्हणजे गुजरात आणि राजस्थानमध्ये टिपिकल फ्लेक्स बोर्ड कुठेही दिसले नाही. (एकच फाइट वातावरण टाइट या टाईपचे). परंतु उत्तर प्रदेश मध्ये आज ज्या शहरात आम्ही आलो आहोत तिथे आपल्या भागात असतात तसे फ्लेक्स बोर्ड सर्वत्र दिसून आले.

संध्याकाळी साडेचार वाजता आम्ही
उराई शहरात प्रवेश केला. इथलं हॉटेलही खूप छान आहे , अगदी राजप्रसादासारखे. आणि आम्ही सायकल यात्री आहे असं कळल्यावर त्यांनी रेट पण अगदी वाजवी लावला.

आज अजून एक आनंदाची गोष्ट घडली ती अशी की यापूर्वी माझी लोंगेस्ट राईड पुणे ते कन्याकुमारी ही 1442 किलोमीटरची झाली होती. आज तो माझा वैयक्तिक विक्रम मोडल्या गेला आजपर्यंत 1462 किलोमीटर अंतर कापून झालेले आहे!!

उद्या सकाळी आम्ही कानपूर कडे प्रस्थान करणार आहोत.

क्रमशः

@देवदत्त टेंभेकर

१४६१.७६ किमी

Day 14

West to East cycling expedition day 14 (113.08 kms)
Cumulative 1574.84kms

आमच्या राजप्रसादाच्या मॅनेजर सोबत फोटोसेशन करून पहाटे पावणे सहा वाजता आम्ही कानपूर कडे प्रस्थान केले. जवळच्या चौकात चहाच्या टपरीवर चहा घेऊन पुढे निघालो.
हवेत चांगलाच गारवा असल्यामुळे सर्वांनी जॅकेट घालूनच साईडला सुरुवात केली होती.
साधारण 31 किलोमीटर अंतर झाल्यानंतर संजय कट्टी एका ठिकाणी अचानक थांबले म्हणून आम्ही थांबलो बघितलं तर काय डाव्या बाजूला एक अतिशय देखणा असा चौरासी गुंबद दिसला. अतिशय पुरातन आणि देखणी अशी ही जागा आहे. हम रस्त्याला लागून असल्यामुळे आम्हाला तिथे जायला कुठलीच अडचण आली नाही.
सर्व बाजूंनी तटबंदी आणि आत मध्ये अतिशय सुंदर नक्षी काम केलेले पिलर आणि घुमट बघून मन प्रसन्न झाले या परिसरात मनसोक्त फोटोग्राफी करून आम्ही पुढे प्रस्थान केले.
बरोबर बारा वाजता आम्ही माती खाल्ली. सॉरी माती खाल्ली म्हणजे माती नावाच्या गावात आम्ही प्रवेश केला.😁
कानपूर हे खूप मोठे शहर आहे जसे जसे आम्ही कानपूर शहराच्या जवळ जात होतो तशी तशी रस्त्यावरची वर्दळ आणि गर्दी वाढू लागली. चार लेन चा NH27 सहा लेनचा झाला!! काही काही ठिकाणी रस्त्याच्या उलट्या बाजूने जाणाऱ्यांची संख्या इतकी जास्त होती की आपल्याला वाटतं की आपणच चुकीच्या रस्त्यावर आहोत की काय. गुजरात आणि राजस्थान मध्ये उलट दिशेने येणाऱ्या वाहनांची संख्या ही अत्यल्प होती आणि तिथे सूचनाफलक सुद्धा लावले होते. (Caution!! Wrong side traffic) या भागात तर विचारायलाच नको.
उरळी सोडल्यानंतर रस्त्यावरती लागून लागून गाव होती आणि प्रत्येक गावामध्ये बकालपणा हा अत्यंत दर्जाचा होता.
उत्तर प्रदेश राज्याची पॉप्युलेशन डेन्सिटी ही सर्वात जास्त आहे याचा वारंवार प्रत्येक येत होता.
34 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर यमुना नदीचे दर्शन झाले आणि मन प्रसन्न झाले.
थोडं पुढे गेल्यानंतर चौरा नावाचं गाव लागलं. आणि या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे बकऱ्यांचा बाजार असतो. जसा आपल्याकडे आपण बैल बाजार बघतो किंवा काही ठिकाणी गाढवांचा बाजार असतो तसा या गावामध्ये बकऱ्या विकणारे आणि विकत घेणारे यांचा एक मोठा बाजार आम्हाला दिसला. तिथलं दृश्य बघून मात्र माझं मन द्रवलं काही काही बकरीची छोटी पिल्ल त्यांना अक्षरशः फरपटत घेऊन जाताना बघितलं आणि काळजात चर्र झालं. त्यांचा आक्रोश तर हृदय पिळवटून टाकणारा होता अर्थात मी नॉनव्हेज खात नसल्यामुळे असेल परंतु मला अशा प्रकारची हिंसा अजिबात आवडत नाही.
या भागातली फ्लेक्स संस्कृती ही दक्षिण भारत आणि आपल्या भागातल्या सारखीच दिसली.
कानपूरच्या हद्दीपासून रस्त्यांवर लोहियाच्या बॅटरी ऑपरेटेड इलेक्ट्रिक रिक्षा दिसू लागल्या. या भागात केमिकल इंडस्ट्रीज खूप जास्त असल्याने त्या केमिकलचा दर्प ठीक ठिकाणी जाणवत होता.
कानपूर शहराचा विस्तार प्रचंड मोठा आहे शहराच्या हद्दीत प्रवेश केल्यापासून तर मुक्कामाच्या जागी जाईपर्यंत आम्हाला तब्बल एक तास लागला आणि सरते शेवटी साडेचार वाजता आम्ही आमच्या मुक्कामाच्या जागी सुखरूप पोहोचलो. आमचे यंग सीनियर चे सहकारी सुनील भावे यांच्या ओळखीतनं आमची मुक्कामाची व्यवस्था उत्तम झाली. या हॉटेल जवळच सायकलचं प्रचंड मोठं मार्केट आहे. तिथे जाऊन मी माझा खराब झालेला स्टॅन्ड रिप्लेस करून घेतला. उद्या आम्ही उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ कडे कूच करणार आहोत. आता आराम करण्याची वेळ झाली. इथेच थांबतो.

क्रमशः

@देवदत्त टेंभेकर

Day 15

West to East cycling expedition day 15
Kanpur (Hotel Mahadev Regency to) Lucknow (101.51kms)
Cumulative 1676.35 kms.

आजचा दिवस आमच्यासाठी फार विशेष असा दिवस आहे. कानपूर वरून प्रस्थान करून आमचा मोर्चा आता आम्ही लखनौ च्या वळवला आहे. माझ्यासाठी सर्वात एक्सायटिंग गोष्ट म्हणजे आज मला माझ्या आयुष्यात पवित्र गंगा नदीचे दर्शन पहिल्यांदा घडले. सकाळी वेळेत तर निघालो पण आज पुन्हा एक छोटी समस्या उद्भवली. सायकल चेक करताना माझ्या सायकलचा एक स्पोक तुटला असं निदर्शनाला आलं. त्याला तात्पुरती सेलोटेप लावून आम्ही मार्गस्थ झालो.
नुकताच सूर्योदय झाला आणि गंगा मातेचं दर्शन झालं. गंगा नदीत सूर्यबिंबाचे प्रतिबिंब बघताना देहभान हरपलं.
आता थोडं कानपूर शहराबद्दल. या शहरात इतकी लोक राहतात की क्षणभर वाटलं कदाचित अख्ख्या भारताची अख्खी लोकसंख्या या एकाच शहरात आहे!!
रस्त्यावरून सायकल चालवणं सोडा चालत जायला सुद्धा प्रचंड त्रास होत होता.
जुन्या गावामध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. पानाची पिंक रस्त्यावर थुंकून रस्त्यावर लाल रंगाचे abstract डिझाईन दिसून येतं. त्यामुळे काही ठिकाणी खूपच किळसवाणं वाटत होतं.
इथला कॅन्टोन्मेंट एरिया मात्र खूपच भारी आहे. इंडियन आर्मी चे आयुध निर्मिती कारखाने या शहरात आहेत. त्याचप्रमाणे गंगा नदीवरचा वरचा ब्रिज सुद्धा लाजवाब आहे. गंगा मातेचे विशाल पात्र बघून उचंबळून येतं.
इतके दिवस आम्ही रस्त्यांवरच्या धाब्यांवर जेवत असताना दुपारी जेवणामध्ये फक्त भात,वरण आणि दही असा आहार घेत होतो. सकाळचा नाश्ता मात्र चांगलाच हेवी राहायचा. आलू पराठा आणि दही. इथे सर्वत्र दिल्ली राईस चा भातच मिळतो. तेव्हा मनात प्रश्न आला की पुण्यात पण दिल्ली राईस आणि या भागात पण दिल्ली राईस?? मग या भागात आपल्याकडचा इंद्रायणी किंवा आंबेमोहोर तांदूळ का मिळू नये?
आपण लोक कुठे कमी पडतो?
अमेरिकेत असताना दक्षिण भारतीय लोकांसाठी स्पेशल बॉईल्ड राईस सुद्धा इंडियन स्टोअर मध्ये मिळतो. परंतु महाराष्ट्रात पिकणारा आंबेमोहर किंवा इंद्रायणी तांदूळ मात्र आम्हाला सहजासहजी कुठेही दिसला नाही. या गोष्टीचा खरंच वाईट वाटलं.

लखनौच्या थोडं अलीकडे एक सायकल रिपेरिंग दुकान दिसलं तिथे माझ्या सायकलचा स्पोक रिपेअर करून घेतला.

संध्याकाळी तीन साडेतीनच्या सुमाराला आम्ही लखनौ शहरात प्रवेश केला. हे शहर सुद्धा प्रचंड मोठे आहे. या शहरात वाहतुकीचे नियम पाळण्यास बंदी आहे. शहरात प्रवेश केल्यानंतर सात ते आठ किलोमीटर अंतर जाण्यासाठी आम्हाला तब्बल दीड तास लागला. विधान भवन राज भवन परिसर आल्यानंतर मात्र अत्यंत सुंदर रस्ता आणि राजधानीच्या शहराला शोभेल अशा वास्तू दिसू लागल्या.
गोमती नदीच्या ब्रीजवर फोटोसेशन करण्याचा आनंद काही औरच होता.
उद्या आमच्या टीमचा रेस्ट डे. सलग पंधरा दिवस सायकलिंग झाले. नॉन स्टॉप सलग पंधरा दिवसात 1680 किलोमीटर सायकलिंग झालं.
उद्या रेस्ट डे आहे तर आम्ही खूप मजा करणार!!
क्रमशः

@देवदत्त टेंभेकर

Day 16

West to East cycling expedition day 16

आज आमचा रेस्ट डे आहे. लखनौ पासून जवळच असलेल्या चिनाहट या भागामध्ये आमची मुक्कामाची व्यवस्था झाली आहे.
हे एक सर्विस अपार्टमेंट आहे. प्रशस्त खोल्या आणि खाण्यापिण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था अशी खूप छान सोय झाली आहे.
काल रात्री चेक इन झाल्यानंतर आंघोळ केली आणि साठवलेले सर्व कपडे धुतले. इथे कपडे वाळत घालण्यासाठी खूप छान सोय आहे.

आज सकाळी मस्त आरामात झोपून उठलो. पहिल्यांदा नाश्त्यामध्ये ब्रेड ऑम्लेट मिळालं. त्यानंतर जशी आम्हाला विश्रांतीची गरज आहे तशी सायकलही नको का? त्यामुळे सायकलच्या सर्विसिंग साठी जवळच्या सायकलच्या दुकानात गेलो. आमच्या सायकली बघून तिथल्या मेकॅनिक ची हिम्मत झाली नाही. म्हणून कमीत कमी वॉशिंग करता येईल अशी जागा आम्ही शोधत होतो. अचानक एका सेंटरमध्ये कार वॉशिंग सुरू असलेलं बघितलं आणि तिथे शिरलो. त्यांनी सायकली वॉशिंग करून देण्याचा मान्य केलं. आम्ही कोण कुठून आलो कुठे जातो अशी चौकशी झाल्यानंतर त्या सेंटरचे मालक वाली महंमद हे आम्हाला भेटायला. आले ते बहुजन मुस्लिम महासभाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तसंच ते इथले विधायक पण होते. आमची चौकशी करून झाल्यानंतर त्यांनी आम्हाला त्यांच्याकडून पूर्ण मदतीचे आश्वासन दिले. दरम्यानच्या काळात सायकलचे वॉशिंग आणि क्लिनिंग करून दिलं आणि त्याचा मोबदला सुद्धा आमच्याकडून घेतला नाही.

नंतर दुपारी आम्ही लखनौ दर्शन केलं. इथल्या रिक्षामध्ये बसून शहरातल्या महत्त्वाच्या जागा बघण्याचा बेत ठरवला होता तो यशस्वी पूर्ण केला. बडा इमाम वाडा, छोटा इमाम वाडा, रूमी दरवाजा, क्लॉक टॉवर अशा काही ठिकाणांना भेटी दिल्या. त्यानंतर जेवणासाठी टुंडे कबाब नावाच्या जगप्रसिद्ध जागी आम्ही गेलो. तिथला एकंदर माहोल बघून तोंडाला पाणी सुटले. तिथले व्हेज कबाब तर अतिशय लाजवाब होते. कुल्हड मधली खीर अतिशय चविष्ट होती. नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी तर इथे खूप जास्त पदार्थ मिळतात. एका वेळी अंदाजे ३०० लोक बसू शकतील अशी व्यवस्था आहे. या जागेला अनेक सिलिब्रिटींनी भेट दिली आहे. (कपिलदेव, अनुपम खेर, शाहरुख खान, अमीर खान इत्यादी)
दुपारी हॉटेलला परत घेऊन मस्त ताणून दिली.
उद्या पहाटे जरा लवकर निघायचे आहे.
चलो अयोध्या!!!

@देवदत्त टेंभेकर
क्रमशः

Day 17

West to East Cycling expedition day 17
Lucknow to Ayodhya

शार्प पहाटे साडेपाच वाजता अयोध्येकडे प्रस्थान केले.
चांगला रस्ता आणि जास्त अंतर असल्याने आज आमची गाडी तेज धावत होती.
पहिला चहा १६ किमी वर, दुसरा चहा ऑमलेट ३६ किमी वर, नाश्ता ५५ किमी वर आणि लंच १०५ किमी वर घेतला.
आज जेवणापूर्वी सेंच्युरी राईड ची दुसरी वेळ!!!
वेळेवर अयोध्या नगरीत प्रवेश केला. पण….. गावातील रस्ते, गर्दी आणि गुगलच्या सहाय्याने मुक्कामाची जागा शोधण्यासाठी बराच वेळ गेला. त्यानंतर वेध लागले ते रामलल्लाच्या दर्शनाचे, शरयु नदीचा घाट, लता मंगेशकर चौक आणि हनुमान गढीचे.
माधव भवन निवासस्थानी शुचिर्भूत होऊन बाहेर पडल्यावर कळलं की राममंदिर ६ वाजता बंद होतं. मग शरयु नदीच्या घाटावर जाऊन आलो. तिथे पाण्यात अर्घ्य देताना कृतकृत्य झालो.
उद्या थोडं उशिरा निघून बाकी जागा बघण्यासाठी जाऊ…
अयोध्या नगरीत जेवढी माणसं असतील तेवढीच माकडं रस्त्यावर दिसलीत. प्रभू श्रीरामाच्या वास्तव्याने पावन झालेल्या भूमीवर प्रत्यक्ष भेट देता आली याचा आनंद आहे. कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की सायकलने अयोध्येला जाणं होईल ते…
उद्या सकाळी गोरखपूर साठी निघू.
आता खूप दमलो आहे. लगेच झोपी जाणार.
क्रमशः

@देवदत्त टेंभेकर

Day 18

West to East cycling expedition day 18
Ayodhya to Gorakhpur (आज 121.53 किमी/ आतापर्यंत 1923.73 किमी)
शनिवार, २६ नोव्हेंबर

काल अयोध्येत आल्यापासून एका वेगळ्याच विश्वात आल्याची अनुभूती येत होती. एक स्वप्न सत्यात साकारता आलं याचं आत्मिक समाधान होतं.
सकाळी उठून हनुमान गढीचे दर्शन घेतले. अशी श्रद्धा आहे की स्वयं हनुमान येथे विराजमान आहेत. त्यामुळे अखंड ” सीताराम” चा उद्घोष सुरू होता. हे मंदिर अतिशय सुंदर आहे.
तिथून पुढे रामजन्मभूमीच्या दर्शनासाठी जाताना वाटेमध्ये दशरथ महाल, कौसल्या महाल आणि सीता महाल लागतात.
या भागात प्रचंड सिक्युरिटी आहे. रामलल्ला विराजमान आहेत तीच प्रमुख जागा आहे.
आंत शिरण्यापूर्वी तीन वेळा सिक्युरिटी चेक होते. आंत कुठलीच वस्तू घेऊन जायला परवानगी नाही.
रामलल्लाचं दर्शन हा आमच्यासाठी अत्युच्च क्षण!! डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले…. या मंदिरासाठी शेकडो वर्षांपासून संघर्ष सुरू होता. आज ती जागा बघताना कै. दादा राजहंस आणि कै. दादा टेंभेकरांची आठवण येवून दाटून आलं. बाहेर पडल्यावर तिथल्या सिक्युरिटी इन्चार्ज सोबत फोटो काढला.
अयोध्येच्या बाहेर पडताना लता मंगेशकर चौकात फोटोसेशन केले. लता दिदींच्या आवाजातील राम धून अखंड सुरू होती.
त्यांच्या नांवाचें अतिशय समर्पक स्मारक इथे उभे आहे. त्यांच्या बाबतीत “मरावे परी कीर्तीरूपे उरावे” ही उक्ती सार्थ ठरते.
शरयू नदी ओलांडून जाताना मनात विचारांचं काहूर माजलं. शरयू नदीच्या विशाल पात्राच्या दर्शनाने ऊर दाटून आला.
याच नदीत प्रभू श्रीरामांनी मनुष्य देह समर्पित केला होता अशी श्रद्धा आहे.
मानस सरोवरात उगम पावलेली शरयू नदी पुढे गंगेला मिळते..
आज पुढील प्रवास सकाळी ८ वाजता सुरू झाला म्हणजे रोजच्या मानाने तब्बल अडीच तास उशीरा!! कारण राम मंदिर सकाळी ७ वाजता उघडतं.
आज लांबचा पल्ला गाठायचा होता. त्यामुळे मुक्कामावर पोहोचण्यासाठी उशीर होणार हे निश्चित होतं. त्यात दोघांच्या सायकल पंक्चर झाल्या. त्यातील एक पंक्चर अस्मादिकांनी दुरुस्त केला ही एक ऐतिहासिक घटना आहे!!
नाउमेद न होता आम्ही पुढे जात होतो.
आज कोलकत्याचा २५ वर्षीय सोलो रायडर अनिमेश भेटला. संपूर्ण भारत भ्रमण करण्याचा त्याचा मानस आहे. आतापर्यंत २१००० किमी चा प्रवास त्याने साध्या सायकलने केला आहे!! कमाल आहे त्याची…
शेवटचे १८ किमी उरले असताना चहासाठी थांबलो. तिथे चक्क पहिल्यांदा कपबशीत चहा मिळाला!!
आम्हाला सोयीचं हॉटेल मिळण्यासाठी तुहिना आणि तन्मय (कट्टींची मुलगी आणि जावई) खूप रिसर्च करतात. त्यांच्या सजेशन प्रमाणे आम्ही हॉटेल शोधत असतो.
आजचं हॉटेल तर खूप म्हणजे खूपच छान आहे. त्यांचं (तुहिना आणि तन्मयचं) कौतुक करावं तेवढं कमीच!!
उत्तम हॉटेल आणि रुचकर जेवण मिळाल्याने श्रम जाणवले नाहीत. तशीही शरीराला आता सवय झाल्यामुळे सायकलिंगचा त्रास अजिबात होत नाही.

उत्तर प्रदेश सोडताना आज पहिल्यांदा ऊस लागवड असलेली शेतं दिसली. उत्तर प्रदेशात सर्वात जास्त ऊस उत्पादन होतं असं ऐकलं होतं. उत्तर प्रदेशात सर्वात जास्त सायकलिंचा वापर दिसून आला. तसेच राष्ट्रीय महामार्गावर उलट दिशेने जाणारे सर्वाधिक इकडे बघायला मिळतात. पोलिस यंत्रणा त्या बाबतीत उदासीन आहे असे दिसून येते.

उद्या आम्ही बिहार राज्यात प्रवेश करणार आहोत.

आज १९२३ किमी अंतर पार केले. म्हणजे अर्ध्या अंतरापेक्षा थोडं जास्त.
उद्या २००० किमी चा टप्पा ओलांडणार!!

When the going is tough, only the tough gets going…

क्रमशः

@देवदत्त टेंभेकर

day 19

West to East cycling expedition day 19
Gorakhpur to Gopalganj 141.29 kms (2065.02 kms cumulative)
Sunday, 27 November
Rabti River
कुशीनगर महानिर्वाण स्थळ ७२ किमी

कालचा मुक्काम खूप आरामदायी झाला.
पहाटे लवकर उठून निघायचे ठरले त्याप्रमाणे सर्वजण वेळेत तयार झाले. हॉटेल चा व्यवस्थापक आमच्या फारच प्रेमात असल्याने आमचा कालचा स्टे खूपच कंफर्टेबल झाला.
सकाळी फ्रेश होऊन बाहेर पडल्यावर सायकल आम्हाला घेऊन जायला लागली. हा रस्ता इतका चांगला आहे की आम्ही सायकल चालवत नसून सायकल आम्हाला नेत होती.
हवेत गारवा आणि आजूबाजूला लाईट धुकं असल्याने खूपच फ्रेश वाटत होतं.

वाटेत एका गावात दोन नीलगायी दिसल्या.
राबता नदीचा परिसर अतिशय रमणीय आहे.

आजचं सुर्यबिंब रोजच्या मानाने खूपच छान दिसत होतं. निसर्गाचा आविष्कार बघून आपण नतमस्तक होतो. असं वेदर असताना सायकल चालवण्याचे श्रम अजिबात जाणवत नाहीत.

आज ब्रेकफास्ट ५० किमी अंतरावर घेतला.
सत्तर किलोमीटर अंतरावर वाटेत एक पत्रकार भेटले. कुशीनगर गावातील भगवान गौतम बुद्धांचे निर्वाणस्थान बघण्याचा त्यांनी आग्रहच केला. हायवे पासून जवळच ही जगप्रसिद्ध जागा आहे. बिहारमध्ये पाटलीपुत्र भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला आणि उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे महानिर्वाण झाले हे ऐकून होतो. आज ती पवित्र जागा प्रत्यक्ष बघण्याचे भाग्य लाभले.
त्या परिसरात त्यांनी आमची मुलाखत घेतली, एक ग्रूपफोटो काढला आणि उद्या स्थानिक पेपरमध्ये छापून येईल म्हणालेत.
थोडं पुढे आल्यावर एक पंक्चर वाला दिसला. दोन ट्युब दुरुस्त करून घेतल्या.
१०० किमीवर जेवणासाठी एका छोट्या धाब्यावर थांबलो. तिथेच विश्रांती घेतली.
१०४ किमीवर बिहार प्रांतात आम्ही प्रवेश केला. बॉर्डर वर यु पी. सरकारची पोलिस चौकी आहे. तिथल्या अधिकार्यांनी आम्हाला पेढे खाऊ घातले. पिण्यासाठी पाणी दिलं.
गोपालगंज गाठेपर्यंत सायंकाळचे साडेसहा वाजले.
या भागात लवकर अंधारून येतं. म्हणजे आम्ही भारताच्या पूर्वेकडील प्रदेशात प्रवेश केला आहे.
आजची राईड सेकंड हाय्येस्ट लाँग राईड होती. (१४१ किमी)
आज आम्ही सर्वांनी २००० किमी चा पल्ला गाठला.
आता काऊंट डाऊन सुरू झाले आहे.
आतापर्यंतच्या प्रवासाने खूप आनंद दिला. तो दिवसेंदिवस वृद्धिंगत होईल अशी आशा आहे.
बिहार राज्याचं वेगळेपण जाणवायला लागलं. बोलण्यातला लेहेजा, वेशभूषा उत्तर प्रदेश पेक्षा खूप वेगळी आहे. येणाऱ्या दिवसांत या बाबतीत अधिक सांगता येईल.

क्रमशः

@देवदत्त टेंभेकर

Day 20

West to East cycling expedition day 20
28 November, Monday
Gopalganj to Muzaffarpur
125.05kms (Cumulative 2190.07kms.)

बिहार राज्याबद्दल माझ्या मनात अनेक गैरसमज होते आणि याला कारणीभूत म्हणजे वेब सिरीज आणि सिनेमात दाखवण्यात येणारे बिहारचे राजकारण. त्यातल्या काही गोष्टी वास्तवात सत्य असतीलही, परंतु माझा वैयक्तिक अनुभव मात्र खूप संमिश्र असा आहे. सुरुवातीला दिसलं ते भांगात सिंदूर भरलेल्या स्त्रिया आणि तोंडात पानाचा तोबरा किंवा गुटखा खाल्लेले पुरुष. परंतु उत्तर प्रदेश सारखं रस्त्यावरचं रंगकाम मात्र अभावानेच दिसले. भोजपुरी हिंदी भाषेचा लहेजा मात्र खूप गोड वाटतो. ते लोक हिंदी बोलत असले तरी आपल्याला कळायला थोडा वेळ लागतो.
असो…
सकाळी रोजच्या वेळेला मुजफ्फरपुर कडे आम्ही प्रस्थान केले. खालच्या प्रमाणेच रस्ता सुंदर असल्यामुळे आज स्पीड छान मिळत होती पहिला स्टॉप 18 किलोमीटरवर, दुसरा 36 किलोमीटरवर आणि नाश्ता ४६ किलोमीटर वर घेतला.
नाश्त्यामध्ये आपलं नेहमीच. मात्र आज आलू पराठ्यासोबत दह्या ऐवजी चक्क दिलेलं होतं अर्थात आम्ही वेगळं दही मागून घेतलं.
या भागात घरोघरी गायी, म्हशी पाळण्याचं प्रमाण जास्त आढळून आलं. म्हशी जास्तच. त्यामुळे दुग्ध व्यवसाय अतिशय तेजीत असावा. रस्त्यावरच्या कुठल्याही धाब्यावर जे दही मिळतं ते अतिशय मलाईदार आणि घट्ट असतं. इथे धाब्यावर सर्वत्र hand pump दिसून येतात.
बिहारचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे दारूबंदी आहे आणि त्याची जागोजागी अतिशय चांगल्या प्रकारे जाहिरात केली आहे. त्यामुळे कुठलाही मद्यपी आम्हाला अद्याप दिसला नाही. गुजरात मध्ये दारूबंदी असली तरीही तिथे सर्रास दारू मिळते तसा प्रकार बिहारमध्ये नसावा. इथले लोक खूप साधे आणि भोळे आहेत असं वाटतं.

उत्तर प्रदेश मध्ये झांसी पुढच्या भागाला बुंदेलखंड म्हणतात तसंच गोपालगंज आणि मुजफ्फरपुर या भागाला पूर्व चंपारण असे म्हणतात. या भागातली एक विशिष्ट खाद्य संस्कृती आहे. जसं आपल्याकडे खानदेशी बेदर्भी सावजी कोल्हापुरी मालवणी प्रकार असतात तसं या भागात चंपारणी खाद्य पदार्थ मिळतात. विशेषतः नॉनव्हेज खाद्यपदार्थ जास्त लोकप्रिय आहेत.

राजस्थान पासून पुढे सगळीकडे शासकीय शाळांना राजकीय शाळा असे का म्हटले जाते ते कळले नाही.

सकाळी गोपाळगंज पास केल्यानंतर गंडक नदीचा पूल लागला. वातावरणात धुकं असल्याने नदीचा परिसर अतिशय रमणीय दिसत होता.
इथे एक गंमत आहे. नदीवरच्या जुन्या पूलावरून एकेरी वाहतूक सुरू आहे. नेमकं आम्ही जात असताना तिथे ट्रॅफिक जाम झाला. नवीन दुहेरी पुलाचे बांधकाम सुरू असतानाच तो कोसळला आणि कॉन्ट्रॅक्टर पळून गेला असं तिथले लोक आम्हाला सांगत होते.

इतिहासाच्या पुस्तकात काही गावांची नावे आपण ऐकली त्यातलं चौरी चौरा आणि पिपरा कोठी विशेष लक्षात राहतात.
चौरी चौराचं हत्याकांड आणि त्यानंतर उसळलेला असंतोष याबद्दल आपण इतिहासाच्या पुस्तकात वाचलेलंच आहे. पिपरा कोठी गावात महात्मा गांधींनी सत्याग्रह केला होता.त्या गावात महात्मा गांधींचा भव्य पुतळा रस्त्यावरून ठळकपणे दिसून येतो.
तसेच या गावात खूप मोठ्या शैक्षणिक संस्था आम्हाला दिसल्या. बिहारमध्ये आर्थिक विषमतेमुळे शिक्षणाचे प्रमाण कमी जरी असलं तरी शिक्षणाचा दर्जा निश्चितच चांगला असावा. म्हणूनच स्पर्धा परीक्षांमध्ये बिहारी तरुण बरेच पुढे आलेले दिसून येतात.
पिपरी कोठी या गावापासून अतिशय गुळगुळीत रस्ता सुरू झाला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप सुंदर प्लांटेशन केले आहे.
एका भागात जवळजवळ तीन किलोमीटर पट्ट्यामध्ये कलमी आंब्याची लागवड केलेली दिसून आली. त्या पुढच्या भागांमध्ये केळीच्या बागा दिसल्या.
आज सर्वसाधारण स्पीड खूप चांगला मिळाला त्यामुळे आम्ही साडेचार वाजताच आमच्या मुक्कामाच्या जागी पोहोचलो.
या मोहिमेतली ही आमची १७ वी सेंचुरी राईड!!
थकवा अजिबात जाणवत नाही. आजचा आमचा मुक्काम कांटी गावातल्या कृष्णा पॅलेसमधे आहे. इथून मुझफ्फरपूर फक्त दहा किलोमीटर अंतरावर आहे.
उद्याच्या प्लॅन मधे थोडा बदल केला आहे. मुजफ्फरपुर ते दरभंगा हे अंतर फक्त 66 किलोमीटर असल्यामुळे आमच्या नियोजित दरभंगा स्टॉप ऐवजी पुढे जाऊन आम्ही थांबणार आहोत. याचा फायदा असा होईल की पुढे जे कमी जास्त अंतर आहेत ते इव्हन आऊट होईल.
आता सपाटून भूक लागली आहे त्यामुळे इथेच थांबतो.

क्रमशः

@देवदत्त टेंभेकर

Day 21

West to East cycling expedition day 21
Muzaffarpur to Darbhanga
72.84 kms (Cumulative 2262.91 kms)
29th November, Tuesday

आज आमच्या सायकल मोहिमेचा एकविसावा दिवस. असं म्हणतात एखादी गोष्ट जर आपण 21 दिवस सातत्याने केली तर त्याचं रूपांतर सवयीत होतं. आम्हाला तर सायकलिंग ची सवय होतीच मग अजून काय ते वेगळ घडणार? गंमतीचा भाग सोडला तर 21 दिवसानंतर सुद्धा थकवा जाणवत नाही याचं कारण सायकलिंग ची सवय.
आजचं अंतर कमी असल्यामुळे आमचे वेगवेगळे प्लॅन सुरू झाले. हॉटेलमध्ये गेल्या गेल्या धोबीघाट लावायचा होता.
सकाळी जरा उशिराने निघालो उशिरा म्हणजे साडेसहा वाजता. जवळच्या टपरीवर चहा घेतला इथे चहा करण्याची वेगळीच पद्धत बघायला मिळाली चहा गाळून झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी ब
ब्रू कॉफीची पूड टाकतात. काय अफलातून चव लागते सांगू.. आहाहा!!!
दुसरी गोष्ट म्हणजे चहा कुल्हड मध्ये देतात. कुलर म्हणजे छोट्या पेल्याच्या आकाराचं मातीचं भांडं. या गावामध्ये एकच कुंभार आहे जो सर्व चहा टपऱ्यांना कुल्हडचा पुरवठा करतो. हीच आपली पुरातन ग्राम संस्कृती.
थोडं अंतर पुढे गेल्यानंतर बुधीगंडक नदी लागली. या भागात गंडकी नदी आम्ही आतापर्यंत दोन ठिकाणी आणि क्रॉस केली. गंडकी नदीचा उगम नेपाळमध्ये होत असून ती दक्षिणेकडे गंगा नदीला मिळते. पावसाळ्यात नेपाळमध्ये जेव्हा या नदीला पूर येतो त्याचा फटका बिहार मधल्या गावांनाही होत असतो असे कळले.
पुढे काही अंतरावर बोचाहां गाव असा बोर्ड दिसला आणि विरुद्ध दिशेने जाणारे सायकल स्वार दिसले म्हणून त्यांना रस्ता क्रॉस करून भेटायला गेलो. आमच्या सारखेच वेडे ज्येष्ठ नागरिक नाशिक ते नेपाळ असा प्रवास करून परतीच्या वाटेवर होते. गोदावरी ते गणपती असा त्यांचा प्रवास आहे. त्यांच्याशी गप्पा मारून आणि फोटोसेशन करून आम्ही पुढे निघालो.
या भागात सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे. हम रस्त्यावरच्या हॉटेलमध्ये बघितल्यानंतर त्याची प्रचिती येत होती. लग्न घरी भोजपुरी भाषेतली लोकगीते ऐकू येत होती.
भोजपुरी भाषेतले बरेचसे शब्द हिंदी असल्याने त्याचा अर्थ आम्हाला कळायला अवघड जात नव्हतं. मुलीच्या बिदाईच्या संदर्भातलं गाणं ऐकताना मात्र हसू आलं. कारण गाण्यात बाप आणि मुलगी दोघेही रडत रडतच काही ओळी गात होते…
या भागात रस्त्याच्या दुतर्फा बऱ्याच वीट भट्टया दिसून आल्या.

55 किलोमीटरवरच्या मैथी टोल नाक्याच्या आधी एका छानशा धाब्यावर आम्ही नाष्ट्यासाठी थांबलो. तिथे एक मजेशीरच फलक होता. “फ्री होम डिलिव्हरी ० किमी तक”. लोक जसे पुणेरी पाट्यांचे फोटो काढतात तसा आम्ही या पाटीचा फोटो काढून घेतला.
आज रस्त्यामध्ये बरेच टिक टॉक स्टार्स भेटले. काहीजणांनी आमचे व्हिडिओ काढले.
पुण्याचा दगडूशेठ हलवाई गणपती सुप्रसिद्ध आहे. दरभंगा येण्यापूर्वी काही अंतरावर एक गंमतीशीर बोर्ड बघितला. “दगरू सेठ ज्वेलर्स”!! बोर्ड बघून आमची हसून हसून पुरेवाट झाली.
दुपारी बारा वाजता दरभंगाला आमच्या मुक्कामाच्या जागी आम्ही सुखरूप पोहोचलो.
आता सफाई मोहीम सुरू करतो. उद्या पुन्हा भेटूया.

क्रमशः
@देवदत्त टेंभेकर

Day 22

West to East cycling expedition day 22
Darbhanga to Simrahi Bazar 110.2 Kms (Cumulative 2373.13 kms)

30 November, Wednesday

काल आमचा हाफ डे होता. लवकर पोहोचल्यावर धोबीघाट आवरून कपडे हॉटेलच्या टेरेसवर वाळत घातले.
मोनीष आणि कट्टी जवळच्या जगप्रसिद्ध “चंपारण मीट” मधे तर मी आणि भवाळकर आमच्याच हॉटेलच्या उपहारगृहात गेलो.
इथली मिठाई बघून दोघांच्याही तोंडाला पाणी सुटले… मग आम्ही मिठाई डिनर केले. कोणी असं केल्याचं ऐकिवात नाही…
आज सकाळी समोरच्या टपरीवर चहा घेऊन मस्त दाट धुक्यात प्रस्थान केले. हेडलाईट आणि टेल लाईट लावून सायकल चालवावी लागत होती.
या भागात दिवस लवकर उजाडतो. तरीही धुक्यामुळे लाईट अत्यावश्यकच.
१८ किमी वर दुसऱ्या चहासाठी थांबलो. जवळच मधुबनीचा बोर्ड दिसला. मधुबनीचा इतिहास अतिशय रंजक आहे.
मधुबनी आर्ट तर जगप्रसिद्ध आहेच. मधुबनीचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान वादातीत आहे. महात्मा गांधींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मधुबनीत खादीचं उत्पादन सुरू झाले. त्यामुळे भारतात खादी उत्पादनात मधुबनी अग्रेसर आहे. या भागात मैथिली भाषा बोलली जाते. राजा जनक आणि सीता या प्रदेशातली आहे. येथून नेपाळ बॉर्डर जवळ आहे.
ब्रिटिशांचे राज्य असताना महाराज रामलखन ठाकूर या भागातले संस्थानिक होते. त्यांच्या राज्यात जमीनीवर संस्थानाचा हक्क असायचा. कोणत्याही व्यक्तीला जमीन खरेदी विक्री करण्यासाठी परवानगी नव्हती. फुल परास गांवात पारसमणी आहे अशी लोकांची श्रद्धा आहे. तसेच कोहिनूर हीरा मूळ या संस्थानातील असल्याचा दावा स्थानिक लोक करतात.
आज कोशी नदीच्या विशाल पात्राचे दर्शन झाले. या नदीचे पात्र जवळजवळ दीड किलोमीटर रुंद आहे. मध्यभागी डेल्टा तयार झाल्यामुळे नदीच्या दोन धारा दिसतात.
या भागातील दुर्मिळ पक्षांवर संशोधन करण्यासाठी तुहिना (कट्टींची मुलगी) बराच काळ वास्तव्य करून होती.
सकाळी रस्त्यालगतच्या गांवाचं निरीक्षण करताना खूप इंटरेस्टिंग गोष्टी दिसल्या.
शाळेच्या बाहेर झाडाखाली मुलांची शाळा बघितली. म्हशीवर बसून रपेट करणारी मुलं बघितली. धान काढून झाल्यावर गवत न जाळता व्यवस्थित मोळी करून शेताच्या बाहेर रचून ठेवलेली बघितली. शेतीच्या कामात स्रिया अतिशय सक्रिय दिसून आल्या. प्रत्येक व्यक्ती कुठल्यातरी कामात व्यस्त दिसत होती. त्यामुळे टवाळक्या करणारे टोळके सहसा दिसले नाहीत.
५५ किमी अंतर कापून झाल्यावर माझ्या सायकलचे मागचे टायर पंक्चर झाले. १० मिनिटांत ट्युब बदलून पुढच्या एका गावात पंक्चर दुरुस्त करून घेतला.
पूर्वी पंक्चर झालं की टेन्शन यायचं. आता त्यात विशेष काही वाटत नाही. कट्टींनी चांगली तयारी करवून घेतली.
या भागात धाब्याला “लाईन हॉटेल” म्हणतात. आजचा लंच कोशी लाईन हॉटेल मध्ये घेतला. कोशी नदीतील मासे प्रसिद्ध आहे. कट्टी, भवाळकर आणि मोनिषनी त्याचा आस्वाद घेतला.
आज इतर दिवसांच्या तुलनेत अंतर कमी होते आणि स्पीड पण चांगली मिळाल्याने ४ वाजता सिमराही गांवात पोहोचलो.
उद्या रूटमधे थोडा बदल केला आहे. बहादुरगंज ऐवजी किशनगंज मार्गे जाणार आहोत. नुकत्याच प्रीती म्हस्के त्या मार्गाने गेल्या होत्या. तिकडे रस्त्याची कामे सुरू असल्याने त्यांच्या सल्ल्यानुसार रूट बदलला
उद्या जास्त अंतर कापायचे असल्याने लवकर जेवून लवकर झोपणार. झोप चांगली झाली की सायकलिंग मस्त होतं हा आमचा आजपर्यंतचा अनुभव आहे.

क्रमशः

@देवदत्त टेंभेकर

Day 23

West to East cycling expedition day 23
Simrahi Bazar to Kishanganj (137 kms) (Cumulative 2510 kms)

Thursday, 1 December

आज जास्त अंतर कापायचे असल्याने पहाटे लवकर उठून सकाळी सव्वा पाच वाजता सर्वजण तयार झालो.आमचा बिहार राज्यातला आज शेवटचा दिवस. त्यामुळे सहाजिकच आज जास्त बारकाईने आजूबाजूचा परिसर बघत बघत निघालो.
या भागामध्ये पारंपारिक पद्धतीने शेती करण्याची पद्धत दिसून आली.
या भागातल्या लोकांचा आर्थिक स्तर अतिशय खालच्या दर्जाचा असल्यामुळे त्यांची घरे बांबूची आणि त्यावर मातीचे लिंपण केलेले. छताला बहुतांश लोकांनी टीनाचा वापर केलेला दिसून आला. ज्यांनी पक्की घरे बांधली त्यांच्या घराला बाहेरून प्लास्टरिंग दिसून आले नाही. या भागात सर्वजण अतिशय कष्ट करताना दिसून आलेत. लहान,थोर,म्हातारे स्त्रिया, पुरुष सर्वच. शेतामध्ये बहुतांश कामे स्त्रियाच करताना दिसून आल्या. आपल्या पुरातन ग्राम संस्कृतीचं दर्शन घडलं. प्रत्येक गावात एक लोहार, एक चांभार, एक सायकल दुरुस्त करणारा, एक कडबा कुटारची कटाई करणारा,एक वाळलेल्या गंज्यांची वाहतूक करणारा इत्यादी. प्रत्येक जण आपल्या टर्न ची वाट बघत असावा. कारण कुठेच गडबड गोंधळ दिसून येत नव्हता.
आज सुद्धा काही खूप गमतीशीर नाव वाचायला मिळालेत झिगली चौक, कुस्ती चौक. एका गावाचं नाव तर ढोल बाजा असं आहे. एका गावामध्ये हरिजन वस्ती असा बोर्ड दिसला याचा अर्थ त्या गावांमध्ये हरिजन लोक वेगळ्या ठिकाणी राहतात.
आज नाश्ता पन्नास किलोमीटर अंतरावरच्या एका पंजाबी ढाब्यात आणि जेवण शंभर किलोमीटर वरच्या सागर रेस्टॉरंट येथे घेतले. नाश्ता आणि जेवण अतिशय छान होते.
कणखई नदी ओलांडल्यानंतर आम्ही अरेरिया जिल्ह्यातून किशनगंज जिल्ह्यात प्रवेश केला. कंट्री नदीचे पात्र आणि आजूबाजूचा परिसर अतिशय रमणीय आहे.

या भागामध्ये मुगल प्रशासक असावा कारण बऱ्याच जिल्ह्यांची नावे गोपालगंज, किशनगंज, बहादुरगंज अशी आहेत.
पुढे 116 किलोमीटरवर खजलामणी घाट या गावातल्या सिन्हा हॉटेलमध्ये चहा घेतला.
हे गाव अतिशय लहान आहे आम्हाला बघताच हळूहळू तिथे गर्दी जमू लागले आणि चहा घेऊन बाहेर पडताना तर आमच्याबरोबर सेल्फी घेण्याची जणू स्पर्धाच लागली.
किशनगंज गावात प्रवेश करण्यापूर्वी महानंदा नदी लागली या नदीचे पात्र तसं विशेष मोठं नव्हतं पण आजूबाजूचा परिसर खूप छान होता.
संध्याकाळी पाच वाजता आम्ही किशनगंज गावात प्रवेश केला आणि पंधरा मिनिटात आमच्या मुक्कामाच्या जागी सुखरूप पोहोचलो.
सागर धाब्यापासून किशनगंज गावापर्यंत एक आंतला रोड आम्ही घेतला तो अतिशय छान होता. तो घेतल्यामुळे आमचे जवळजवळ 14 किलोमीटर अंतर कमी झाले!!
किशनगंज मध्ये मयूर हॉटेलमध्ये आम्ही मुक्काम ठोकला आहे. हे हॉटेल अतिशय चांगले आहे. उद्या इथून आम्ही पश्चिम बंगाल राज्यामध्ये प्रवेश करणार आहोत. या जागेपासून पश्चिम बंगालची सीमा फक्त पाच किलोमीटर अंतरावर आहे आणि आम्ही चिकन नेक परिसरात आहोत अशी माहिती मिळाली. या भागाला चिकन नेक का म्हणतात? हे भारताचा नकाशा बघितल्यावर आपल्या लक्षात येईल.
या प्रवासामुळे माझ्या मनातली बिहारची प्रतिमा मात्र अतिशय चांगली झाली आहे.

क्रमशः

@देवदत्त टेंभेकर

Day 24

West to East cycling expedition day 24
Friday 2nd December
Kishanganj to Jalpaiguri 141 Kms (Cumulative 2651 kms)

काल किशनगंज मध्ये मुक्काम झाला. किशनगंज मला महाराष्ट्रातल्या भंडारा गावासारखं वाटलं. म्हणजे जिल्ह्याचे ठिकाण असूनही अगदी लहान गावा सारखं.

आज आम्हाला लांबचा पल्ला गाठायचा असल्याने पहाटे सव्वा पाच वाजताच सर्वजण तयार झाले आणि शार्प साडेपाच वाजता पहिला चहा घेऊन आम्ही प्रस्थान केले.
किशनगंज हा बिहार राज्यातला शेवटचा जिल्हा. जेमतेम पाच किलोमीटर अंतर पार केलं आणि आम्ही पश्चिम बंगाल राज्यामध्ये प्रवेश केला!!
प्रवेश केल्या केल्या दोन पांढऱ्या कबुतरांनी माझं दणदणीत स्वागत केलं.
लगेचच पश्चिम बंगालची खूण म्हणजे कालीमातेचे एक सुंदर मंदिर दिसलं. तिला वंदन करून पुढे 17 व्या किलोमीटर वरील इस्लामपूर भागातल्या एका टपरीवर चहासाठी थांबलो.
जवळजवळ 30 किलोमीटर अंतरापर्यंत रेल्वे लाईन आमच्या रस्त्याला समांतर धावत होती. ठिकठिकाणी आमच्या डाव्या बाजूला रेल्वे क्रॉसिंग दिसत होते. आम्ही हमरस्त्यावर असल्यामुळे आम्हाला मात्र रेल्वे क्रॉसिंग कुठेच करावे लागले नाही.

उत्तर प्रदेश पासून तर मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये एक गोष्ट आम्हाला कॉमन दिसली, ती इथे पण दिसली. ती म्हणजे बॅटरीवर चालणारी तीन चाकाची रिक्षा.
त्याचबरोबर बिहारमध्ये प्रवेश केल्यापासून मोहरीच्या तेलात बनलेले खाद्यपदार्थ मिळायला सुरुवात झाले पश्चिम बंगालमध्येही तीच पद्धत आहे. म्हणूनच कदाचित या भागात मोहरीची लागवड भरपूर प्रमाणावर दिसून येते.
थोडं पुढे आल्यानंतर आम्हाला महानंदा नदीचा ब्रिज लागला ही नदी आम्ही दुसऱ्यांदा ओलांडत आहोत.
याच्यापुढे बुधा नगर गाव लागलं. हे गांव म्हणजे भारताचं पायनापल कॅपिटल आहे असा उल्लेख आम्हाला आढळला.

साधारण 45 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा चहाचे मोठे मळे दृष्टीपथाला पडले. सहज रस्त्यावरून बाजूला जाऊन त्याला हात लावता येत होता इतके ते आमच्यापासून जवळ होते. मला तर गंमतच वाटली.
आज आम्ही बांगलादेश बॉर्डर पासून खूप जवळ होतो. वाटेत एका ट्रॅफिक पोलीस नि आम्हाला सांगितलं की फांसी देवा गावात एक जागा आहे जिथे महानंदा नदीच्या अलीकडे भारत आणि पलीकडे बांगलादेश !! आणि जवळच एक मोठं झाड आहे जिथे ब्रिटिशांच्या काळात फाशी द्यायचे. म्हणून त्या गावाचं नाव फांसी देवा असे आहे. आम्ही लगेच आमचा मोर्चा त्या दिशेने वळवला आणि खरोखरच काय अलौकिक दृश्य आम्हाला बघायला मिळालं!! महानंदा नदीच्या अलीकडे आम्ही होतो आणि पलीकडच्या तटावर बांगलादेशी युवक नदीच्या मधोमध आम्हाला दिसत होते. त्यांच्या बोलण्याचा आवाजही ऐकू येत होता तिथून जवळच फाशी देत असलेलं झाड सुद्धा आम्ही बघितलं या परिसरात एक सुंदर कृष्ण मंदिर आहे या जागी फोटोसेशन केलं नाही तर नवलच नाही का?
इथे एका मराठी बीएसएफ जवानाची आमची भेट झाली. तो नेमका अकोल्याजवळच्या एका गावातला होता. त्याने आमच्याशी खूप गप्पा मारल्या.
शंभर किलोमीटर अंतरावर अजून आम्हाला इंटरेस्टिंग जागा बघायला मिळाली. फुलबारी नावाच्या गावामध्ये भारत आणि बांगलादेश यांची बॉर्डर आहे. त्या जागेला झिरो मोबाईल पॉईंट असं म्हटलं जातं. इथे दोन्ही देशांचे ध्वज आहेत एका बाजूला भारताचे जवान आणि दुसऱ्या बाजूला बांगलादेशचे . वाघा बॉर्डरवर जशी रिट्रीट सेरेमनी होते तशीच इथे पण होते. बीएसएफ जवानांनी आम्हाला खूप चांगले सहकार्य केले आणि या जागे बद्दल माहिती दिली. त्यातल्या दोन लेडीज बीएसएफ जवानांनी आम्हाला केळी खायला दिलीत कारण की बराच उशीर झाला होता आणि जेवणाची वेळ टळून गेली होती.
हा परिसर बघून आम्ही आणि मनसोक्त फोटोग्राफी करून अडीचच्या सुमाराला एका धाब्यावरती जेवलो आणि जलपाईगुडी कडे मजल दरमजल करत जाऊ लागलो.
शेवटचे 20 किलोमीटर चौघेजण convoy पॅटर्न करून एकत्र गेलो कारण की या भागात संध्याकाळी पाच नंतर अंधार पडतो.
संध्याकाळी साडेसहा वाजता आम्ही हॉटेल चिराधी येथे सुगरण पोहोचलो. इथे राहण्याची अतिशय उत्तम व्यवस्था आहे. हॉटेलचच्या मालकांनी आमच्यावर खुश होऊन त्यांनी आम्हाला चांगला डिस्काउंट दिला.
उद्या आम्ही अलिपूर द्वार गावाकडे प्रस्थान करणार आहोत.

क्रमशः

@देवदत्त टेंभेकर

Day 25

West to East cycling expedition day 25
Saturday, 3rd December
Jalpaiguri to Alipur Duar १२५ किमी (Cumulative 2776 kms)

काल मजाक मजाक मध्ये 141 किलोमीटरची राईड झाली. आणि आज कमी अंतर आहे असं कळलं म्हणून आरामात उठलो तर पुढे जाऊन कळलं की जो ओरिजिनल रस्ता आहे त्या रस्त्यावर काम सुरू असल्याने हायवेने जावे लागणार. तीस किलोमीटर जास्त अंतर पडणार तरीही आम्ही अर्थातच चांगला रस्ता निवडला आणि आज सुद्धा 120 प्लस किलोमीटरचची राईड सुरू झाली.
चिराग दिन हॉटेलच्या पहिलवान नामक इसमाने आमचा ग्रुप फोटो काढला आणि सकाळी साडेसहा वाजता आम्ही प्रस्थान केले.
आधी जलढाका आणि नंतर तीस्ता नदी ओलांडून पुढे निघालो.
धुपगुडी गांवात नाश्ता केला. इथे बऱ्याच गावांची नावे “गुडी” आहेत.
38 किलोमीटर नंतर मोराघाट फॉरेस्ट रेंज सुरू झाली. थोडं पुढे गेल्यावर रस्त्याच्या दुतर्फा चहाचे मळे दिसू लागले.
ताटातूट झालेली रेल्वे लाईन आज अचानक भेटली आणि आमचा एकत्र प्रवास सुरू झाला.
58 किलोमीटर अंतरावर आम्ही सर्वांनी डेमडमिया टी इस्टेट मधे मनसोक्त फोटोसेशन केले.

या भागांत विशेष जाणवणारी गोष्ट म्हणजे सगळी गावं अतिशय स्वच्छ आणि गावांमध्ये वाहतुकीच्या नियमाचे पालन केल्याचे आढळत होते. शिवाय रस्त्यावर तुरळक गर्दी असल्याने सायकल चालवताना कुठलाही अडथळा आला नाही. आजच्या सबंध दिवसात उलट दिशेने येणाऱ्या वाहनांची किंवा दुचाकीस्वारांची संख्या अतिशय नगण्य होती.
मोहीम सुरू झाल्यापासून आज पहिल्यांदा नाश्त्यामध्ये पुरी भाजी चाखायला मिळाली आणि त्यासोबत मिष्टी दोई. मग काय, स्वारी एकदम खुश झाली!!

थोडं पुढे गेल्यानंतर डाव्या हाताला एक पर्वतराजी दिसली एका स्थानिकाला विचारलं तर तो म्हणाला की “शाब वो भूतान है . भारत के बाहर है”
भुतानची पर्वतराजी आमच्या सोबत शेवटपर्यंत दिसत होती.
रस्त्याच्या आजूबाजूचं दृश्य अतिशय नयनरम्य होतं. कोकणात किंवा गोव्याच्या रस्त्यावर जशा वाड्या दिसतात तशा वाड्या आणि त्याच्या बॅकग्राऊंडला भुतानची पर्वतराजी. रस्ता सुद्धा अतिशय गुळगुळीत अगदी पुण्यातल्या जंगली महाराज रोड सारखा!!
एका ठिकाणी धाब्यावर एक माणूस पाईप घेऊन ट्रक धुवत होता. कट्टींनी त्याला रिक्वेस्ट केली आणि त्याच्या हातातून पाईप घेऊन आम्ही आमच्या खराब झालेल्या सायकली चक्क धुवून काढल्या. परवा रस्त्यावरती चिखल असल्यामुळे चेन आणि गिअरची मशीन याच्यावरती बरीच धूळ साचली होती.
शंभर किलोमीटर अंतरानंतर आम्हाला हशीमारा एअर फोर्स बेस दिसला. अतिशय निसर्गरम्य ठिकाणी हा एयर बेस आहे.
पुढे कालजनी नदी ओलांडून आम्ही अलीपुरद्वार गावाकडे मार्गक्रमण सुरू ठेवले.
शेवटच्या टप्प्यामध्ये नेहमीप्रमाणे कॉन्व्हाय फॉर्मेशन करून आम्ही अलीपुर द्वार गावात शिरलो आणि हॉटेलमध्ये 5 वाजून 35 मिनिटांनी पोहोचलो.
गावात शिरताना अंधार झाला होता. आपल्याकडे ज्याप्रमाणे संध्याकाळी शुभंकरोती म्हणण्याची पद्धत आहे तशी इथे शंख फुंकण्याची पद्धत असावी.
गावातल्या घरातून शंखनाद ठळकपणे ऐकू येत होता.
अलीपुर द्वार हे गाव अतिशय सुंदर आहे. गावातल्या मुख्य रस्त्यावर मोठी बाजारपेठ आहे आणि रस्ता म्हणाल तर जंगली महाराज रोड सारखाच. गावाच्या आतला रस्ता सुद्धा फोर लेन चा आहे. रस्त्यावर तुरळक गर्दी. त्यामुळे इतर ठिकाणी झाला तसा त्रास आम्हाला अजिबात झाला नाही. आम्ही तर या गावाच्या प्रेमातच पडलो.
आज आमचा पश्चिम बंगाल राज्यातला शेवटचा दिवस उद्या आम्ही आसाम राज्यामध्ये प्रवेश करणार आहोत. उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल राज्याबद्दल आपल्या मनात अनेक गैरसमज असतात. परंतु प्रत्यक्ष इथे भेट दिल्यानंतर ते दूर होतात. टीव्हीवरचे न्यूज डिबेट बघून आपण आपली राजकीय मतं बनवतो. परंतु प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र वेगळीच असते याची प्रचिती आली.
आजची निसर्गाच्या सानिध्यातली ही राईड नेहमी करता लक्षात राहील.

क्रमशः

@देवदत्त टेंभेकर

Day 26

West to East cycling expedition day 26
Alipurduar to (Bongaigaon) Vivekananda Kendra Vidyalaya Kajalgaon (Assam) 117 Cumulative (2893 Kms)

Sunday, 4 December

अलिपुरदुवार हे अतिशय प्राचीन महत्वाचे व्यापारी केंद्र होते. तिबेट आणि भूतान सोबत सिल्क रूट वर जोडल्या गेले होते.
सध्या पश्चिम बंगाल राज्यातील पूर्वोत्तर क्षेत्रातील वीसाव्वा जिल्हा.
कालचं डिनर ईशाननी स्पॉन्सर केले होते.
मुघलाई पराठा ही पश्चिम बंगालची स्पेशल डिश आणि जेवण झाल्यानंतर इथल्या प्रसिद्ध Dooars Sweets मधून संदेश आणि एक बंगाली स्वीट खाल्लं. Authentic Bengali Sweet खाल्ल्याचे समाधान लाभले.
सकाळी नेहेमीप्रमाणे शार्प साडेपाच वाजता आम्ही प्रस्थान केले. वातावरणात दंव असल्याने झाडांची पानं चिंब भिजलेली होती. हायवेवर जाणारा रस्ता लहान गावांमधून जात असल्याने रस्त्याच्या दुतर्फा भरपूर झाडी होती. मधुनच अंगावर पाण्याचा थेंब टपकला की अंगावर शहारे यायचे. फार छान फीलिंग होतं..
आजपण वाटेत चाको, गदाधर आणि रायडक नदी लागली.
गावातून जाणारा रस्ता आणि नदीवरील पूल पश्चिम बंगाल PWD नी बांधला आहे. अतिशय उत्कृष्ट काम केले आहे. असे काम सर्व शासकीय यंत्रणा करतील तर आपला देश वेगाने प्रगतीपथावर जाऊ शकतो. पेड इंजिनियर्सना सलाम!!
पुलावर दोन्ही बाजूला या भागातील पारंपरिक कलाकृतींचे कोरीवकाम अतिशय कल्पकतेने केलेले आहे.
बिहार पासून पुढे आखुड पायांच्या बकऱ्या दिसतात. सुरुवातीला विचीत्र वाटायचं. आता सवय झाली.
आसाममध्ये आल्यावर काली माता ऐवजी कामाक्षी देवीची मंदिरे दिसतात.
भूतान, आसाम फर्निचर लाकडासाठी जगप्रसिद्ध आहे. म्हणून रस्त्यावर कलाकुसर केलेले फर्निचर विक्रीसाठी दिसत होते. या भागात बांबू लागवड प्रचंड असल्याने केनचे फर्निचर सुद्धा होते.
सुरुवातीचा २५ किलोमीटर मार्ग अतिशय सिनिक होता.
इकडची गावं अतिशय स्वच्छ आणि नीटनेटके आहेत.
आज चहा घेताना जो कप होता तो ६० मिली. चा होता. एक कप चहा घेतला तर समाधान होत नाही. (त्या कपवर तसं छापलं आहे!!) (एकतर येवले इकडे आले असतील किंवा हे लोक येवलेंकडून शिकले असतील.)
५१ किलोमीटरवर ब्रेकफास्टसाठी थांबलो. आज आसामी पद्धतीचा नाश्ता मिळाला.
या पुढील रस्त्यावर रोडची कामं सुरू असल्याने खूप “डायभर्सन” होते. त्यात हेड विंड मुळे स्पीड अजिबात मिळत नव्हती.
एफर्ट लेव्हल खूप जास्त होती.
साधारण १५ किमी कसोटीचा काळ होता.
नंतर रस्ता चांगला होता.
संध्याकाळी साडेचार वाजता बोंगाईगांवाच्या अलिकडील काजलगावातल्या विवेकानंद केंद्र विद्यालयात पोहोचलो.
हे गाव Bodoland Territorial Region (BTR) स्थानिक लोक बोडो भाषा बोलतात.
तिथे आज एक छोटेखानी प्रेस कॉन्फरन्स झाली. जिल्हा संघचालक श्री ब्रम्हांची भेट झाली. ही निवासी शाळा आहे. रात्री विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत वार्तालाप केला.
आजचा मुक्काम शाळेच्या परिसरात आहे.
उद्या आम्ही नलबाडी गावाकडे प्रस्थान करणार आहोत.

क्रमशः
@देवदत्त टेंभेकर

Day 27

West to East cycling expedition day 27
Bongaigaon to Nalbari (127 Kms)
Monday, December 5
Cumulative 3020 Kms

काल रात्री विवेकानंद केंद्रातले आमचे वास्तव्य अगदी घरच्यासारखे झाले. रात्रीचे जेवण त्यांच्याच मेस मध्ये घेतलं. आसामी पद्धतीचा वाफाळलेला भात, मसूर डाळीचे वरण, वांग्याचे काप आणि सुकी भाजी अतिशय साधं पण रुचकर जेवण होतं.
कमीत कमी मसाल्याचा वापर करून रुचकर पदार्थ कसे बनू शकतात याचा उत्तम नमुना बघायला मिळाला.
स्वयंपाक करणाऱ्या मावशी तर फारच प्रेमळ होत्या. आग्रह करून आम्हाला खाऊ घातलं. केंद्राचे प्रमुख सोनार सर जातीने आमची काळजी घेत होते.
या भागात काही लोकांचे आडनाव अगदी मराठीतलेच वाटावे असे. सोनार सर खरं तर नेपाळी. परवा एका हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्टचे आडनाव पोतदार (बंगाली) आणि आज ज्या हॉटेलमध्ये आम्ही जेवलो त्याच्या मालकाचं आडनाव तालुकादार होतं. मला तर गंमतच वाटली.

पहाटे अडीच वाजता कोंबडा आरवला म्हणून खोलीच्या बाहेर जाऊन बघितलं
तर समोरचं दृश्य बघून थबकलो. संपूर्ण परिसर टपोऱ्या चांदण्यांनी आणि दवबिंदूंनी न्हाऊन निघाला होता.. भारावलेल्या अवस्थेत मी ते दृश्य कितीतरी वेळ बघत होतो.
आज सकाळी साडेपाच वाजता सोमवार सरांबरोबर फोटो काढून आम्ही नलबारीकडे प्रस्थान केले. आज पहिल्यांदा गारवा चांगलाच जाणवला.

रोड लेव्हल खाली घरं, घरासमोर पाण्याचं डबकं, (शेतात शेततळे) बदकं, कोंबड्या, गायी, कुठलेसे वेल, घरासमोर स्वच्छता करणारी आसामी महिला हा पॅटर्न सगळीकडे दिसत होता.
आपल्याकडे शेततळे आपण बघतो पण घरासमोरच्या मोकळ्या जागेत छोटसं तळ बांधण्याच कधी बघण्यात आलं नाही. अर्थात यांची घरे स्वतंत्र प्लॉटवर असल्यामुळे कदाचित ते शक्य असेल. तरीही पाण्याच्या नियोजनाबाबतीत इकडचे लोक आत्मनिर्भर आहेत हे नक्की.
या भागात कोचिंग क्लासेसचे प्रस्थान बऱ्यापैकी दिसून आलं. विशेषतः स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी कोचिंग क्लासेस बघून आश्चर्य वाटलं. आपण आसामला मागासलेलं राज्य समजतो. परंतु इथले विद्यार्थी सुद्धा rat race मध्ये ताकतीने उतरताना दिसतात. मुलींमध्ये सुद्धा शिक्षणाचे प्रमाण लक्षणीय दिसून आले.

या भागात नद्यांचा खूप सुळसुळाट आहे.
आज मुख्य नद्यांमध्ये आई नदी, आणि मानस नद्या दिसल्या. आज सुद्धा रेल्वे ट्रॅक आमच्या सोबतच प्रवास करत होता.

मला चित्रकलेचा गंध नाही. म्हणायला इंटरमिडियेट परीक्षा पास झालो. कसा झालो ते एक आश्चर्यच आहे. कुत्रा काढावा तर ते गाढव वाटावं असं माझं ड्रॉईंग.आता बोला. परंतु बिहार, आसामची बकरी मात्र मला काढता येईल असं वाटतं. (प्रपोर्शन ची गरज नाही.)

आसाम म्हटलं की आपल्या मनात काही गोष्टी येतात. क्रूड ऑइल, चहा, लाकूड, धानाची शेती, बांबू वगैरे वगैरे.
या भागात इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचं खूप जास्त डॉमिनेशन दिसून येतं.

या भागात प्रामुख्याने धानाचं पीक घेतलं जातं. मोहरीची लागवड पण दिसून येते. जेवणात मोहरीच्या तेलाचा वापर होत असल्याने असेल. त्याच बरोबर मोहरीचे तेल लाकडी घाण्याचं वापरतात. भाज्यांमध्ये फ्लॉवर, कोबी, वांगी, दुधी भोपळा आणि तत्सम प्रकाराची लागवड दिसून आली.
इथल्या आदिवासी समाजातील महिला आणि पुरुष पारंपारिक देशात दिसतात तर इतर लोक अतिशय साध्या वेशात असतात. भंपकपणा कुठेही दिसून येत नाही.
महिलांमध्ये आणि मुलींमध्ये मात्र लिपस्टिकचा वापर अनिवार्य आहे की काय अशी शंका मनात येते.
आसाम बद्दल थोडक्यात सांगायचं तर Simple yet elegant .
आजचा आसामी पद्धतीचा नाश्ता फारच छान होता. आणि ज्या हॉटेलमध्ये जेवण घेतलं त्याच्या मालकाचं नाव तालुकदार. या हॉटेल मधलं आर्टवर्क खूप नाविन्यपूर्ण होतं. आमची कहाणी ऐकून हॉटेल मालक आमच्या प्रेमात पडला आणि आमच्या सोबत भरपूर फोटो काढून घेतलेत.
नलबरी गावात आम्ही संध्याकाळी साडेचार वाजता पोहोचलो. विवेकानंद केंद्र विद्यालयाचे प्राचार्य चक्रवर्ती सर यांना आम्हाला भेटायची इच्छा होती. आम्हाला तिथे पोहोचायला उशीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांची भेट मात्र होऊ शकली नाही. चक्रवर्ती सरांनी आम्हाला चहा, मिठाई आणि शेव असा पाहुणचार केला आणि अर्थातच आमच्या सोबत फोटोसेशन केले.
दरबारी गाव हे तसं खूप लहान आहे. मला हे गाव बघून लाखनीची आठवण आली.
चक्रवर्ती सरांच्या ओळखीतूनच हे हॉटेल आम्हाला मुक्कामासाठी मिळालं. इतक्या लहान गावात इतकं चांगलं हॉटेल मिळणं तसं अवघडच होतं.
आज आमचा तीन हजार किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला!! उद्या आम्ही गोहाटीकडे प्रस्थान करू.

क्रमशः

@देवदत्त टेंभेकर

day 28

West to East cycling expedition day 28
Nalbari to Guwahati (Hotel Silver Stay) (६७.५६ किमी) Cumulative 3087 Kms

Tuesday, December 6

आज संध्याकाळी विश्रांती मिळणार असल्यामुळे वेळेपूर्वीच सर्वजण तयार होऊन बसले. बाहेर पडल्यावर तीन किलोमीटर अंतरावर एक चहाची टपरी लागली येथे काल घेऊन ठेवलेले केक आणि चहा ढोसला. आज पुण्यावरून येणारी दुसरी टीम गोहाटी मध्ये आम्हाला भेटणार आहे. परवापासून या मोहिमेचा तिसरा टप्पा सुरू होणार. त्यामध्ये पुण्याहून येणारे चौघेजण आमच्या सोबत सहभागी होणार आहेत.
नलबारी पासून तर नॅशनल हायवे पर्यंत जवळजवळ 43 किलोमीटरचा रस्ता तर छान होता परंतु रस्त्याचं आणि सायकलचं काही जुळत नव्हतं. हा रस्ता गावागावातून जाणारा. त्यामुळे लागून घरं. घरासमोरच तळं, घराच्या आवारात दाणे वेचणाऱ्या कोंबड्या, केविलवाण्या स्वरात ओरडणाऱ्या बकऱ्या, आखुड शिंगे आणि पायांच्या गायी
हेच दृश्य सर्वत्र दिसून येत होतं.
सकाळी साडेसात वाजे नंतर बहुदा इथल्या शाळेची वेळ असावी त्यामुळे रस्त्यावर आया आणि त्यांच्यासोबत त्यांची छोटी छोटी मुलं हे दृश्य खूपच लोभसवाणं दिसत होतं. आमच्याकडे लक्ष जाताच त्या लहान मुलांचे उजळलेले चेहरे बघून आम्हाला खूप छान वाटत होतं.
पश्चिम बंगाल आणि आसाम मध्ये पाणी व्यवस्थापन कसे करतात याचा आपल्याकडील लोकांनी जरूर अभ्यास करावा. काल उल्लेख केल्याप्रमाणे आज सुद्धा प्रत्येक घराच्या समोर किंवा आजूबाजूला एखादा तरी छोटसं तळं दिसत होतं. या भागात जास्त पर्जन्यमान होत असल्यामुळे असेल परंतु पाणी साठवून ठेवण्याची यांची कला निश्चित वाखाणण्यासारखी आहे. अर्थात साठलेल्या पाण्यामुळे या भागात डासांचं प्रमाण मात्र लक्षणीय आहे.
सकाळच्या वेळेला सर्वजण फ्रेश मूडमध्ये असताना प्रवास करताना आम्हाला फक्त सर्वत्र प्रेम आणि प्रेमच मिळत होतं.

रस्त्याच्या परिस्थितीमुळे स्पीड कमी होता त्या संधीचा फायदा घेऊन वरील निरीक्षण करता आले.

थोड्या अंतरानंतर प्रदीप भवाळकर आणि संजय कट्टी यांनी पुण्यातील यंग सीनियर ग्रुप सोबत व्हिडिओ कॉल केला. त्या सर्वांना बघून खूप आनंद झाला आणि त्यांनाही झाला असावा.
साधारण 40 किलोमीटर अंतर झाले असताना आम्हाला रस्त्याच्या डाव्या हाताला गणपतीचं मंदिर दिसलं. गणेश मूर्ती बघून नागपूरच्या टेकडीच्या गणपतीची आठवण झाली. ही बहुतेक स्वयंभू गणेश मूर्ती असावी. भारताच्या इतक्या टोकावरच्या राज्यात गणेशाची मूर्ती बघून खूप प्रसन्न वाटलं.
44 किलोमीटर अंतरावर आम्हाला नॅशनल हायवे लागला. आणि थोड्याच वेळात ज्या गोष्टीची आम्ही वाट बघत होतो ती गोष्ट नजरेस पडली. ब्रह्मपुत्रा नदी म्हणजे जणू वाहणारा समुद्रच. तिच्या प्रथम दर्शनाने रोमांचित झालो. ही नदी पार करूनच गोहाटी शहरात प्रवेश करता येतो. नदीच्या पुलावर फोटोसेशन करून आम्ही समोर जवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये सकाळचा नाश्ता घेतला. त्यानंतर जवळजवळ वीस किलोमीटर अंतरावर मुक्कामाची मुक्कामाची जागा होती. सध्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामामुळे अनेक ड्रायव्हरच्या आणि अडथळे पार करून दुपारी साडेबारा वाजता आम्ही आमच्या मुक्कामाच्या जागी सुखरूप पोहोचलो.
आता आमच्या पुण्याच्या सहकाऱ्यांच्या प्रतीक्षेत बसलो आहोत.

क्रमशः

@देवदत्त टेंभेकर

Day 29

West to East cycling expedition day 29 Rest day at Guwahati
(3087 kms Covered so far)

Wednesday, December 7

काल सकाळी साडेबाराला पोहोचल्यानंतर साधारणतः साडेतीन वाजता पुण्याची टीम आम्हाला भेटायला आली. (डॉक्टर दीपक कुलकर्णी, विनायक माढेकर, अनघा दूधभाते आणि सोनाली ओगले)
त्यापूर्वी साचलेले कपडे धुण्याचा घाट घातला. मस्तपैकी गरम पाण्याने अंघोळ केली आणि पुणे टीमची वाट बघत बसलो. ते लोकं आज सकाळीच पोहोचले आणि गुवाहाटी दर्शन करून आम्हाला भेटायला आले. त्यांचा मुक्काम जिंजर हॉटेलमध्ये आहे.
कट्टीं सोबत पुढच्या प्रवासाचे नियोजन कसे राहील या संदर्भात विस्तृत चर्चा झाली. सुरुवातीचे चार दिवस ते स्वतंत्रपणे बॅकअप व्हॅन सोबत पुढे जाणार आहेत. त्यांचा मार्ग थोडा वेगळा आहे. पाचव्या दिवशी दिब्रुगडला त्यांची आमची गाठ पडेल.

दुपारची झोप झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही जिंजर हॉटेल ला त्यांच्याकडे गेलो. तिथे गेल्यावर अरुणाचल प्रदेश मध्ये प्रवेश करताना आवश्यक असलेली आय एम पी एल ची प्रक्रिया पूर्ण केली. रात्री सर्वांनी एकत्र जेवण केले. तिथून निघण्यापूर्वी जिंजर हॉटेलच्या जिम मध्ये वजन केले. फार नाही, फक्त दोन किलोने कमी झाले आहे.

आज सकाळी मस्तपैकी आरामात उठलो. आरामात म्हणजे सात वाजता!!
सगळ्यात पहिलं काम म्हणजे सायकलचं सर्विसिंग. आम्ही आपापल्या सायकली व्यवस्थित स्वच्छ करून चेक केल्या आणि सर्व ठीक आहे याची खात्री करून घेतली.
पुण्यातील नो वरीज बाईकचे आनंद वांजपे यांनी पाठवलेला क्लीनर स्प्रे आणि चेन लुब्रिकंट हे अत्यंत प्रभावी आहे. त्याचा वापर केल्याने उर्वरित प्रवासात काळजी राहणार नाही.
मोनीश आणि कट्टी एका सायकल शॉप मध्ये सायकली घेऊन गेले आणि येताना कार वॉशिंग च्या दुकानातून वॉशिंग करून घेऊन आले. भवाळकर आणि मला मात्र ते आवश्यक वाटले नाही.
ते परत आल्यानंतर आम्ही चौघे गुवाहाटी दर्शनाला बाहेर पडलो.
गुवाहाटी हे आसाम राज्यातले सर्वात मोठे शहर ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर वसले आहे. इथले कामाख्या मंदिर हे जगप्रसिद्ध आहे.
सर्वात प्रथम आम्ही विवेकानंद केंद्राला भेट दिली. तिथे सुजाताईंसोबत भरपूर गप्पा मारल्या. त्यांच्या आग्रहाखातर आम्ही इथला स्पेशल लाल चहा घेतला. त्यांनी संपूर्ण केंद्राच्या परिसराची माहिती दिली. विवेकानंद केंद्राचं आसाम राज्यातलं हेडक्वार्टर हे गुवाहाटीला असल्याने इथल्या सोयी सुविधा अद्ययावत आहेत.
त्यानंतर आम्ही आमचा मोर्चा शुक्रेश्वर शिव मंदिराकडे वळवला. मंदिराच्या परिसरातून ब्रह्मपुत्रा नदीचे दर्शन डोळ्याला सुखावून जाते. आसाम मधील हे अत्यंत महत्त्वाचे असे शिवमंदिर आहे. आम्ही गेलो तेव्हा तिथे एक विवाह विधी सुरू होता. विवाहाला उपस्थित असलेली मंडळी सजून नटून आले होते. आसामी पद्धतीच्या सिल्क साड्या परिधान केलेल्या महिला मिरवत होत्या. इतकं असूनही मंदिराच्या परिसरात विशेष गर्दी नव्हती त्यामुळे आमचे खूप छान दर्शन झाले.
गुवाहाटीमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट खूपच चांगले आहे. हॉटेल पासून बस स्टॉप पर्यंत टुकटुक ने गेलो. बसेसची फ्रिक्वेन्सी पण खूप चांगली आहे.
गुवाहाटीत एक विशेष उल्लेखनीय गोष्ट दिसली ती म्हणजे कलकत्ता, नागपूरला जसे माणसाने ओढलेले पारंपरिक रिक्षा असतात तशा रिक्षांना बॅटरी ऑपरेटेड केलेले आहे. म्हणजे रिक्षाचालकाला रिक्षा चालवताना अजिबात श्रम होत नाहीत. ऑटो रिक्षा आणि टुकटुक सुरू झाले तरीही अशा रिक्षाचालकांना रोजगाराची समस्या उद्भवली नाही. अडचण आली असताना रडत बसण्यापेक्षा त्यातून काहीतरी मार्ग काढता येऊ शकतो हे यातून दिसून आले.
आज आमची आणि सायकलींची व्यवस्थित विश्रांती झाली.उद्या नव्या दमानी शेवटच्या टप्प्याकडे आम्ही कूच करणार आहोत. उद्या गुवाहाटी वरून नागाव कडे सकाळी नेहमीच्या वेळेवर प्रस्थान करू.

क्रमशः

@देवदत्त टेंभेकर

day 30

West to East cycling expedition day 30
Guwahati (Hotel Silver Stay) to Nagaon

Thursday, December 8 (111.16 kms)
Cumulative 3198 kms

काल रेस्ट डे असल्यामुळे सायकलला आणि मला दोघांनाही खूप छान आराम मिळाला. मग विचार केला पोटाला पण आराम द्यावा म्हणून रात्री फक्त फलाहार केला. आजपासून मोहिमेच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्याला सुरुवात झाली आहे.
पहाटे साडेचार वाजता गजर वाजण्याच्या आधीच जाग आली. पहाटे साडेपाच वाजता नेहमीचा फोटो काढून नागांवकडे प्रस्थान केले. आधीच सांगितल्याप्रमाणे येथे दिवस लवकर उजाडतो साडेपाच वाजताच बऱ्यापैकी उजाडलेला असतो. मग आम्ही सूर्य उगवतो त्या दिशेने कूच करू लागतो. पूर्वीच्या काळी जेव्हा जीपीएस मॅप नव्हते तेव्हा सूर्य, चंद्र आणि ग्रह तारे हेच दिशादर्शक होते.
हवेत विशेष गारवा नव्हता. परंतु गुलाबी थंडी जाणवत होती. पुढे गेल्यावर लगेचच पहिला घाट लागला आणि तो उतरल्यानंतर थोड्याच अंतरावर दुसरा घाट लागला. गेल्या 29 दिवसांमध्ये पहिल्यांदाच आम्ही घाट सेक्शन वर राईड केली. आता इथून पुढे नक्कीच घाट लागतील अशी मानसिक तयारी करून ठेवलेली आहे.
जसजसे आम्ही काझीरंगा अभयारण्याच्या दिशेने जात आहोत तसतशी हिरवळ आणि दाट जंगल रस्त्याच्या दुतर्फा दिसून येतात.
घाट उतरल्याबरोबर आम्हाला दाट धोक्याचा सामना करावा लागला अक्षरच्या काही फुटांपर्यंतच व्हिजिबिलिटी होती. अगदी हिंदी सिनेमातले रोमँटिक सीन दाखवताना असते तसे!!
आज आमच्या सोबत प्रवास करणाऱ्या रेल्वेला यांनी मात्र आम्हाला बराच वेळ हुलकावणी दिली. एकदा आमच्या जवळ येऊन डोक्यावर टपली मारून गेली पण नंतर फक्त अधून मधून भोंगा वाजवून आपल्या अस्तित्वाची चाहूल करून देत होती. सायकल ताजी तवानी झाल्यामुळे आज स्पीड खूप छान मिळाला होता. पन्नास किलोमीटर झाले तरी थांबण्याची इच्छा होत नव्हती. मध्ये मध्ये थांबून काही फोटो काढले. त्यातले विशेष आवडलेले म्हणजे शाळेतील लहान मुलांचे राष्ट्रगान. सध्या या भागातल्या शाळेत सोशल गॅदरिंग चा सिझन सुरू आहे असे वाटते. बऱ्याच शाळांमध्ये क्रीडा स्पर्धा सुरू असलेल्या दिसल्या.
53 किलोमीटर वरील जागी रोड गावात आम्ही नाष्ट्यासाठी थांबलो. पराठे आणि डबल आमलेट असा भरपेट नाश्ता केला.
वाटेमध्ये बांबू पासून तयार केलेल्या कलात्मक वस्तूंची अनेक दुकानं दिसलीत.
प्रत्येक दुकानात फ्रेश शहाळे विक्रीसाठी ठेवलेली दिसली.
तिथून जे सुटलो ते शंभर किलोमीटरवर नागाव बायपास जवळ जेवणासाठी थांबलो.
बसंत बोरा या आसामी माणसाचा हा दाबा होता. संपूर्ण बांबूचे बांधकाम असलेला हा धाबा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण होता. पारंपारिक असामी कलाकृतींचे इंटेरियर आणि पेशवाई थाटात बसण्याची व्यवस्था बघून तिथून उठावेसे वाटत नव्हते. बसंत बोरांनी आमच्या सोबत खूप गप्पा मारल्या. आमच्या सायकल मोहिमेबद्दल ऐकून ते खूपच भारवले होते. “शायद आपका शरीर बुढा हुवा होगा मगर दिल से आप सोलह सालके लगते हो” हा त्यांचा डायलॉग. कट्टी आणि भावाळकरांनी तिथल्या दोन आराम खुर्च्या पटकावल्या आणि सोडायलाच तयार नव्हते. शेवटी तीनच्या सुमाराला आम्ही तिथून निघालो. चार वाजता आमच्या मुक्कामाच्या जागी सुखरूप पोहोचलो.
सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा आमच्या मोहिमेचा अंतिम टप्पा सुरू आहे त्यामुळे आज पासून काऊंट डाऊनला सुरुवात झाली आहे. आता फक्त आंठ दिवस उरलेत.
उद्या काझीरंगा अभयारण्यात सफारी बुक केली आहे. त्यामुळे नेहेमीपेक्षा थोडं लवकर निघायचे आहे. तसेच वाटेत महा मृत्युंजयेश्वर मंदिराला भेट द्यायची आहे. असे म्हणतात की इथे सबंध विश्वातील सर्वात मोठे शिवलिंग आहे. त्यामुळे ते बघण्याची उत्सुकता आहेच…

क्रमशः

@देवदत्त टेंभेकर

Day 31

West to East cycling expedition day 31
Nagaon (Hotel AM Palace) to Bagori (95 kms) Cumulative 3293 kms
Friday, December 9

ठरल्याप्रमाणे सकाळी वेळेत तयार झालो. पार्किंग मधून सायकल काढताना काहीतरी गडबड झाल्याचे जाणवले. बघतो तर काय, चेन अडकली होती आणि गियर जाम झालेले…. आम्ही सहसा कोणाला सायकलला हात लावू देत नाही. परंतु काल पार्किंग मध्ये कोणीतरी काड्या केल्या.
अंधारात बरीच झटपट करून सायकल चालण्याजोगी केली. हात काळे झाले, तोंड तर नाही नं? असा विचार करून मार्गस्थ झालो.
हमरस्त्यावर प्रचंड दाट धुकं होतं. महा मृत्युंजयेश्वर मंदिर आमच्या मुक्कामाच्या जागेपासून १४ किमी अंतरावर होतं. ते सापडायला अडचण आली नाही.
मंदिर परिसरात सुद्धा दाट धुकं होतं. महाकाय शिवलिंग बघून नतमस्तक झालो.
हे शिवलिंग जगात सर्वात मोठे आहे!!!
मंदिराच्या पुजाऱ्यानी आमच्या सोबत सेल्फी काढली. त्यांना त्यांच्या स्टेटस साठी आमच्या सोबत फोटो हवा होता. जाण्यापूर्वी प्रसाद दिला.
तिथून पुढे मिसा गावात आर्मी कॅम्प लागला.
कॅम्प साईटच्या बाहेर एका monument चा फोटो काढताना मला हटकले. आंत बोलवून सर्व सामान आणि डॉक्युमेंट चेक केले. मुख्य अधिकाऱ्यांनी आमच्या मोहिमेविषयी ऐकल्यावर लगेच जायला परवानगी दिली. अशाप्रकारे आज दोन अडथळ्यांचा सामना करावा लागला.
४७ किमी वर या काली धाब्यावर अप्रतिम नाश्ता मिळाला. धाबा अगदी नवीन असल्याने चकाचक होता. नाश्ता झाल्यावर जास्त टाइमपास न करता काझीरंगा फॉरेस्ट कडे प्रस्थान केले. फॉरेस्ट एरिया प्रचंड मोठा आहे. अतिशय दाट झाडीचा असल्याने हवेत गारवा जाणवत होता. रस्त्यावर सूर्यकिरणे पोहोचू शकत नव्हते.
वाटेत आम्हाला पंकज मेहेता आणि संजय खाडे भेटले. पंकज आमच्या ग्रूपमध्ये सामिल झाला. त्याची आणि कट्टींची आधीपासून ओळख आहे. तो किबिथू पर्यंत आमच्या सोबत येणार आहे.
संजय खाडे सोलो सायकलिस्ट आहे. ते तेजू पर्यंत जाणार आहेत.
दुपारी दीड वाजता आम्ही बगेरा गावातल्या
आमच्या आजच्या मुक्कामाच्या जागेवर पोहोचलो.
इथून काझीरंगा सफारीची एका बाजूची सुरूवात होते.
आम्ही आगावू बुकिंग केले असल्याने लगेच सफारी साठी निघालो.
काझीरंगा अभयारण्य एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. आमच्या नशिबाने आम्हाला शंभराच्या वर गेंडे दिसले. त्याच सोबत हरीण, रानरेडा, रानडुकरे, जंगली कोंबड्या, पेलिकन दिसले. गेंड्याचं दर्शन अगदी जवळून झाले. तो आमच्याकडे बघत होता… भरपूर फोटो, व्हिडिओ काढले.
आजच्या सफारीचे पैसे वसूल झाले.
संध्याकाळी रिसॉर्ट वर हाय टी घेऊन आता जेवणाची वाट बघत आहोत.

क्रमशः

@देवदत्त टेंभेकर

Day 32

West to East cycling expedition day 32
Bagori (Kaziranga National Forest) to Jorhat
Saturday, December 10 (127 किमी) Cumulative 3420 kms

काल डोहोकोटरा रिसॉर्टमधला स्टे खूपच कंफर्टेबल झाला. रिसॉर्ट ओनर रूपा गोस्वामी स्वत: Practicing Advocate आहेत. कोरोना काळात पर्यायी उत्पन्न म्हणून त्यांनी हे सुरू केले. निवास व्यवस्था उत्तम आहे. काझीरंगा सफारीचे एक गेट या रिसॉर्ट पासून पायी अंतरावर आहे. (एकूण ४ गेट्स आहेत.)
रात्रीचे जेवण अगदी घरच्या सारखे होते. (वाफाळलेला भात, गरमागरम फुलके )

गेंड्याबद्दल गंमतीशीर गोष्ट कळली. गेंडा दिवसातले १८ तास चरत असतो!! ज्या परिसरात चरतो तिथे शी करत नाही. दूरवर एकाच जागेवर सलग २५ दिवस विधी उरकतो. त्या जागेवर त्याच्या विष्ठेचा ढीग तयार झाला की दुसरी जागा शोधतो. गंमत आहे नं?

काल पंकज मेहता आमच्या सोबत मुक्कामाला होता. तो सोशल मीडियावर खूप ॲक्टीव आहे.
आज पहाटे ५ वाजता फोटोसेशन करून प्रस्थान केले.
आज धुक्याचा अजिबात त्रास झाला नाही. इन फॅक्ट कोहोरा गावात अजिबात कोहोरा नव्हता. आजपण वाटेत चहाचे मळे दिसले. आता त्यांची सवय झाली आहे. त्यामुळे फोटो बीटो काही काढले नाहीत.
५३ किमी अंतरावर ब्रेकफास्टसाठी एका आसामी धाब्यावर थांबलो. अप्रतिम नाश्ता मिळाला. (पराठा, उंदियो टाईप सुकी भाजी, बटाटा चणाडाळ रस्सा भाजी, डबल ऑमलेट)
८६ किलोमीटरवर सु का फा म्युझियम बघण्यासाठी थांबलो. (हे व्यक्तीचं नाव आहे)
पंकज जोरहाटला त्याच्या मित्राकडे गेला. आम्ही पुढे १०६ किमीवर हॉटेल ब्रम्हपुत्राला लंच घेतला.
तिथून निघायला चार वाजले. त्यामुळे आजपण मुक्कामाच्या जागी पोहोचेपर्यंत अंधार झाला. रस्त्यावर दुहेरी वाहतूक असल्याने सायकल चालवताना कसरत करावी लागली. संध्याकाळी साडेपाच वाजता हॉटेल फुड व्हिला येथे सुखरूप पोहोचलो. (इथे रात्रच म्हणावे लागेल)
कट्टींच्या जावयाचा मित्र जातीने हजर होता. त्याच्यामुळे आमची खूप छान सोय झाली. आज तो आमच्यासाठी देवासारखा धावून आला..
उद्या सकाळी दिब्रुगडकडे प्रस्थान करू. तिथे आमच्या दुसऱ्या ग्रूपची आमची गाठ पडेल. परवा पासून आमचा एकत्र प्रवास सुरू होईल.
आता मोहीमेचे फक्त सहा दिवस बाकी आहेत.

क्रमशः

@देवदत्त टेंभेकर

Day 33

West to East cycling expedition day 33
Food Villa Teok (Jorhat) to Dibrugarh VKV (117 Kms)
Cumulative 3537 kms

Sunday, December 11

कालची निवास व्यवस्था उत्तम होती. रात्री शांत झोप लागली.पहाटे पाच वाजता तयार झालो. निघण्यापूर्वी सायकल चेक केली तर चेनचा आवाज येत होता. तशीच सायकल चालवायला सुरुवात केली. पुढे गेल्यावर आवाज वाढू लागला. सायकलचा डिरेलर थोडा वाकलेल्या अवस्थेत असल्याने चेन घासत होती. मला काळजी वाटायला लागली. काहीतरी मार्ग निघेल अशा आशेवर जात राहिलो.
३३ किलोमीटरवर शिवसागर येथील सुप्रसिध्द शिवडोल मंदिराला भेट दिली. १७ व्या शतकातील हे मंदिर राजा शिवसिंग ह्यांच्या पत्नीने इ.स. १७१४ ते ४४ कालावधीत बांधले आहे.दगड आणि विटांनी बांधकाम केलेले हे मंदिर आसाम मधील अहोम मंदिरांमध्ये सर्वात उंच मंदिर आहे. (४० मीटर्स). अहोम मंदिरांचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराचा कळस कुठलेही नक्षीकाम न करता प्लेन असतो. मंदिराला लागून शिवसागर तलाव असल्याने मंदिराचे सौंदर्य खुलून दिसते. गर्भगृहात शंकराची पिंड आहे. अतिशय साधेपणाने अंतर्गत सजावट केली आहे.
मंदिराच्या बाहेर अनेक भाविक पणती लावतात. इथे अखंड नंदादीप तेवत ठेवला आहे.
दर्शन घेऊन पुढे निघालो. ५० किमी वर एका आसामी धाब्यावर नाश्ता केला. पुढे ७५ किमी अंतरावर मारन गावात पाणी पिण्यासाठी थांबलो असताना मोनीषला एक सायकलचं Street Bike Day नावाचं दुकान दिसलं. दुकानात गियर्ड सायकल बघून आशेचा किरण दिसला. तिथल्या मेकॅनिकला (असादुल हक अली) सायकल दाखवली. आणि अक्षरशः १० मिनिटांत त्याने माझ्या समस्येचे निराकरण केले!!! त्याच्या रूपाने आज मला देव भेटला.
दुकानाचा मालक (आशिष शर्मा) पैसे घेत नव्हता. जबरदस्तीने त्याला पैसे दिले. असादुल हक अली स्वतः सायकलिस्ट असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे विशेष आनंद झाला. त्यांच्या दुकानात फोटोसेशन करून आम्ही पुढे निघालो.
प्रॉब्लेम सुटल्यामुळे खूप रिलॅक्स्ड झालो.
पुढे १०० किमी वर छेत्री धाब्यावर राईस प्लेट खाल्ली.
टीओक पासून पुढे रस्त्याची काम सुरू असल्याने प्रचंड डायव्हर्शनस् आहेत. बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर पॅचेस आणि खड्डे लागलेत. भारतातील सर्व जिल्हे आणि गावांचे नकाशे रस्त्यावर उमटले आहेत. शिवाय दुहेरी वाहतूक असल्याने सायकल चालवताना कसरत करावी लागत होती.
नवीन टीम मधील एकांनी सांगितले की पार्श्वभागाची वाट लागेल. आमची तर “वाटी” झाल्यामुळे विशेष त्रास झाला नाही.
आज रविवार असल्याने असेल , अनेक गावांत आठवडी बाजार भरलेला होता. त्यामुळे त्या भागात वाहतुकीची कोंडी होत होती.

धाब्यापासून एक रस्ता दिब्रुगड शहरात आणि दुसरा रस्ता प्रसिद्ध बोगीवील ब्रिजकडे जातो. आम्हाला ब्रिज बघायचा होता. पण सायकलने गेलो असतो तर मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायला खूप उशीर झाला असता. आमची पुण्याची टीम एव्हाना मुक्कामाच्या जागी पोहोचली होती. त्यांनी त्यांची गाडी आमच्यासाठी पाठवली. आम्ही सायकली धाब्यावर सुरक्षित ठेवून गाडीने ब्रिज बघायला गेलो.
ब्रह्मपुत्रा नदीचं पात्र अति विशाल आहे. ह्या ब्रिजचे वैशिष्ट्य म्हणजे हा भारतातला रेल्वे आणि रोडवेजचा सर्वात लांब ब्रिज आहे. (४.९४ किमी) ह्या पुलाचे बांधकाम २००२ साली सुरू झाले आणि तब्बल १६ वर्षांनी तो वाहतुकीसाठी खुला झाला!!
भुकंपप्रवण क्षेत्रात असल्याने याचे बांधकाम
फुल्ली वेल्डेड स्टील बीमस् आणि काँक्रिट स्ट्रक्चरचे केले आहे . (क्षमता रिश्टर स्केल ७ ) याचे सर्व्हिस लाईफ १२० वर्षे आहे.
ब्रिज बघून आम्ही धाब्यावर परत आलो आणि सायकलिंग करत विवेकानंद केंद्र विद्यालयात मुक्कामासाठी पोहोचलो.
केंद्राच्या प्रमुखांनी आमचे स्वागत केले. तिथे श्री गौतम आम्हाला भेटायला आले होते. गौतमजी स्वतः सायकलिस्ट आहेत आणि विवेकानंद केंद्र विद्यालयाचे माजी विद्यार्थी सुद्धा. त्यांनी आम्हाला खूप उपयुक्त माहिती दिली.
आज पुणे टीमची भेट झाल्यामुळे सर्वजण खुष आहेत. उद्यापासून आमच्या एकत्र प्रवासाला सुरुवात होईल.
आता मोहीमेचे शेवटचे ५ दिवस शिल्लक राहिलेत. आसाम राज्यात पुढील २ दिवस आमचा प्रवास राहील.

क्रमशः

@देवदत्त टेंभेकर

Day 34

West to East cycling expedition day 34
VKV Dibrugarh to VKV चापाखोवा Sadiya
Monday December 12
Cumulative 3673 kms

कालचा मुक्काम विवेकानंद केंद्र विद्यालय दिब्रुगड येथे झाला. अतिशय उत्तम व्यवस्था ठेवली होती. रात्री घरगुती जेवणाचा आस्वाद घेतला.
पहाटे ५ वाजता आमच्या खोलीत गरमागरम चहा मिळाला. आम्ही निघताना शाळेचे प्रिन्सिपॉल आणि त्यांचे सहकारी जातीने हजर होते. आम्हाला सर्वांना केंद्राची आठवण म्हणून आसामी पद्धतीचा गमछा आणि काही साहित्य देण्यात आले. भल्या पहाटे एक पत्रकार महाशय आले होते. त्यांनी कट्टींची मुलाखत घेतली. जंगी फोटोसेशन करून आम्ही सादिया गावाकडे कडे प्रस्थान केले. बाहेर पडताना खूप गर्दीचा सामना करावा लागला. कारण इथे दिवस लवकर उजाडतो. आणि आम्हाला निघायला थोडा उशीरच झाला होता.
या भागात रस्त्याच्या दुतर्फा चहाचे मळे, धानाची शेती, बांबूची लागवड दिसून येते.
रेल्वेलाईन आमच्या समांतर धावत होती. ८५ किमी होईपर्यंत तिने आमची साथ सोडली नाही.
जाताना ४५ किमी वरील विवेकानंद केंद्राला भेट दिली. तिथे दणदणीत स्वागत झाले. पारंपारिक पद्धतीने ओवाळले आणि गमछा प्रदान केला. त्याच बरोबर शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसमोर आम्हाला मनोगत मांडायला सांगितले. या केंद्राचा परिसर अतिशय रमणीय आहे. तिथे आम्हाला नाश्ता दिला. त्यांचे आदरातिथ्य बघून आम्ही अतिशय भारावून गेलो.
पुढे १०४ किमी वर सुप्रसिद्ध भूपेन हजारिका पुलावर पोहोचलो. हा पूल लोहित नदीवर आहे. लोहित नदी ब्रम्हपुत्रा नदीची उपनदी आहे.
कट्टींच्या संपर्क यंत्रणेतून भारतीय सेनेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला लोहित नदीच्या तीरावर लंच अरेंज केला होता. अतिशय कमी वेळात त्यांनी आमच्यासाठी भरपूर पदार्थ करून आणले होते. कॅप्टन अंकित कुमारांनी अक्षरशः राजेशाही थाटात आमची व्यवस्था केली होती. लोहित नदीचा परिसर अतिशय सिनिक आहे. तिथे भारतीय सेनेने आमचा पाहुणचार केला ही घटना अविश्वसनीय आहे. आपण स्वप्नात तर नाही ना अशी शंका मनात येते. भारतीय सेनेचे वेगळेच रूप अनुभवायला मिळाले. येथून पुढे कुठेही मदत लागली तर कॉल करा असे आवाहन त्यांनी केले.
या अनुभवासाठी कट्टींचे शतशः आभार!!!
त्यांच्या संपर्क यंत्रणेतून आमची विवेकानंद केंद्रात आणि भारतीय सेनेमार्फत अतिशय छान सोय झाली.
सेना अधिकाऱ्यांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा निरोप घेऊन आम्ही भूपेन हजारिका पुलावर पोहोचलो. हा पूल ९.१५ किमी लांब बीम ब्रिज आहे (१८२ पिलर्स आहेत) याला धोला सदिया ब्रिज असेही म्हणतात. हा भारतातील पाण्यावरचा सर्वात लांब पूल आहे. पुलाचे बांधकाम नोव्हेंबर २००१ साली सुरू होऊन २६ मे २०१७ मधे पूर्ण झाले.या पुलामुळे अरुणाचल प्रदेश आसामशी जोडल्या गेला आहे. अरुणाचल प्रदेशावर चीनचा डोळा असल्याने या पुलाचे महत्त्व विशेष आहे.
या जागेवरून बाहेर पडायला ४ वाजले आणि मुक्कामाच्या जागेवर पोहोचायला साडेपाच.
आजचा मुक्काम सदिया जवळील चापाखोवा गावातल्या विवेकानंद केंद्रात आहे.
उद्या आम्ही अरुणाचल राज्यात प्रवेश करणार आहोत.
आसाम राज्यातील आमचा प्रवास खूप सुखद झाला.
अंतिम ध्येय गाठण्यासाठी आता फक्त ४ दिवस राहिलेत.

क्रमशः

@देवदत्त टेंभेकर

Day 35

West to East cycling expedition day 35
VKV Chapakhova to Teju (Officers mess) 56 kms
Tuesday, December 13
Cumulative